मुंबई - गेल्या आठवडाभरात अलिबाग किना-यावर मोठ्या संख्येने मेलेले किंवा अर्धमेले स्टींग रे मासे वाहून येत आहेत. मुंबईतही गिरगाव किना-याजवळ असे मासे येत असल्याचे दिसून आले आहे. अलिबागच्या मासेमारांनी हात पेरा जाळे वापरुन त्यांची पकडही केली आहे. हे मासे मोठ्या संख्येने आल्यामुळे काही लोकांनी प्रदुषणामुळे स्टींग रे मेले असावेत, अशी कल्पना मांडली तर अरबी समुद्रात बोट बुडाल्यामुळे प्रदूषण झाल्याची हाकाटीही उठवण्यात आली. रायगड-अलिबागचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय अ. पा. नाखवा यांनी माशांचे मृत्यू कोणत्याही प्रदुषणाने झाले नसून कोणतेही जहाज नवगांव किंवा परिसरात बुडून तेलगळती झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. हवामानातील नैसर्गिक बदलांमुळे झालेली ही घटना आहे, असे त्यांनी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

मुंबईत गिरगाव आणि इतर किना-यांवर समुद्री जिवांचे निरीक्षण करणा-या प्रदीप पाताडे यांच्या मते मासेमारी करणारे बांधव 'सारगीचे पाणी' म्हणून ज्या पाण्याचा उल्लेख करतात त्याचाच हा काळ असावा. या पाण्याचा रंग साधारण तपकिरी असून त्याच्या काळात मासे किना-याकडे येताना दिसतात. आताच्या घटनेत प्रदूषणाचा कोणताही ज्ञात सहभाग दिसत नसेल तर स्टींग रे प्रदूषणाने मेले असे म्हणता येणार नसल्याचे मत त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ओएमझेडचा परिणाम - विनय देशमुख, सागरी जैव संशोधक

  सध्या होत असलेल्या स्टींग रे मृत्यूचे तात्काळ सॅम्पलिंग करुन त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. पण या मृत्यूंमागे 'ओएमझेड' हे एक महत्त्वाचे कारण असावे. अरबी समुद्र आणि कॅलिफोर्नियाजवळ खोल पाण्यात ओएमझेड म्हणजे ऑक्सिजन मिनिमम झोन आहेत. हा अत्यल्प ऑक्सिजन असलेला पाण्याचा साठा फार खोल समुद्रात आहे. मान्सूनचे वारे जसे पावसाचे ढग घेऊन येतात तसे त्यांच्यामुळे पश्चिम किना-यावरील पाण्याची हालचालही होते आणि प्रवाहाची निर्मिती होते. किनार्याजवळ समुद्राचे वरचे पाणी या प्रवाहामुळे बाजूला गेल्यामुळे त्याची जागा ओएमझेडचे पाणी घ्यायला लागते. हे कमी ऑक्सिजनचे पाणी आले की समुद्रातल्या माशांना ऑक्सिजन कमी मिळतो आणि ते कासावीस होतात, घाबरतात व त्यापासून दूर जायचा प्रयत्न करतात.

जे मासे शक्तीशाली असतात ते उलटे समुद्रात जाऊ शकतात पण बहुतांश मासे अर्धमेल्या किंवा मेलेल्या अवस्थेत किनार्याकडे येतात. ही घटना केरळमध्ये सर्वात आधी होते कारण तेथील समुद्र किनारा खोल आहे, खोल समुद्रातले पाणी तेथे कमी काळात वर येऊ शकते म्हणून १५ जुलैच्या आसपास तेथे मोठी मासेमारी होते. गोव्यात ही घटना ऑगस्ट आणि महाराष्ट्र व मुंबईजवळ ती सप्टेंबर किंवा त्या महिन्याच्या अखेरीस होते. पाण्यात ऑक्सिजन नसल्याने माशांनी घाबरुन किना-याकडे येण्यात काहीच वेगळे नाही १९६३ साली वाचल्या गेलेल्या एका संशोधनपत्रात मुंबईपासून १०० किमी आत मोठ्या प्रमाणात असे मासे मेल्याची घटना नोंदवल्याचे मी वाचले आहे. म्हणजे ५० वर्षांपूर्वी मुंबईच्या समुद्रात तेही १०० किमी आत प्रदूषण आजपेक्षा नक्कीच कमी असेल. त्यामुळे ते प्रदुषणाने मेले असे म्हणता येणार नाही. तेव्हा हा ओएमझेडचा प्रकार असल्याचे मत डॉ. कॅरुवर्थ, बान्से, गोगटे, जयरामन या संशोधकांनी मांडले होते.

नॅशनल ओशनोग्राफी ऑर्गनायझेशनच्या डॉ. नक्वी यांनी ओएमझेडवर विशेष संशोधन केले होते. नक्वी यांच्या मते पाण्यामध्ये नद्यांनी वाहून नेलेल्या खतांमुळे नायट्रोजनचे प्रमाण वाढत आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे ओएमझेड वाढत जाणार आहे. समुद्रतळाचे तापमान जितके वाढत जाईल तितकी ऑक्सिजन धरुन ठेवण्याची क्षमता कमी होत जाते आणि साहजिकच ओएमझेड वाढत जाईल.

तेलाने मेलेले व ओएमझेडने मेलेले मासे कसे ओळखावेत ?

तेलगळती होऊन मासे मरतात तेव्हा त्यांनी कल्ल्यांची आवरणे व तोंडे बंद करुन घेतलेली असतात, त्यांच्या कल्ल्यांचे रंगही फिकट झालेले किंवा रंगहिन झालेले दिसतात. तर ओएमझेड म्हणजेच ऑक्सिजन कमी झाल्याने मेलेले मासे तोंड उघडे असलेले किंवा उघडे कल्ले असलेले असतात. त्यांनी ऑक्सिजन मिळवण्यासाठी केलेली ती धडपड असते.

स्टींग रे वाळूमध्ये का येतात ? 

स्टींग रे हे इतर माशांप्रमाणे बाहेर अंडी देत नाहीत ते पोटातच अंडी वाढवतात व थेट पिलांना जन्म देतात. हा जन्म देण्यासाठी त्यांना किनार्यावर वाळूत यावे लागते. २०१३ साली गणपती विसर्जनाच्या वेळेस गिरगाव चौपाटीवर त्यांच्या स्टींगचा तडाखा अनेक भाविकांना मिळाला होता. स्टींग रे ला मासेमारी करणारे बांधव 'पाकट' असे म्हणतात तर मोठ्या प्रमाणावर मासे मरण्याच्या घटनेला ते 'मरतूक' असे संबोधतात.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.