भाषा भवनाच्या मुद्द्यावर शिवसेना गप्प का? - विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:47 AM2019-07-16T05:47:34+5:302019-07-16T05:47:41+5:30

मराठी भाषा भवन मुंबईतच उभारण्यात यावे, अशी साहित्यिकांसह जनतेची मागणी आहे.

What is Shiv Sena speech on the language of language? - Vijay Wadettiwar | भाषा भवनाच्या मुद्द्यावर शिवसेना गप्प का? - विजय वडेट्टीवार

भाषा भवनाच्या मुद्द्यावर शिवसेना गप्प का? - विजय वडेट्टीवार

googlenewsNext

मुंबई : मराठी भाषा भवन मुंबईतच उभारण्यात यावे, अशी साहित्यिकांसह जनतेची मागणी आहे. मात्र राज्य सरकारने मुंबईऐवजी नवी मुंबईत ही वास्तू उभारण्याचा घाट घातला आहे. शिवाय, त्याला उपकेंद्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारची ही भूमिका अन्यायकारक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. भाषा भवनाच्या प्रश्नावर शिवसेना गप्प का, असा सवालही त्यांनी
केला. महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा केंद्राला जागा उपलब्ध होत नाही, हे पटणारे कारण नाही. आधीच मुंबईतून मराठी लोकांचा टक्का कमी झाला आहे. आता मराठीसंदर्भातील कार्यालयांनाही मुंबईबाहेर हाकलण्याचा काही प्रवृत्तींचा डाव दिसत आहे. ६ जुलैच्या शासन निर्णयात या भाषा भवनला नवी मुंबईतील ऐरोली, जिल्हा ठाणे येथे जागा देऊन केंद्राऐवजी उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, हे अनाकलनीय आहे. मराठी
अस्मितेचे राजकारण करणारी शिवसेनाही मराठी भाषा भवन मुंबईतच व्हावे यासाठी आग्रही असल्याचे दिसत नाही. एरवी, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, असा गळा शिवसेना काढत असते. मग मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावर शिवसेना गप्प का बसली आहे? असा सवालही वडेट्टीवार यांनी याबाबत केला.
सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने मराठी भाषा भवन मुंबईबाहेर हलवू देणार नाही, यासाठी आग्रह धरला पाहिजे. पण शिवसेना फक्त मतांसाठी मराठीचा वापर करते. मराठी भाषा भवनासाठी मुंबईत एक इमारत उपलब्ध करून देता येत नसेल तर शिवसेनेला मराठी-मराठी करण्याचा अधिकार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
>‘रंगभवन देण्यास हरकत काय?’
राज्यात मराठी भाषा मंत्रालय आहे. त्याच्या अखत्यारीत भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था कार्यरत आहेत. यांची कार्यालये मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत.
मराठी भाषा भवन मुंबईत उभारून ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आणणे शक्य आहे. रंगभवन इमारत त्यासाठी द्यावी ही पूर्वीपासूनची मागणी आहे. पण रंगभवनला हेरिटेज दर्जा असल्याची सबब सांगून सरकार टाळाटाळ करीत आहे. मुंबईत महापौर बंगल्यासह अनेक हेरिटेज इमारती आहेत. त्या जर स्मारकासाठी किंवा मॉल्ससाठी दिल्या जात असतील तर मायमराठी भाषेसाठी रंगभवन देण्यास काय हरकत आहे, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी केला आहे.

Web Title: What is Shiv Sena speech on the language of language? - Vijay Wadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.