पाणपोई... मुंबईच्या इतिहासातील मैलाचे दगड

By admin | Published: July 26, 2016 05:06 AM2016-07-26T05:06:42+5:302016-07-26T05:06:42+5:30

मुंबई शहराच्या दक्षिण भागात सर्व प्रशासकीय आणि मोठ्या कंपन्यांची कार्यालये असल्यामुळे लोकांना येथे दररोज कामासाठी यावे लागे. ट्राम आणि व्हिक्टोरियामधून प्रवास करणाऱ्या या चाकरमान्यांची

Waterfall ... Mumbai's history's milestone | पाणपोई... मुंबईच्या इतिहासातील मैलाचे दगड

पाणपोई... मुंबईच्या इतिहासातील मैलाचे दगड

Next

- ओंकार करंबेळकर ल्ल मुंबई

मुंबई शहराच्या दक्षिण भागात सर्व प्रशासकीय आणि मोठ्या कंपन्यांची कार्यालये असल्यामुळे लोकांना येथे दररोज कामासाठी यावे लागे. ट्राम आणि व्हिक्टोरियामधून प्रवास करणाऱ्या या चाकरमान्यांची
तहान भागविण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये पाणपोयांची स्थापना करण्यात येत असे. पारशी, जैन, मारवाडी व्यापारी आपल्या घरातील व्यक्तींच्या स्मरणार्थ देणगी देऊन लोकांना पाणी मिळण्याची सोय करत. मात्र आता या पाणपोयांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची वेळ आली आहे. कारण केवळ तहान भागवणारी ठिकाणे अशा नजरेने त्यांच्याकडे न पाहता ती आपल्या शहरातील ऐतिहासिक ठेवा असून स्थापत्य, सौंदर्यशास्त्र, नगरनियोजन अशा अनेक अंगांनी त्यांचा विचार व्हायला हवा.
फोर्ट, दादर, काळाचौकी, शिवाजी पार्क अशा भागांमध्ये लोकांची तहान भागविणाऱ्या पाणपोया आजही उभ्या आहेत. त्यातील काही पाणपोया झाडांची मुळे किंवा तत्सम अनेक गोष्टींना तोंड
देत टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांची तहान भागविण्याबरोबर त्यातून बाहेर पडणारे पाणी गायी-बैलांची तहान भागविण्यासाठीही वापरले जाई. नव्या काळात उभ्या केल्या जाणाऱ्या एकछाप पाणपोया, त्यांच्यावरील समान रंगाच्या समान छापाच्या फरशा आणि त्यांची अवस्था पाहिली की लोक बाटलीबंद पाण्याचा मार्गच स्वीकारतात. पाणपोयांची स्वच्छता आणि सौंदर्य टिकवून शुद्ध पाणी येथे मिळते याची खात्री वाटेल अशी काळजी घ्यायला हवी.
गेल्या वर्षी मशीद बंदर येथील केशवजी नाईक पाणपोईचा जीर्णोद्धार करण्यात आला. साधारणत: वीस फूट उंचीची ही पाणपोई स्थापत्य आणि सौंदर्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. १८७६ साली केशवजी नाईक या गुजराती व्यापाऱ्याच्या स्मरणार्थ हिची उभारणी करण्यात आली. त्यासाठी २३ हजार रुपये खर्च आला होता. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर फिलिप एडमंड वुडहाऊस यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले होते. काळाच्या ओघात देखभाल न झाल्यामुळे तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र जीर्णोद्धारानंतर ती पुन्हा दिमाखात उभी राहिली आहे. असे इतरही पाणपोयांचे जतन झाले तर नागरी स्थापत्य इतिहासाला आपण न्याय देऊन तहानलेल्यांची तहान भागवता येईल.

पाणपोयांचे महत्त्व अनन्यसाधारण
मुंबईतील पाणपोया विचार करून योग्य ठिकाणी बांधलेल्या आहेत. प्रत्येकाची स्थापत्यशैली, उभारणी, कलात्मकता वेगळी आहे. पाणी उपलब्ध करून देण्यात एक प्रकारचे अभियांत्रिकी कौशल्यही होते, याचा विचार आज व्हायला हवा. पाणपोयांचे जतन झाले तर आपल्याला शहराच्या इतिहासाला आणि संस्कृतीला नवा उजाळा देता येणार आहे. मुंबईच्या नागरी इतिहासाच्या साक्षीदार असणाऱ्या या पाणपोयांसाठी मुंबई प्याऊ प्रोजेक्टची स्थापना करण्यात आली आहे. पाणपोयांचे ऐतिहासिक महत्त्व, त्यांची गरज पाणपोईजवळच वाचायला उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. तहानलेल्यास थोडा वेळ बरे वाटावे, विश्रांती मिळावी असा उद्देश त्या काळात होता. हेरिटेज वॉकसारखा प्याऊ वॉक आयोजित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. - राहुल चेंबूरकर, स्थापत्य विशारद, मुंबई प्याऊ प्रोजेक्ट

Web Title: Waterfall ... Mumbai's history's milestone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.