उड्डाणपुलांच्या खांबावर बहरणार व्हर्टिकल गार्डन, महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:39 AM2018-11-20T05:39:55+5:302018-11-20T05:40:25+5:30

मुंबईतील उड्डाणपूल अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने नामी शक्कल लढविली आहे. त्यानुसार, सहा उड्डाणपुलांखालील जागेत उद्यान बहरणार आहे.

Vertical Garden, Municipal Corporation's decision to grow on the bridges of flyover | उड्डाणपुलांच्या खांबावर बहरणार व्हर्टिकल गार्डन, महापालिकेचा निर्णय

उड्डाणपुलांच्या खांबावर बहरणार व्हर्टिकल गार्डन, महापालिकेचा निर्णय

Next

मुंबई : मुंबईतील उड्डाणपूल अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने नामी शक्कल लढविली आहे. त्यानुसार, सहा उड्डाणपुलांखालील जागेत उद्यान बहरणार आहे. या माध्यमातून मुंबईत व्हर्टिकल म्हणजेच उड्डाणपुलांखालील खांबांवर हिरवळ उभी राहणार आहे, तसेच या उद्यानांमध्ये विविध रंगांच्या एलईडी दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे.
मुंबईतील उड्डाणपूल वाहतुकीची कोंडी मिटवित असले, तरी त्या खालील जागा म्हणजे गर्दुल्ले, भिकारी, फेरीवाल्यांसाठी आश्रयस्थान बनले आहे. त्यामुळे या पुलांना अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने व्हर्टिकल गार्डनची संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. याचा प्रयोग तीन उड्डाणपुलांखाली जागेवर होणार आहे, तर तीन ठिकाणी सोईसुविधांयुक्त उद्यान खुलणार आहे.
शहर भागात हिंदमाता उड्डाणपूल, एल्फिन्स्टन उड्डाणपूल व डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गावरील उड्डाणपूल, या तीन उड्डाणपुलांच्या खालील असणाऱ्या एकूण ३१ हजार २१३ चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत हे उद्यान बहरणार आहे. कुतूब-ए-कोकण मगदूमअली माहिमी उड्डाणपूल (जे.जे. फ्लायओव्हर), वाय ब्रिज (खडा पारशी उड्डाणपूल) व कवी केशवसुत उड्डाणपूल या तीन उड्डाणपुलांच्या खालील १९ खांबांवर व्हर्टिकल गार्डन साकारण्यात येणार आहे.
विद्युत दिव्यांची रोषणाई करताना तुलनेने कमी वीज लागणारे एल.ई.डी. प्रकारातील दिवे बसविण्यात येणार आहेत. या उद्यानांच्या उभारणीसाठी चार कोटी ९६ लाख रुपये खर्च अंदाजित आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि स्थायी समितीच्या मंजुरीनुसार कार्यादेश देण्यात येतील. कार्यादेश दिल्यापासून तीन ते चार महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या उद्यानांची मुंबईकरांना भेट
हिंदमाता उड्डाणपुलाखाली असणाºया सुमारे १२ हजार ९१६ चौरस फुटांच्या जागेत उद्यानासह सौंदर्यीकरण केले जाणार आहे. या अंतर्गत प्रामुख्याने छोटा बगिचा, विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे. या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली स्केटिंग रिंग हे या उद्यानाचे महत्त्वाचे आकर्षण असणार आहे. या स्केटिंग रिंगमुळे परिसरातील लहान मुलांना व युवकांना स्केटिंग या क्रीडा प्रकाराचा सराव करण्यासाठी एक नवीन ठिकाण उपलब्ध होणार आहे.
परळ परिसरातील सेनापती बापट मार्गावर असलेल्या उड्डाणपुलाखालील सुमारे १० हजार ७६३ चौरस फुटांच्या जागेत उद्यान साकारले जाणार आहे, तर वरळी परिसरातील खान अब्दुल गफ्फारखान मार्ग हा जिथे डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गाला मिळतो. त्या ठिकाणी म्हणजेच डॉ. हेडगेवार चौक येथे डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गावरून जाणारा उड्डाणपूल आहे. याच उड्डाणपुलाखालील सुमारे सात हजार ५३४ चौरस फुटांच्या जागेत एक उद्यान साकारले जाणार आहे. या उद्यानाच्या सभोवताली विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे.

व्हर्टिकल गार्डन
कुतूब-ए-कोकण मगदूमअली माहिमी उड्डाणपूल (जे. जे. फ्लायओव्हर) हा सुमारे अडीच किलोमीटर लांबी असणारा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा उड्डाणपूल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जे. जे. रुग्णालयादरम्यानाची वाहतूक सुलभ करणारा हा पूल मोहम्मद अली मार्गावरून जातो. याच पुलाखालील तीन खांबांवर व्हर्टिकल गार्डन प्रकारातील बगिचे साकारण्यात येणार आहेत. या बगिच्यांसोबतच दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे.

भायखळा येथील खडा पारशी पुतळ्यालगत व अग्निशमन दलाच्या मुख्यालयाजवळ असणाºया वाय ब्रिज (खडा पारशी उड्डाणपूल)च्या चार खांबांवर उभे उद्यान साकारले जाणार आहे.
दादर स्टेशनच्या पश्चिमेला असलेल्या कवी केशवसुत उड्डाणपुलाखालील १२ खांबांवर या उद्यानाबरोबरच विद्युत
दिव्यांची रोषणाई व सुरक्षेच्या दृष्टीने कुंपणही केले जाणार आहे.

Web Title: Vertical Garden, Municipal Corporation's decision to grow on the bridges of flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.