Varun-Anushka's first look in 'Sui Thaaga' | 'सुई धागा' चित्रपटातील वरुण-अनुष्काचा ग्रामीण लूक
'सुई धागा' चित्रपटातील वरुण-अनुष्काचा ग्रामीण लूक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांना 'सुई धागा' चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. वरुण धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अनुष्का शर्माही दिसत आहे. दोघांचाही चित्रपटातील लूक अत्यंत साधा असणार असल्याचं पोस्टवरुन दिसत आहे. दोघांनीही साधे कपडे घातले असून, ग्रामीण अवतारात दिसत आहेत. त्यांच्या या फोटोमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजून वाढली आहे. 

चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना वरुण धवनने लिहिलं आहे की, 'एक्स्क्लूझिव्ह - मौजी आणि ममतला 28 सप्टेंबरला भेटा'. वरुण धवनच्या कॅप्शनवरुन तरी चित्रपटात वरुण मौजी आणि अनुष्का ममताची भूमिका साकारणार हे नक्की आहे. 

चित्रपटातील दोघांचाही लूक एकदम साधा आणि त्यांनी आतापर्यंत निभावलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा आहे. वरुण धवनचा लूक पाहिल्यानंतर अनेकांना बदलापूर चित्रपट आठवला असेल. आतापर्यंत ग्लॅमरस भूमिका निभावणा-या अनुष्कासाठी ही भूमिका नक्कीच आव्हानात्मक ठरली असेल. पोस्टरमध्ये ती साडी आणि स्वेटरमध्ये दिसत आहे. कुंकू भरलं असल्याने ती विवाहित महिलेची भूमिका निभावत असल्याचंही स्पष्ट आहे. 

शरत कटारिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. 28 सप्टेंबरला चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा ग्रामीण भागाशी संबंधित आहे. मध्य प्रदेशात या चित्रपटाचं शुटिंग सुरु आहे. वरुण-अनुष्काची जोडी ऑनस्क्रीन पाहण्याची चाहत्यांनाही उत्सुकता आहे. 
 


Web Title: Varun-Anushka's first look in 'Sui Thaaga'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.