पार्किंगची वाट बंद करण्यासाठी महिला बाऊन्सरचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 02:37 AM2019-06-11T02:37:10+5:302019-06-11T02:37:28+5:30

कांदिवलीतील प्रकार; गाड्यांचीही केली तोडफोड, कामगारांच्या घेरावानंतर विकासकावर गुन्हा दाखल

Use of female bouncer to stop parking in mumbai | पार्किंगची वाट बंद करण्यासाठी महिला बाऊन्सरचा वापर

पार्किंगची वाट बंद करण्यासाठी महिला बाऊन्सरचा वापर

Next

मुंबई : सोळाशेहून अधिक कामगार काम करत असलेल्या पार्किंग प्लॉटवर अचानक कुंपण आणि लोखंडी गेट लावून कांदिवलीतील एका विकासकाने वहिवाट बंद करण्याचा प्रयत्न केला. याचा विरोध करणाऱ्या कामगारांना महिला बाऊन्सरकडून धक्काबुक्की करत गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

याविरोधात कामगारांनी पोलीस ठाण्याला घेराव घातल्यानंतर समतानगर पोलिसांनी विकासक आणि महिला बाऊन्सरसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विकासक बसंत सेठीया, महिला बाऊन्सर गावीत तसेच अश्विन गौर, श्रवण सिंग, संतोष झा अशी या प्रकरणी समतानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यू इंडिया ड्रायव्हर्स युनियनचे अध्यक्ष समीर देसाई आणि उपाध्यक्ष तसेच तक्रारदार किरण साळुंखे यांचा महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या गाड्या भाडेतत्त्वावर पार्किंग करून त्या परराज्यात पाठविण्याचा व्यवसाय आहे. कांदिवलीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील नरसीपाडा येथील निर्मल चाळ परिसरातील मोकळ्या जागेत गेल्या ४० वर्षांपासून ते गाड्या पार्क करतात.
या जागेचे ते दरमहा २५ हजार रुपये भाडे जागा मालकाचे वारसदार दिनेश कोंब यांना देत आहेत. मात्र युनियनला कोणतीही पूर्वसूचना न देता ३१ मे, २०१९ ला या जागी कंपाउंड व लोखंडी द्वार बसवून तो मार्गच बंद करण्यात आला. तसेच महिला बाऊन्सर गावीतला त्या ठिकाणी तैनात करण्यात आले. या प्रकरणी युनियनने न्यायालयात धाव घेतल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही कोंब आणि सेठिया यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचे साळुंखे यांनी ठरवले. मात्र त्यांचे बोलणे ऐकून न घेता विकासकासाठी काम करणाºया गावीत आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्यांना धक्कबुक्की केली. तसेच पार्किंगमधील १० ते १५ गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली.

‘१६०० कामगार बेरोजगार होण्याची भीती’
या प्रकरणी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विकासकाची माणसे कामगारांना जुमानत नव्हती. अखेर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कामगारांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यानुसार पोलिसांनी सेठियासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. विकासकाच्या मनमानी कारभारामुळे १६०० कामगार बेरोजगार होण्याची भीती साळुंखे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Use of female bouncer to stop parking in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.