मुंबई : मुंबई विद्यापीठाचे यंदाचे १६०वे वर्ष असून, या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांपेक्षा निकालाला लागलेल्या लेटमार्कमुळे हे वर्ष विद्यार्थ्यांच्या चांगलेच लक्षात राहणार आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे नोव्हेंबर महिना उजाडूनही ४० हून अधिक विद्यार्थ्यांना निकाल मिळालेला नाही. वारंवार विद्यार्थी संघटनांनी निषेध करूनही विद्यापीठ निकाल लावत नसल्याने, आता निकाल मिळेपर्यंत विद्यापीठातून बाहेर पडणारच नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यासाठी गुरुवारपासून विद्यापीठात बेमुदत आंदोलन करण्यात येईल.
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता निकाल घेतल्याशिवाय विद्यापीठ सोडणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. गुरुवारपासून निकाल मिळेपर्यंत विद्यार्थी कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवनावर ठाण मांडून बसणार असल्याचा इशारा स्टुडंट लॉ कौन्सिलतर्फे देण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी विद्यापीठाने निकाल जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते, पण अजूनही पुनर्मूल्यांकनाचे आणि राखीव सर्व निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे आता निकाल घेतल्याशिवाय विद्यापीठ न सोडण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे गुरुवारपासून बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.