Unauthorized hawkers grew up | अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद वाढला
अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद वाढला

- अजय परचुरे 
मुंबई : दादर स्टेशनला लागून असलेल्या सेनापती बापट मार्गावर बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करायला महापालिकेचे अधिकारी तयार नाहीत, असे चित्र सध्या दिसून येत आहे़ मनुष्यबळाअभावी या अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करू शकत नाही, असे उत्तर देऊन महापालिकेने सोईस्कररीत्या आपले हात वर केले आहेत. दुसरीकडे स्थानिकांनी या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात दंड थोपटल्यानंतर फेरीवाल्यांनी दोन दिवसांपासून स्थानिकांच्या इमारतींच्या गेटवरच भाजीविक्री करायला सुरुवात करून आपली मनमानी सुरू केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे दादरच्या या परिसरात घाणीचे साम्राज्य उभे राहिलेले पाहायला मिळत आहे. रेल्वे स्टेशनपासून १५० मीटर अंतरावर फेरीवाले नसावे, हे पालिकेचे धोरणही धाब्यावर बसविले जात आहे़
येथील फेरीवाल्यांमुळे आणि ते करत असलेल्या कचºयामुळे येथे राहणाºया स्थानिक नागरिकांना त्रास होतो. या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिका प्रशासन आणि पोलिसांमध्ये तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही. यावर त्रस्त झालेल्या नागरिकांनी रविवारी एकत्र येत, स्वत: रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. यात स्थानिक नागरिकांनी या फेरीवाल्यांना रस्त्यावर अनधिकृतपणे आपल्या गाड्या लावून धंदा करण्यास मज्जाव केला आणि तत्काळ ही जागा सोडण्यासाठी सांगितले. तेव्हा फेरीवाले आणि नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाली. यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई करू, असे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले होते. मात्र, दोन दिवस उलटूनही प्रशासनाकडून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आता नेमके काय केल्याने अनधिकृत फेरीवाले हटतील, या विचारात येथील स्थानिक नागरिक आहेत़
>रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य
सेनापती बापट मार्गावरील स्थानिक नागरिकांनी ‘अनधिकृत फेरीवाला हटाव मोहीम’ राबविल्याने कोणताही फरक पडलेला नाही, पण स्थानिक नागरिकांच्या या आवेशानंतर अनधिकृत फेरीवाल्यांनी मात्र आपला उच्छाद अजून वाढविला आहे. स्थानिक नागरिकांना त्रास देण्यासाठी या अनधिकृत फेरीवाल्यांनी इमारतीच्या गेटसमोरच २ दिवसांपासून भाजीविक्रीचे स्टॉल्स लावण्यास सुरुवात केली आहे. पहाटे ५ वाजल्यापासून हे फेरीवाले इमारतींच्या गेटवर बिनदिक्कतपणे आपले स्टॉल्स लावत आहेत, तसेच भाजीविक्रीनंतर त्याच ठिकाणी सगळा कचरा टाकत असल्याने, सेनापती बापट मार्गावरील प्रत्येक इमारतीच्या प्रवेशद्वारावर कचºयाचे ढीग जमा झाले आहेत. हा कचरा दिवसभर त्याच ठिकाणी पडून राहत असल्याने, दुर्गंधीचे वातावरण परिसरात पसरत चालले आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या कचºयामुळे अनेक लहान मुलांना साथीचे रोगही झाले आहेत. या फेरीवाल्यांनी उच्छाद मांडल्याने, सकाळच्या वेळेत शाळेच्या बसही इमारतीच्या प्रवेशद्वारावर पोहोचू शकत नसल्याने, पालकांना प्रवेशद्वारासमोरून या अनधिकृत फेरीवाल्यांनी लावलेल्या स्टॉलसमोरून वाढ काढत, आपल्या मुलांना मुख्य रस्त्यावर शाळेची बस पकडण्यासाठी जावे लागत आहे.
>येथे राहणारा प्रत्येक स्थानिक नागरिक फेरीवाल्यांच्या या उच्छादाला आता कंटाळला आहे. महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डला आम्ही प्रत्यक्ष भेटून, पत्र लिहून आता वैतागलो आहोत. आमच्या इमारतींचे बिल्डरही याबाबतीत आमची कोणतीही मदत करत नाहीत. महापालिका प्रशासन आणि फेरीवाले यांचे संगनमत असल्याने, या कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आमचा थेट आरोप आहे. मागच्या वर्षी मुख्यमंत्री एका कार्यक्रमादरम्यान या भागात आले असताना, रस्ता पूर्ण चकाचक त्या दिवसापुरता करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होताच, दुसºया दिवसापासून पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सेनापती बापट मार्गावरील आम्ही सर्व स्थानिक नागरिकांनी ‘अनधिकृत फेरीवाला हटाव मोहीम’ स्वत:च हाती घेण्याचे ठरविले आहे. प्रशासन काम करत नसेल, तर आमच्या हक्कासाठी आता आम्हीच रस्त्यावर उतरून ‘हटाव मोहीम’ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- तृप्ती सिद्धार्थ जाधव, रहिवासी.


Web Title: Unauthorized hawkers grew up
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.