अघोरी लोक फक्त ‘मराठी’ उद्योगपतींच्याच मागे हात धुऊन लागतात काय?, डीएसकेंबाबत उद्धव ठाकरेंचा प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 07:39 AM2018-02-19T07:39:20+5:302018-02-19T07:41:32+5:30

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना शनिवारी (17 फेब्रुवारी)  दिल्लीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

Uddhav Thackeray's comments on D. S. kulkarni | अघोरी लोक फक्त ‘मराठी’ उद्योगपतींच्याच मागे हात धुऊन लागतात काय?, डीएसकेंबाबत उद्धव ठाकरेंचा प्रश्न 

अघोरी लोक फक्त ‘मराठी’ उद्योगपतींच्याच मागे हात धुऊन लागतात काय?, डीएसकेंबाबत उद्धव ठाकरेंचा प्रश्न 

googlenewsNext

मुंबई  -  पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना शनिवारी (17 फेब्रुवारी)  दिल्लीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. गुंतवणूकदारांची 230 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेपासून दिलेले संरक्षण शुक्रवारी उच्च न्यायालयाने काढून घेतल्याने डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. दरम्यान, या सर्व प्रकारावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डी.एस. कुलकर्णी यांच्या बाजूनं भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

''डीएसके पूर्ण बरबाद होऊन तुरुंगात जावेत यासाठी काही अघोरी शक्ती मुंबई-पुण्यात कार्यरत होत्या. मात्र हे अघोरी लोक फक्त ‘मराठी’ उद्योगपतींच्याच मागे हात धुऊन लागतात काय, असा प्रश्न पडतो. कारण आधी विजय मल्ल्या व आता नीरव मोदी यांच्याबाबत या अघोरी शक्तींनी एक चकार शब्दही काढलेला नाही. डीएसके वृद्ध आहेत व त्यांनी आतापर्यंत सचोटीने काम केले आहे. त्यांनाही विजय मल्ल्या व नीरव मोदींप्रमाणे पळून जाता आले असते. ते इथेच राहिले व तुरुंगात गेले. इथे मराठी माणूस दिसतो'', असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?
अखेर डी.एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे हे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून गाजते आहे. एका प्रतिष्ठत व प्रेरणादायी उद्योगपतीची ही धूळधाण क्लेशदायक आहे. ‘डीएसके’ हा बांधकाम व्यवसायातील विश्वासाचा शब्द होता. त्यामुळे अनेक ठेवीदार त्यांच्याकडे आकर्षित झाले, पण देशात मोदी यांचे राज्य आल्यापासून व नोटाबंदीचे तांडव सुरू झाल्यापासून आर्थिक मंदीची लाट उसळली. त्यात फक्त डीएसकेच नाहीत, तर देशातील अनेक मध्यम उद्योजक भुईसपाट झाले. उद्योग-व्यापाराची प्रचंड हानी गेल्या चारेक वर्षांत झाली आहे. डीएसके हे त्याच वावटळीचे बळी ठरले आहेत काय? सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे घरांची विक्री मंदावली. डीएसके समूहाची एकूण मालमत्ता ९ हजार १२४ कोटी रुपयांची आहे आणि कर्ज 1500 कोटींचे आहे, पण ही मालमत्ता विकली जाऊ नये व डीएसके पूर्ण बरबाद होऊन तुरुंगात जावेत यासाठी काही अघोरी शक्ती मुंबई-पुण्यात कार्यरत होत्या. मात्र हे अघोरी लोक फक्त ‘मराठी’ उद्योगपतींच्याच मागे हात धुऊन लागतात काय, असा प्रश्न पडतो. कारण आधी विजय मल्ल्या व आता नीरव मोदी यांच्याबाबत या अघोरी शक्तींनी एक चकार शब्दही काढलेला नाही. मल्ल्या व नीरव मोदी सरकारला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेले. 

त्यावरही या बोबड्य़ा अघोरींचे मतप्रदर्शन नाही. भाजप परिवारातील तरुण वर्गाची संपत्ती वर्षभरात सोळाशे किंवा सोळा हजार पटीने वाढते. त्यावर संशोधन नाही, पण डीएसके व इतरांच्या बाबतीत त्यांचा ‘नागोबा’ भ्रष्टाचारमुक्तीचा फणा काढतो. डीएसके यांचे म्हणणे असे की, ‘‘मी आजवर कुणालाही फसवलेलं नाही. सुरुवातीपासूनच माझा कारभार पारदर्शक राहिलाय. काही अडचणींमुळे पैसे परत करायला उशीर झाला. पैसे द्यायला उशीर होणं आणि फसवणं या दोन वेगवेगळ्य़ा गोष्टी आहेत. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब इथंच आहे. विजय मल्ल्याप्रमाणे आम्ही पळून गेलेलो नाही.’’ डीएसके यांच्या ‘मन की बात’वर न्यायालयाने विश्वास ठेवला नाही व ठेवीदारांनी रेटा लावला. त्यामुळे कुलकर्णी यांची रवानगी अखेर पोलीस कोठडीत झाली. एखादा उद्योग शून्यातून उभा करण्यासाठी अनेक वर्षे लागतात, पण तो कोसळून पडायला चार दिवसही पुरेसे होतात. न्यायालयात डीएसके यांच्यावर जे आरोप आता सरकार पक्षातर्फे करण्यात आले ते अस्वस्थ करणारे आहेत. याच डीएसकेंना पुणेकर कालपर्यंत डोक्यावर घेऊन नाचत होते व वृत्तपत्रे त्यांच्या जाहिराती छापत होते. अनेक ‘मराठमोळ्य़ा’ चमकदार कार्यक्रमांचे प्रायोजकत्व डीएसकेंनी स्वीकारावे म्हणून त्यांचे उंबरठे झिजवत होते. आम्ही यापैकी काहीएक केले नाही व त्यांच्या चहाच्या कपाचेही ओशाळे नाही, तरीही डीएसकेंची अवस्था पाहून मनात कालवाकालव होते. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे की, ‘‘डी. एस. कुलकर्णी यांनी अतिशय थंड डोक्याने व नियोजनबद्ध रीतीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. 

ज्याप्रमाणे एखाद्या खुनानंतर एक कुटुंब उद्ध्वस्त होते त्याप्रमाणे डी. एस. कुलकर्णी यांनी केलेल्या फसवणुकीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.’’ सरकारी वकिलांनी शब्दांचे तारे उत्तम तोडले आहेत, पण ही उद्ध्वस्त घरे उभी करण्याची काय योजना आहे? ‘घराला घरपण देणारी माणसे’ असे घोषवाक्य मिरवणाऱ्या डीएसके यांनी ‘ड्रीम सिटी’ हा प्रकल्प हाती घेतला. डीएसके हे नाव विश्वासाचे असल्याने अनेकांनी त्यात पैसे गुंतवले. त्यात ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर यांचा सहभाग होता. डीएसकेंनी या प्रकल्पातील गुंतवणूकदारांचे पैसे ‘इकडे तिकडे’ गुंतवून जो उद्योग केला तो ‘नोटाबंदी’मुळे पुढे त्यांच्या अंगलट आला. ते शिखरावर पोहोचले व तिथून कोसळले. आता काय करायचे? लोकांचे पैसे कसे परत करणार? डीएसके यांची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना पैसे परत करता येतील. न्यायालयाने पुण्यातील प्रतिष्ठत लोकांची एक समिती नेमून न्यायालयाच्या देखरेखीखाली डीएसकेंच्या मालमत्ता विकाव्यात व लोकांचे पैसे परत करावेत. डीएसके तुरुंगात गेल्यामुळे ज्यांना आनंदाच्या उकळ्य़ा फुटत आहेत त्यांनी ठेवीदारांच्या पैसे परतीची काय योजना समोर आणली आहे? डीएसके वृद्ध आहेत व त्यांनी आतापर्यंत सचोटीने काम केले आहे. त्यांनाही विजय मल्ल्या व नीरव मोदींप्रमाणे पळून जाता आले असते. ते इथेच राहिले व तुरुंगात गेले. इथे मराठी माणूस दिसतो.

Web Title: Uddhav Thackeray's comments on D. S. kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.