सरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 08:10 AM2017-12-26T08:10:22+5:302017-12-26T08:10:25+5:30

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय लष्करातील  4 जवान शहीद झाले. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray's attack on BJP, comments on ceasefire issue and modi govt strategy | सरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

सरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई - पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय लष्करातील  4 जवान शहीद झाले. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ''गुजरातच्या निवडणुकीनंतर ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची खूण दाखवत विजयी ढोल बडविणे हाच देशाभिमान आणि शौर्य असेल तर आमच्या जवानांच्या भडकलेल्या चिता म्हणजे निवडणूक प्रचाराची शेकोटी आहे काय? जम्मू-कश्मीरमध्ये आणि सीमेवर अशी नाचक्की गेल्या दोन-तीन दशकांपासून सुरू आहे. विद्यमान सरकारच्या काळात ती थांबेल असे वाटले होते, पण दुर्दैवाने दहशतवादी हल्ले आणि पाकड्यांचे गोळीबारही कमी झालेले नाहीत आणि आमच्या जवानांचे युद्धाशिवाय हुतात्मा होणेदेखील थांबलेले नाही. आपले सरकार बुळचट निघाले आहे. पाकड्यांचे हल्ले रोजच सुरू असून आमचे जवान मारले जात आहेत. तरीही केंद्र सरकार खुळचटासारखे बसून आहे.'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?
विजयाचे ढोल वाजवा!
देशातील सरकार खरोखर खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय? सरकारचा प्रवास नामर्दानगीच्या दिशेने सुरू झाला आहे काय? सरकारच्या शौर्याचा बुडबुडा फुटला आहे काय? बेडूक फुगला होता आणि त्या बेडकाचे पोट फुटले आहे काय? ढोल वाजवून आनंद साजरा करणाऱ्यांचा ढोल आधीपासूनच फुटका होता काय? असे अनेक प्रश्न फक्त आमच्या मनात घुसळत नसून सामान्य जनतेच्या मनातही उसळत आहेत. हे प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा आमच्यावर मोदीविरोधाचा ठपका ठेवला जातो, पण कश्मीरात काल जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील असाच आक्रोश करून देशवासीयांच्या मनातील भावनांनाच वाट मोकळी करून दिली आहे. एका सैनिकाचे मरण हे देशाचे मरण असते व कोणताही सैनिक युद्धाशिवाय मारला जातो तेव्हा ती सरकारची नाचक्की ठरते. जम्मू-कश्मीरमध्ये आणि सीमेवर अशी नाचक्की गेल्या दोन-तीन दशकांपासून सुरू आहे. विद्यमान सरकारच्या काळात ती थांबेल असे वाटले होते, पण दुर्दैवाने दहशतवादी हल्ले आणि पाकड्यांचे गोळीबारही कमी झालेले नाहीत आणि आमच्या जवानांचे युद्धाशिवाय हुतात्मा होणेदेखील थांबलेले नाही. आपले सरकार बुळचट निघाले आहे. पाकड्यांचे हल्ले रोजच सुरू असून आमचे जवान मारले जात आहेत. तरीही केंद्र सरकार खुळचटासारखे बसून आहे. ‘‘पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्यास सरकार घाबरते आहे काय?’’ असा सवाल पंजाबमधील शहीद शिपाई परगत सिंगच्या वडिलांनी केला आहे. आमचे जवान गस्त घालीत होते तेव्हा पाकिस्तानचे सैतान आमच्या जवानांवर गोळीबार करीत होते. 
पंतप्रधानांसह सारे मंत्रिमंडळ गुजरातेत निवडणूक प्रचाराच्या ‘वाफा’ दवडीत होते तेव्हा पाकडे आमच्या जवानांवर ‘तोफा’ डागीत होते. कश्मीरात शांतता व सुव्यवस्था परतली आहे असा दावा करणाऱ्यांचे हे फोलपण आहे. गुजरातमधून विकास हरवला आणि कश्मीरच्या सीमेवरून सुव्यवस्था व शांतता हरवली. कश्मीरातील तरुणांनी आता हातात ‘दगड’ घेणे सोडले आहे, पत्थरबाजी कमी झाली आहे हे सरकारचे म्हणणे मान्य आहे, पण कश्मीरचा भूमिपुत्र तरुण आता थेट दहशतवादी बनत असल्याच्या बातम्या धक्कादायक आहेत. एखाद्याने ‘ताडी’ पिणे सोडले याचे कौतुक आहे, पण ताडी सोडून त्याने आता भांग व बेवडा पिणे सुरू केले आहे व ही भांग-बेवडा पुरवण्याचे काम आजही सीमेपलीकडून सुरू आहे. हे सर्व काँग्रेस राजवटीत घडले असते तर आम्ही हंगामा केला असता व चार जवानांच्या बलिदानाची किंमत मोजण्यासाठी संसदेचे अधिवेशन बंद पाडण्याचे शौर्य गाजवले असते, पण काल शहीद झालेल्या चारही जवानांचे शौर्य सरकारी अंत्यसंस्कारांच्या इतमामात विरघळून गेले आहे. राजौरी जिल्हय़ातील केरी सेक्टर येथे पाकड्यांनी जो हल्ला केला त्यात महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झाले. पंजाब, हरयाणातील लान्स नायक गुरमेल सिंग, शिपाई परगत सिंग, लान्स नायक कुलदीप सिंग हेदेखील शहीद झाले. शेवटी देशाच्या रक्षणासाठी मरणारे महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, हरयाणा व इतर अनेक प्रांतांतले लोक आहेत. त्यांचा

‘जीएसटी’ घटविण्याशी व नोटाबंदीशीवसंबंध नाही. गुजरातमधील निवडणुका जिंकण्यासाठी व सुरतमधील संतप्त व्यापाऱ्यांची मते मिळविण्यासाठी ‘जीएसटी’त अनेक सवलती दिल्या गेल्या, पण सीमेवरील जवानांचे प्राण वाचविण्यासाठी तुम्ही काय केले? शेकडो जवान आजपर्यंत शहीद झाले, त्यांची कुटुंबे पोरकी झाली. मेजर प्रफुल्लचे लग्न तर चार वर्षांपूर्वीच झाले होते. शहीद परगत सिंगचे आई-वडील वृद्ध आहेत व त्यालाही फक्त चार वर्षांचा मुलगा आहे. माझा मुलगा शहीद झाल्याचा मला अभिमान असल्याचे त्या वृद्ध पित्याने सांगितले, पण शेवटी कालच्या चारही शहीदांच्या भडकलेल्या चितांची ठिणगी १२५ कोटी जनतेच्या मनातील लाव्हा बनून विचारीत आहे.‘‘सरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय?’’ गुजरातच्या निवडणुकीनंतर ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची खूण दाखवत विजयी ढोल बडविणे हाच देशाभिमान आणि शौर्य असेल तर आमच्या जवानांच्या भडकलेल्या चिता म्हणजे निवडणूक प्रचाराची शेकोटी आहे काय? आमच्या परिजनांचे अश्रू व पोरके झालेल्यांचे हुंदके म्हणजे राज्यकर्त्यांचे मनोरंजन आहे काय? व्यापाऱ्यांसाठी सरकार झुकते, पण सैनिकांची बलिदाने रोखण्यासाठी कुणाला काय पडले आहे? गुजरात, हिमाचल जिंकले आहे. सीमेवर जवानांचे रक्त सांडते आहे. आता पुढच्या निवडणुका कधी आहेत? शहीद परगत सिंग याच्या वडिलांचा आक्रोश हिमालयासही हादरे देत आहे. आम्ही अस्वस्थ आहोत.


 

Web Title: Uddhav Thackeray's attack on BJP, comments on ceasefire issue and modi govt strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.