केजरीवालांवरील हल्ल्यानंतर 'सामना' रंगला, मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 08:44 AM2018-11-22T08:44:00+5:302018-11-22T08:45:08+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या मिरची पूड हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

Uddhav Thackeray slams modi government over chilly attack on cm arvind kejriwal | केजरीवालांवरील हल्ल्यानंतर 'सामना' रंगला, मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा बाण

केजरीवालांवरील हल्ल्यानंतर 'सामना' रंगला, मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा बाण

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या मिरची पूड हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा हे दिल्ली पोलिसांचेच काम आहे व दिल्ली पोलिसांचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे संशयाला जागा आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवाय, गेल्या चार वर्षांत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाहीर थपडा खूप खाल्ल्या, पण त्यांच्या चिकाटीचे कौतुक करावे लागेल. राजकारणात शाईफेक, चप्पलफेक, मिरचीपूड फेकीस प्रतिष्ठा मिळत आहे. हा लोकांचा संताप असेल तर थापेबाजी, जुमलेबाजी, महागाई, भ्रष्टाचार व देश विकणाऱ्या सौद्यांच्या विरोधात या संतापाच्या ठिणग्या का उडत नाहीत?, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे
-  मोदी किंवा केजरीवाल हे पदावर नको असतील तर त्यांचा पराभव निवडणुकीच्या माध्यमातून व्हावा. मात्र अलीकडे राजकीय विरोधाचे भलतेच प्रकार अवलंबिले जात आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर दिल्लीच्या मंत्रालयात मंगळवारी ‘मिरचीपूड’ हल्ला झाला. 
-  भारतीय जनता पक्षाने हा हल्ला केला असा आरोप ‘आप’च्या मंडळींनी करणे स्वाभाविक आहे. कारण केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची आणि त्यांच्या आम आदमी पक्षाची राजकीय कोंडी करण्याचे हरतऱहेने प्रयत्न होत आहेत. 
-  केजरीवाल व केंद्र सरकार यांच्यात पहिल्या दिवसापासून संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांना चपराशाइतकेही अधिकार मिळू नयेत व त्यांनी आपल्या खुर्चीवर फक्त मफलर गुंडाळून खोकत बसावे अशी योजना लेफ्टनंट गव्हर्नरांमार्फत केंद्राने राबवली. त्यासही ‘आप’चे लोक पुरून उरले. 
-  मोदींची प्रचंड तुफानी लाट असतानाही दिल्लीत ‘आप’समोर भाजपने गटांगळय़ा खाल्ल्या व पाच आमदारही त्यांना निवडून आणता आले नाहीत. या पराभवाची वेदना टोचणे स्वाभाविक असले तरी त्यासाठी राज्य वेठीस धरणे कितपत योग्य आहे? 
- दिल्ली हा केंद्रशासित भाग आहे व त्यास पूर्ण राज्याचा दर्जा नाही. तरीही ‘आप’ सरकारने दिल्लीतील शिक्षण व्यवस्था व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारून दाखवली. सरकारी शाळा व सरकारी दवाखान्यांवर ‘उपचार’ करून त्यांचे आरोग्य उत्तम करण्याचे काम केजरीवाल सरकारने केले व चांगल्याला चांगले म्हणणे हा आमचा स्वभाव आहे. 
- दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केजरीवाल सरकारचा विषय नाही, पण दोन भयंकर अपराधी दिल्लीत घुसले असल्याची छायाचित्रे दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध केली. अतिरेकी दिल्लीत घुसत असताना पोलीस काय करीत होते? त्यावेळी पोलिसांच्या डोळ्यांत कुणी मिरचीपूड फेकली होती काय? हा प्रश्न आहेच. 
-  केंद्रातले संपूर्ण सरकार राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या निवडणूक युद्धात उतरल्यावर दिल्लीला वाली कोण? 
- दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा हे दिल्ली पोलिसांचेच काम आहे व दिल्ली पोलिसांचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे संशयाला जागा आहे. 

Web Title: Uddhav Thackeray slams modi government over chilly attack on cm arvind kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.