... म्हणून सहगल यांचा बोलता गळा दाबणे संमेलनवाल्यांना शोभणारे नाही - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 07:22 AM2019-01-08T07:22:55+5:302019-01-08T07:42:41+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण रद्द केले. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Uddhav Thackeray slams bjp government over marathi sahitya sammelan cancelled the invitation of author Nayantara Sahgal | ... म्हणून सहगल यांचा बोलता गळा दाबणे संमेलनवाल्यांना शोभणारे नाही - उद्धव ठाकरे

... म्हणून सहगल यांचा बोलता गळा दाबणे संमेलनवाल्यांना शोभणारे नाही - उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्देनयनतारा सहगल या स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर लेखिका आहेत - उद्धव ठाकरेयनतारांचे कुळ व मूळ मराठी व कोकणातले आहे - उद्धव ठाकरे नयनतारांनी आणीबाणीत इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवला होता - उद्धव ठाकरे

मुंबई - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण रद्द केले.  '92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'मध्ये नयनतारा सहगल उपस्थित राहणार म्हणून वादंग सुरू झाले होते. यावर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाष्य केले आहे. 

''स्वतंत्र बाण्याच्या लेखिका नयनतारा सहगल यांची भूमिका न पटणारी आहे म्हणून त्यांचा बोलता गळा दाबणे मराठी साहित्य संमेलनवाल्यांना शोभणारे नाही. 1975 च्या पूर्वी देशात हीच स्थिती होती. गुप्त भयाच्या व कारस्थानाच्या सावल्या फिरत होत्या. त्याचे रूपांतर एके मध्यरात्री आणीबाणीत झाले. अशाच गुप्त भयाच्या सावल्या यवतमाळच्या साहित्य संमेलनावर फिरताना कुणाला दिसल्या काय आणि त्यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी यवतमाळची आणीबाणी लादली आहे काय?'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारला चिमटा काढला आहे.
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे 
- देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी असे प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांनी म्हटले आहे. यवतमाळच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास त्यांना उद्घाटक म्हणून बोलावले होते, पण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांची नयनतारा यांच्या भाषणाने गोची होऊ शकते, अशी भीती वाटल्याने त्यांचे निमंत्रण रद्द केले आहे. उद्घाटकाचेच निमंत्रण रद्द करण्याचा इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. 

(नयनतारा सहगल यांना संमेलनात येऊ न देणे चुकीचे)
- नयनतारा सहगल या स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर लेखिका आहेत. त्यांचे विचार यवतमाळच्या साहित्य संमेलनात राज्यकर्त्यांना काटय़ासारखे टोचतील व राज्यकर्त्या पक्षाची नाराजी साहित्य संस्थांना भोगावी लागेल या भयातून हे निमंत्रण रद्द केले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात आता साहित्य सहवास कमी व राजकीय गुंता जास्त झाला आहे.  
- अखिल भारतीय या पाटीखाली होणाऱ्या संमेलनात एखाद्या ‘राष्ट्रीय’ विषयावर धाडसाने भूमिका घेतल्याचे उदाहरण अलीकडच्या काळात नाही. जसे वीर सावरकरांनी ‘लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या’ असे आवाहन साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केले होते तसे साहित्यिक ‘वीर’ आज दिसत नाहीत व जे आहेत त्यांना नयनतारांप्रमाणे रोखले जाते. 

(नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही - राज ठाकरे)
- नयनतारा या अमराठी आहेत म्हणून त्यांना विरोध करणारे स्थानिक राजकीय पक्ष शेवटी कुणाच्या तरी हातचे बाहुले बनूनच विरोध करीत होते. नयनतारांचे कुळ व मूळ मराठी व कोकणातले आहे. 
- मुख्य म्हणजे ज्या नयनतारांची आजच्या राज्यकर्त्यांना भीती वाटते त्या नयनतारांनी आणीबाणीत इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवला होता व त्याबद्दल त्यांना अटकही झाली होती. म्हणजेच त्या एखाद्या राजकीय पक्षाच्या व विचारसरणीच्या विरोधात नसून जे भंपक, खोटे व अतिरेकी आहे त्या विरोधात आहेत. 
- गोवंश, गोमांसावरून होणाऱ्या हत्या, द्वेषाचे राजकारण, राजकीय सूडासाठी वापरली जात असलेली सरकारी यंत्रणा, पत्रकारांवरील राजकीय दबाव, लेखकांचे दिवसाढवळय़ा पडणारे खून याबद्दल प्रत्येक नागरिकाला लाज वाटायला हवी, असे मत श्रीमती सहगल यांनी त्यांच्या छापील भाषणात व्यक्त केले व ते त्यांनी आधीच संमेलनाच्या आयोजकांकडे पाठविले. त्यामुळे नयनतारा यांनी संमेलनास येणे म्हणजे सरकारी मेहेरबानीस मुकणे असा व्यापारी विचार संमेलन आयोजकांनी केलेला दिसतो. 
- नयनतारा व्यासपीठावर आहेत म्हणून कदाचित मुख्यमंत्री महाशयांनी येण्याचे टाळले असते. त्यामुळे नयनतारा यांनाच टाळून लेखक-साहित्यिकांनी स्वाभिमान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आपल्याच हातांनी केला. आता कोणत्या तोंडाने तुम्ही गळचेपी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणार? ‘‘हा देश फक्त हिंदूंचा आहे, असं काहींना वाटतं. 
- गोमांस सापडल्याच्या संशयावरून, गाईंच्या तस्करीच्या अफवेवरून हिंसाचार सुरू आहे. या हल्लेखोरांना सत्ताधाऱयांचा आशीर्वाद आहे. देशातील या परिस्थितीची भारतीय म्हणून लाज वाटायला हवी,’’ अशी भावना सहगल त्यांच्या भाषणात व्यक्त करत होत्या. 

Web Title: Uddhav Thackeray slams bjp government over marathi sahitya sammelan cancelled the invitation of author Nayantara Sahgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.