इंधन दरांचा भडका शांत करायचा सोडून हात कसले झटकताय? - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 07:41 AM2018-09-12T07:41:14+5:302018-09-12T07:41:21+5:30

Bharat Bandh : इंधन दरवाढीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

uddhav thackeray slams BJP Government over Fuel Hike and bjp statement of fuel price | इंधन दरांचा भडका शांत करायचा सोडून हात कसले झटकताय? - उद्धव ठाकरे 

इंधन दरांचा भडका शांत करायचा सोडून हात कसले झटकताय? - उद्धव ठाकरे 

googlenewsNext

मुंबई - इंधन दरवाढीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी सोमवारी (10 सप्टेंबर) भारत बंदची हाक दिली होती. विरोधकांचे हे आंदोलन फसल्याचा दावा भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. शिवाय, तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनावर परिणाम झाल्यानं वाढले आहेत. भारत तेलासाठी आयातीवर अवलंबून असून, जागतिक बाजारात तेलाची टंचाई आहे, असेही त्यांनी सांगितले. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. 

''महागाईच्या झळा कशा विझतील, इंधन दरांचा भडका कसा शांत होईल हे पाहावे. ते करायचे सोडून त्यावरून हात कसले झटकताय? लोकांनी सत्ता मिळवून दिली ती काही अशा प्रश्नावरून हात झटकण्यासाठी नाही!'',अशा शब्दांत खडेबोल सुनावले आहेत.

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे :
- विरोधकांनी बंदची तयारी नीट केली नव्हती किंवा बंद यशस्वी करणारी यंत्रणा हाताशी नव्हती. पुन्हा लोकांचे मन ते वळवू शकले नाहीत. त्यामुळे फसफसलेल्या बंदचे खापर त्यांनी शिवसेनेवर फोडले व स्वतःच्या जबाबदारीच्या काखा वर केल्या. 

- ‘बंद’बाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी वगैरे असल्याची टाळी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी वाजवली आहे. चव्हाणांनी या विषयावर न बोललेलेच बरे. त्यांना बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना हवी, पण पालघरच्या पोटनिवडणुकीत त्यांना भाजपविरोधी एकजुटीचे वावडे होते. 

- इंधन दरवाढीपासून अनेक प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. आम्ही लोकांच्या बाजूनेच आहोत व त्यासाठी काँग्रेससारख्या पक्षाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. आम्हाला आश्चर्य वाटते ते याचे की, इकडे ‘बंद’ची धडपड सुरू असताना सरकारने पुन्हा ठणकावून सांगितले की, इंधनाचे दर वाढतच राहतील. त्यावर नियंत्रण ठेवणे आमच्या हाती नाही. 

- सरकारचे म्हणणे असे की, पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि चढउतारांवर अवलंबून असतात आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर नियंत्रण ठेवणे सरकारच्या कक्षेबाहेर आहे. 

- थोडक्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा जनतेने सरकारकडून करू नये असेच सत्ताधाऱ्यांना म्हणायचे आहे.  जनता सरकारकडून नाही तर कुणाकडून अपेक्षा करणार? 

- जागतिक घडामोडींचा हवाला देत इंधन दरवाढ कमी करण्याच्या जबाबदारीतून सत्ताधाऱ्यांनी अंग काढून घेऊ नये. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या वाढलेल्या किमतींचे तुणतुणे वाजविणे आता सरकारने थांबवावे आणि महागाईच्या वणव्यापासून सामान्य जनतेची कशी सुटका करता येईल याचा विचार करावा. 

- इंधनाचा भडका उडाला म्हणून आंतरराष्ट्रीय भाषा आणि एरवी ‘मन की बात’ हे बरोबर नाही. पंतप्रधान मोदी यांचा आंतरराष्ट्रीय संचार मोठा आहे. त्यामुळे तेलाचे आंतरराष्ट्रीय अर्थकारण त्यांनी पाहावे. 

- महागाईच्या झळा कशा विझतील, इंधन दरांचा भडका कसा शांत होईल हे पाहावे. ते करायचे सोडून त्यावरून हात कसले झटकताय? लोकांनी सत्ता मिळवून दिली ती काही अशा प्रश्नावरून हात झटकण्यासाठी नाही!

Web Title: uddhav thackeray slams BJP Government over Fuel Hike and bjp statement of fuel price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.