uddhav thackeray press conference on judiciary | न्यायदेवतेला मुकी-बहिरी करण्याचा प्रयत्न नको- उद्धव ठाकरे

मुंबई- सुप्रीम कोर्टाच्या कारभारावर बोट ठेवणाऱ्या कोर्टाच्या चारही न्यायाधीशांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतूक केलं आहे. 'हे चारही न्यायाधीश कौतूकास पात्र आहेत. कदाचित त्यांच्यावर कारवाई होईल. पण ही कारवाई पक्षपाती होता कामा नये,' असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. 'या मुद्दयावर कुणी राजकारण करू नये. न्यायव्यवस्था ही आंधळी असल्याचं म्हटलं जातं. ती निःपक्षपातीपणाने निर्णय देते म्हणून, तिला आंधळी म्हटलं जातं. पण, याच न्याय व्यवस्थेला आंधळी आणि बहिरी करण्याचं काम कोणी करू नये', असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. शनिवारी शिवसेना भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेणं धक्कादायक होतं. तरीही या चारही न्यायाधीशांचं कौतूक झालं पाहिजे. मुळात त्यांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या तक्रारींच्या खोलात जायला हवं आणि कोणत्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप न करता तसेच या विषयाचं राजकरण न करता. या तक्रारींचा निवाडा व्हायला हवा, असं त्यांनी सांगितलं. आता न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही हा लोकांना प्रश्न पडलाय असं सांगतानाच सरकारने न्यायव्यवस्थेला त्यांचं काम करू द्यावं, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 
 राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबई भेटीवर येत आहेत यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपती मुंबईत यावेत असं काय काम आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 'देशातील लोक आपली जबाबदारी पार पाडत आहेत का? हा प्रश्न निर्माण झालाय. फक्त निवडणुका जिंकणं म्हणजेच कारभार होत नाही,' असा टोलाही उद्धव यांनी लगावला.