सोनिया गांधी २०१९ साली भाजपास रोखणार म्हणजे नेमके काय करणार?, उद्धव ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 07:34 AM2018-03-15T07:34:44+5:302018-03-15T07:34:44+5:30

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या डिनर डिप्लोमसीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपहासात्मक टीका केली आहे.

uddhav thackeray criticized sonia gandhi on dinner diplomacy in saamna editorial | सोनिया गांधी २०१९ साली भाजपास रोखणार म्हणजे नेमके काय करणार?, उद्धव ठाकरेंचा सवाल

सोनिया गांधी २०१९ साली भाजपास रोखणार म्हणजे नेमके काय करणार?, उद्धव ठाकरेंचा सवाल

googlenewsNext

मुंबई - काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या डिनर डिप्लोमसीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपहासात्मक टीका केली आहे. सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनामध्ये 20 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. या सर्वांचा सामनामध्ये भोजनभाऊ असा उल्लेख करण्यात आला आहे. ''पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भाजप पुढील निवडणुका लढेल. मग जे २० भोजनभाऊ सोनियांच्या बंगल्याच्या हिरवळीवर जमले ते कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहेत? सोनिया गांधी यांनी सगळय़ांना जेवायला बोलावले. एकत्र येऊन फोटो काढले, पण विरोधकांनी रणशिंग फुंकल्याची भावना तेथे दिसली नाही. सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तानचे वाकडे काहीच झाले नाही. सोनियांनी बोलावलेल्या भोजनभाऊंचेही तशा सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे होऊ नये'', अशी उपहासात्मक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

- काय आहे आजचे सामना संपादकीय?
सोनिया गांधी यांनी दिल्लीत एक ‘डिनर डिप्लोमसी’ नावाचा प्रयोग केला. या रात्रभोजनास २० राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पोहोचले. दिल्लीत अशा राजकीय भोजनावळी होतच असतात व अनेक भोजनभाऊ अशा जेवणावळीस हजर राहतात. भाजपविरोधात मजबूत आघाडी उभारण्याचा सोनियांचा प्रयत्न आहे. चारेक दिवसांपूर्वी सोनिया गांधी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी मुंबईत अवतरल्या होत्या व त्या व्यासपीठावरून त्यांनी जाहीर केले की, ‘‘काही झालं तरी २०१९ साली भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखू!’’ सोनिया गांधी २०१९ साली भाजपास रोखणार म्हणजे नेमके काय करणार? कोणताही आगापिछा नसलेल्या भोजनभाऊंचा गोतावळा जमवून त्या भाजपास रोखू शकतात काय? गुजरात निवडणुकीत काँग्रेसने मोदी-शहांच्या भाजपास घाम फोडला हे खरे आहे व राहुल गांधी यांनी त्यासाठी मेहनत घेतली. याच दरम्यान राहुल गांधी यांनी काँग्रेस नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतली, पण रात्रभोजनाचे निमंत्रण सोनियांना द्यावे लागले. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते चि. राहुल यांनी दिले असते तर किती भोजनभाऊंनी स्वीकारले असते, ज्या वीसेक लोकांनी सोनियांच्या भोजनाचा आस्वाद घेतला त्यातील कितीजणांना जनाधार आहे, हा चर्चेचा विषय आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजे एनडीएत अनेक पक्षांची ताकद ही एक खासदार निवडून आणण्याइतकीही नाही, पण ते एनडीएच्या बैठकीत हात ओला करायला येत-जात असतात. 
बिहारचे तेजस्वी यादव, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, बसपाचे सतीश मिश्र, महाराष्ट्राचे शरद पवार अशा काही मोजक्या मंडळींचे महत्त्व आहे, पण ‘यूपीए’चा रथ ते किती वेगाने पुढे नेणार? मोदी-शहा यांच्या पक्षाचे लोकसभेतील बळ २८० खासदारांचे आहे. म्हणजे संपूर्ण बहुमत आहे, तर काँग्रेसकडे पन्नासही खासदार नाहीत. इतर सर्व मिळून दीडशे होत नाहीत ही २०१४ ची परिस्थिती होती. २०१९ साली ती नक्कीच बदलेल. उत्तर प्रदेश व बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपास काल जे हादरे बसले ते विरोधकांना ऊर्जा देणारे आहेत. लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. आपण फसवलो गेलो आहोत अशी भावना लोकांत आहे; पण या असंतोषाला चूड लावणारे नेतृत्व आज विरोधकांत नाही. तेलगू देसमने केंद्र सरकारमधून राजीनामे दिले आहेत, पण त्यांचे आतून एक संधान आहे. आंध्रातील जगमोहन हेसुद्धा काँग्रेसबरोबर नाहीत. ममता बॅनर्जी, नवीन पटनायक यांची नक्की भूमिका काय? पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भाजप पुढील निवडणुका लढेल. मग जे २० भोजनभाऊ सोनियांच्या बंगल्याच्या हिरवळीवर जमले ते कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहेत? 
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची चढती कमान आज किंचित दिसत आहे, पण ते तालेवार नेते होऊ शकत नाहीत. शरद पवार, ममता बॅनर्जी, मायावती यांची पंतप्रधान व्हायची इच्छा अमर आहे. मुळात ममता बॅनर्जी या भाजपविरोधात वेगळ्या आघाडीचा फटाका बनवीत आहेत. पण प. बंगालच्या पुढे या फटाक्याचा आवाज नाही. राहुल गांधी यांनी सर्वप्रथम काँग्रेस संघटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मोदी यांनी स्वतःची प्रतिमाही मोठय़ा पडद्यावरील हीरोसारखी केली. मोदी यांच्या प्रतिमेशी त्यांना लढावे लागेल. देशात भ्रष्टाचार, घोटाळा, गरिबी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आहेच, पण या सगळय़ांवर मोदी काहीच बोलत नाहीत. ते परदेशातील नेत्यांना येथे बोलावतात व वाराणसीत नेऊन गंगाकिनारी होळी खेळतात. जे काही प्रश्न जनतेला भेडसावत आहेत त्यांच्याशी जनतेनेच झुंज द्यावी असे त्यांना वाटत असावे. त्रिपुरात बेरोजगारी आहे म्हणून भाजपने डाव्यांचे सरकार पराभूत केले, पण देशातील बेरोजगारी रोज वाढते आहे. महाराष्ट्रात ती सर्वाधिक वाढते आहे. या भस्मासुराशी लढण्याची कोणती योजना भोजनभाऊंपाशी आहे? यातील काही नेते फक्त भाषणबाजीपुरतेच उरले आहेत. सोनिया गांधी यांनी सगळय़ांना जेवायला बोलावले. एकत्र येऊन फोटो काढले, पण विरोधकांनी रणशिंग फुंकल्याची भावना तेथे दिसली नाही. सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तानचे वाकडे काहीच झाले नाही. सोनियांनी बोलावलेल्या भोजनभाऊंचेही तशा सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे होऊ नये.

Web Title: uddhav thackeray criticized sonia gandhi on dinner diplomacy in saamna editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.