नवज्योतची पाकिस्तानातली नाचेगिरी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 07:31 AM2018-08-20T07:31:15+5:302018-08-20T07:44:44+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेले पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा सामना संपादकीयमधून समाचार घेण्यात आला आहे.

Uddhav Thackeray Criticized navjot singh sidhu for hugging Pak army chief | नवज्योतची पाकिस्तानातली नाचेगिरी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस - उद्धव ठाकरे

नवज्योतची पाकिस्तानातली नाचेगिरी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस - उद्धव ठाकरे

googlenewsNext

मुंबई - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेले पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा सामना संपादकीयमधून समाचार घेण्यात आला आहे. या सोहळ्यादरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची घेतलेली गळाभेटी यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे.  

''ज्या पाकी लष्करप्रमुखांना नवज्योतसिंग सिद्धू याने मिठी मारली त्याच लष्करप्रमुखांच्या प्रेरणेने कश्मीरात व सीमेवर हिंसाचार सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांत मेजर कौस्तुभ राणेसह पंधरा जवान पाकड्यांशी लढताना शहीद झाले व नवज्योत मात्र पाकिस्तानात जाऊन नाचेगिरी करतो हा निर्लज्जपणाचा कळस आहे. सिद्धूने शेण खाल्ले आहेच व त्याबद्दल त्यास जनतेनेच जाब विचारायला हवा. कधी शशी थरूर तर कधी मणिशंकर अय्यरसारखे लोक तोंडाच्या वाफा दवडतात व राहुल गांधींना अडचणीत आणतात. सिद्धू प्रकरणात तेच झाले. सुनील गावसकर, कपिलदेव यांनाही इम्रानचे खास आमंत्रण होतेच. या दोघांनीही इम्रानला नकार दिला, पण सिद्धू मात्र बेडकासारखा उडी मारत गेला. त्याच्या राष्ट्रभक्तीच्या ढोंगाचा फुगा त्यामुळे फुटला'', अशा शब्दांत सिद्धूंवर टीका करण्यात आली आहे.

- काय आहे आजचे सामना संपादकीय? 
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांचे सहकारीच गोत्यात आणत असतात. पंजाबचे एक मंत्री व प्रख्यात बोलबच्चन नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानात जाऊन शेण खाल्ले. त्याचे शिंतोडे काँग्रेस अध्यक्षांवर उडत आहेत. इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्यास नवज्योत सिद्धू पोहोचला. घरचेच लग्नकार्य असावे अशा थाटात तो त्या सोहळ्यात मिरवला. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना त्याने प्रेमाने गळाभेट दिली व त्यावेळी नवज्योत याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. चित्र तर असे दिसत होते की, नवज्योत हा इम्रानचा पाहुणा नव्हता तर सोहळ्याचा यजमान होता. पाकिस्तानात जाऊन हे असले उद्योग करण्याची सिद्धूला काय गरज होती? नवज्योतशिवाय इम्रानचा शपथग्रहण सोहळा अडून राहिला असता काय? ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ असाच हा प्रकार. गेल्या महिनाभरापासून कश्मीरात अतिरेकी, पाक सैन्य व आपल्यात चकमकी वाढल्या आहेत. ज्या पाकी लष्करप्रमुखांना नवज्योतसिंग सिद्धू याने मिठी मारली त्याच लष्करप्रमुखांच्या प्रेरणेने कश्मीरात व सीमेवर हिंसाचार सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांत मेजर कौस्तुभ राणेसह पंधरा जवान पाकड्यांशी लढताना शहीद झाले व नवज्योत मात्र पाकिस्तानात जाऊन नाचेगिरी करतो हा निर्लज्जपणाचा कळस आहे. नवज्योतला इम्रानच्या शपथविधी सोहळ्यात जाणे जमले, पण मेजर राणेंच्या कुटुंबास भेटणे जमले नाही. टीव्हीच्या पडद्यावर किंवा जाहीर सभांतून देशभक्तीची गाणी म्हणणे हे त्याचे ढोंगच असते असाच याचा अर्थ. मनात देशभक्तीची ज्योत पेटत असती तर त्याने पाकड्यांच्या प्रदेशात जाऊन तेथील लष्करप्रमुखांना
मिठ्या मारण्याचा मूर्खपणा केला नसता.

पुन्हा वर ‘मी पाकिस्तानात शांततेचा संदेश घेऊन गेलो’ असे त्याने सांगितले. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनीही म्हणे ‘त्यांना शांतता हवी आहे’ असे त्याला मिठी मारताना सांगितले असा या महाशयांचा दावा आहे. सिद्धूला पाकप्रेमाचा एवढाच उमाळा आला असेल तर मग त्याने पाकिस्तानातूनच निवडणूक लढवावी. नाहीतरी पाक पंतप्रधान इम्रान खानच्याच ‘तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाचे एक खासदार जावेद फैझल यांनी सिद्धूचे तोंडभरून कौतुक करीत त्याला त्यांच्या देशातून निवडणूक लढविण्याची ऑफर दिलीच आहे. सिद्धू आधी भाजपमध्ये होता व नंतर काँग्रेसमध्ये गेला. त्याचा मूळ रक्तगट भाजपचाच आहे. त्यामुळे सिद्धू पाकिस्तानात गेला म्हणून काँग्रेसवर वार करण्यापेक्षा भाजपवाल्यांनी सिद्धू आपल्या पक्षात असताना नेमके काय संस्कार कमी पडले यावर आत्मचिंतन केले पाहिजे. खरं म्हणजे इम्रान खान याने हिंदुस्थानविरुद्ध सगळ्यात जास्त जहर ओकले आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला मैदानावरील धर्मयुद्धाचे स्वरूप आणणारा हाच इम्रान होता. त्यामुळे इम्रानचे सत्तेवर येणे म्हणजे आमची डोकेदुखी वाढवण्याचे कंत्राट आहे. इम्रान पंतप्रधान झाल्याचा फायदा नक्की कोणाकोणाला झाला? इम्रानचा मोठा जनानखाना जगभरात पसरला आहे. त्यातील काही मेंबरांनी इम्रान कसा विकृत, क्रूर आणि तितकाच माथेफिरू आहे यावर प्रकाश टाकला आहे. इम्रान हा मुखवटा असून खरा चेहरा पाकिस्तानी लष्करशाहीचा असणार आहे. त्यामुळे नवज्योतसारख्यांनी तेथील लष्करप्रमुखांना मिठ्या मारणे हा गुन्हा आहे. राहुल गांधी यांनी सिद्धूवर काय कारवाई केली? असा प्रश्न भाजपवाले करीत आहेत. 

नवज्योत सिद्धूने स्वतःची नाडी सोडून पाकिस्तानात जाणे हा फक्त काँग्रेसचा विषय नाही तर देशाच्या सुरक्षेचा आणि सैनिकांच्या मान-अपमानाचा विषय आहे. हिंदुस्थान सरकारनेच एक आदेश काढून इम्रानच्या शपथ सोहळ्यास कुणीच जाऊ नये असे बजावायला हवे होते. पंतप्रधान मोदी इतर अनेक गोष्टी दणक्यात करून घेत असतात. नोटाबंदीपासून इतर सर्व आदेश ते राष्ट्रहिताचा विचार करून काढत असतात. तसा एक बंदीहुकूम यासंदर्भातही काढायला हवा होता व इम्रानच्या शपथ सोहळ्यासाठी हजर राहतील ते देशद्रोही असे बजावायला हवे होते. नोटाबंदीस विरोध करणारा, मोदींच्या धोरणांवर टीका करणारा आज देशद्रोही ठरवला जातो. मग पाकिस्तानात जाऊन शेण खाणारासुद्धा देशद्रोहीच, हे सरकारने सांगायला हवे. मोदींनी तसे केले नाही. कारण नवाज शरीफ यांना पाकिस्तानात जाऊन मिठी मारण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनीही केले आहे. तेव्हा त्यांच्यासाठी तो मास्टर स्ट्रोक ठरला. त्यामुळे सिद्धूला कसे गुन्हेगार ठरवायचे? म्हणून मग सिद्धूला गुन्हेगार ठरवायची जबाबदारी राहुल गांधींवर टाकून भाजपवाले मोकळे झाले. सिद्धूने शेण खाल्ले आहेच व त्याबद्दल त्यास जनतेनेच जाब विचारायला हवा. कधी शशी थरूर तर कधी मणिशंकर अय्यरसारखे लोक तोंडाच्या वाफा दवडतात व राहुल गांधींना अडचणीत आणतात. सिद्धू प्रकरणात तेच झाले. सुनील गावसकर, कपिलदेव यांनाही इम्रानचे खास आमंत्रण होतेच. या दोघांनीही इम्रानला नकार दिला, पण सिद्धू मात्र बेडकासारखा उडी मारत गेला. त्याच्या राष्ट्रभक्तीच्या ढोंगाचा फुगा त्यामुळे फुटला.
 

Web Title: Uddhav Thackeray Criticized navjot singh sidhu for hugging Pak army chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.