मित्रांना दूर लोटले व खोट्याचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटे येतात, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 07:34 AM2018-03-16T07:34:16+5:302018-03-16T07:43:26+5:30

गोरखपूर आणि फुलपूर येथील पोटनिवडणुकीच्या निकालावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला हाणला आहे.  

uddhav thackeray criticized bjp over by election result of gorakhpur and phulpur | मित्रांना दूर लोटले व खोट्याचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटे येतात, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

मित्रांना दूर लोटले व खोट्याचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटे येतात, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Next

मुंबई - गोरखपूर आणि फुलपूर येथील पोटनिवडणुकीच्या निकालावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला हाणला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लोकसभा मतदारसंघातच भाजपाचा धुव्वा उडाला. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणी समाजवादी पार्टीचा विजय झाला. भाजपाचा बालेकिल्ला उत्तर प्रदेशातच बसलेल्या पराभवाच्या झटक्यामुळे केंद्रीय नेतृत्वालाही मोठा धक्का बसला आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये भाजपाला टोला हाणला आहे. 
''राजस्थानातील पोटनिवडणुका काँग्रेसने जिंकल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसने आता फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात. हे विधान बरोबर नाही. गोरखपूरच्या पोटनिवडणुकीने अहंकार व उन्मत्तपणाचा पराभव केला आहे. मित्रांना दूर लोटले व खोटय़ाचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटे येतात. काँग्रेसचे तेच झाले होते. ममता बॅनर्जी म्हणाल्या, ही भाजपच्या अंताची सुरुवात आहे. प्रभू श्रीरामालाच ते ठाऊक; पण जनतेने उचलून आपटले हे मात्र मान्य करावे लागेल'', अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

- काय आहे आजचे सामना संपादकीय?
त्रिपुरा या छोट्या राज्यात भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. या विजयोन्मादाचा उत्सव सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघांचे निकाल लागले आहेत व त्रिपुरा विजयाचे लाडू भसकन तोंडाबाहेर पडले आहेत. भाजपच्या तंबूत घबराट पसरवणारे हे निकाल आहेत. गोरखपूर व फुलपूर हे भाजपचे दोन मजबूत किल्ले समाजवादी पार्टीने उद्ध्वस्त केले आहेत. पोटनिवडणुका म्हणजे देशाची भावना नाही असे भाजपतर्फे सांगितले जाते; पण मोदी हे सत्तेवर आल्यापासून १० लोकसभा पोटनिवडणुका झाल्या व त्यातील ९ जागांवर भाजपचा पराभव झाला. लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे २८२ खासदार होते. हा आकडा आता २७२ पर्यंत घसरला आहे. भाजप मोदी व शहा यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ सर्व पोटनिवडणुका हरला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व आता उत्तर प्रदेश या राज्यांत भारतीय जनता पक्षाचीच सरकारे आहेत. मोदी हे प्रचंड लोकप्रिय असतानाही किल्ले का ढासळले? २०१४ साली मोदी लोकप्रियतेची प्रचंड लाट उसळून जनतेच्या नाकातोंडात पाणी गेले व त्या लाटेत अनेक ओंडकेही विजयाच्या किनाऱ्यावर लागले; पण नाकातोंडातले व डोळ्यातले पाणी आता निघून गेले व लोकांना स्वच्छ दिसू लागले असे समजायचे काय? एक वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका झाल्या व त्यात भाजपने ३२५ जागा जिंकण्याचा विश्वविक्रम केला. त्यानंतर योगी महाराज हे भगव्या वस्त्रात मुख्यमंत्रीपदावर व केशव मौर्य हे उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. योगी यांनी गोरखपूर व मौर्य यांनी फुलपूर लोकसभेचा राजीनामा दिल्याने या जागा रिकाम्या झाल्या. 
२०१४ साली या दोन्ही जागा भाजपने अडीच ते तीन लाखांच्या मताधिक्क्याने जिंकल्या होत्या. गोरखपूरची जागा तर हिंदुत्ववाद्यांचा गड होता व १९९१ पासून ही जागा योगी आदित्यनाथ कधीच हरले नाहीत, पण आता मुख्यमंत्रीपदावर गोरखनाथ मठाचा नेता विराजमान होऊनही लोकांनी भाजपचा दारुण पराभव केला. त्रिपुरात जर लाल किल्ला ढासळला असेल तर गोरखपूरला काय कोसळले? समाजवादी पार्टी व मायावतीच्या बसपाने ‘युती’ नामक सौदेबाजी केल्याने पराभव झाला, असे मुख्यमंत्री योगी म्हणतात. म्हणजे राम निंदक नरेश अग्रवाल वगैरे लोकांना काल वाजतगाजत पक्षात घेतले ती टाकाऊ तडजोड म्हणायची नाही काय? महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशात व अन्य राज्यांत अशी ‘टाकाऊ’ माणसे घेऊनच भाजपने घोडा उधळवला, पण आता घोडा पेंड खायला तयार नाही. कमी मतदान झाल्याचा फटका बसला असेही तारे तोडले जात आहेत. मतदारांत उत्साह नव्हता यास राज्यकर्त्यांविषयी झालेला भ्रमनिरास कारणीभूत आहे. गोरखपूरला सपा उमेदवारास ४,५६,५१३ इतकी मते पडली तर भाजपास ४,३४,६३२ मते पडली हा निरुत्साह नसून भाजपचा पराभव करण्यासाठीच मतदान झाले किंवा लोक मतदानास बाहेर पडले नाहीत. अखिलेश यादव, मायावती यांची ‘तडजोड’ झाली तशा अनेक तडजोडी भाजपने २०१४ सालानंतर केल्या. एकाही आमदाराचे बळ नसलेल्या पडेल नेत्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवले जाते यास खंडणी देणे म्हणायचे की मांडवली? त्रिपुरात संपूर्ण काँग्रेस, तृणमूल काँग्रेस भाजपने विलीन करून घेतल्यावरच विजय मिळाला आहे.

बिहारातही लालू यादव यांचा पराभव नितीशकुमार व सुशील मोदी करू शकले नाहीत. लालू यादव यांच्याविषयी सहानुभूती असल्याने त्यांना पोटनिवडणुकीत विजय मिळाला असे बोलणारे मूर्खांच्या नंदनवनात बागडत आहेत. लालू यादव हे भ्रष्टाचाराच्या गुन्हय़ात तुरुंगात आहेत व हे सूडाचे राजकारण असावे. इतके होऊनही लालू यादव व त्यांच्या पक्षास विजय व सहानुभूती मिळत असेल तर हा नितीशकुमार व मोदींना झटका आहे. बिहारातील जहानाबाद तसेच अरारियाच्या जागा राष्ट्रीय जनता दलाने मोठय़ा फरकाने जिंकल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला हवेतून खाली आपटणारे हे निकाल आहेत. २०१९ साली भाजपचा आकडा २८० राहणार नाही व किमान १०० ते ११० जागांची घसरगुंडी होईल हे आता स्पष्ट दिसत आहे. भाजपास रशिया, कॅनडा, फ्रान्स, अमेरिका, इस्त्रायल येथे निवडणुका लढायच्या नसून हिंदुस्थानातच लढायच्या आहेत. त्यामुळे येथील जमिनीवर त्यांनी पाय ठेवायला हवेत. राजस्थानातील पोटनिवडणुका काँग्रेसने जिंकल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसने आता फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात. हे विधान बरोबर नाही. गोरखपूरच्या पोटनिवडणुकीने अहंकार व उन्मत्तपणाचा पराभव केला आहे. मित्रांना दूर लोटले व खोटय़ाचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटे येतात. काँग्रेसचे तेच झाले होते. कोसळणे सुरू होते तेव्हा कोणतेही चाणक्य पडझड रोखू शकत नाहीत. ममता बॅनर्जी म्हणाल्या, ही भाजपच्या अंताची सुरुवात आहे. प्रभू श्रीरामालाच ते ठाऊक; पण जनतेने उचलून आपटले हे मात्र मान्य करावे लागेल.

Web Title: uddhav thackeray criticized bjp over by election result of gorakhpur and phulpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.