एकनाथ खडसे भोगताहेत कर्माचं फळ, उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 07:38 AM2018-01-31T07:38:37+5:302018-01-31T08:16:11+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सामना संपादकीयमधून हल्लाबोल चढवला आहे.

Uddhav Thackeray comments on Eknath Khadse | एकनाथ खडसे भोगताहेत कर्माचं फळ, उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

एकनाथ खडसे भोगताहेत कर्माचं फळ, उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सामना संपादकीयमधून हल्लाबोल चढवला आहे. ''मुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांना ‘खतम’ करण्यासाठी ज्या सत्तेचा गैरवापर केला तीच सत्ता आज खडसे यांच्यावर उलटली आहे आणि उपेक्षा, मानहानीच्या भट्टीत त्यांना भाजून काढीत आहे. ते कधी काँग्रेसच्या तर कधी राष्ट्रवादीच्या शेजेवर चढून जुन्या जमान्यातील चारित्र्य, निष्ठा वगैरेंवर बोलत असतात. मीच हरिश्चंद्राचा अवतार असून भाजपने माझे पंचप्राण परत देऊन लाल दिव्याच्या पालखीत बसवावे असे त्यांना वाटत असले तरी सध्या यमाला शरण आणणारे मांगल्य राजकारणात उरले आहे काय? या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते. खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत. अशोक चव्हाण व अजित पवार यांची त्यांना ‘खुली’ ऑफर आहे. पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच.'', अशा शब्दांत खडसेंवर बोचरी टीका करण्यात आली आहे.  

- काय आहे आजचे सामना संपादकीय?
मुक्ताईनगरचे आमदार एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती समजून घेतली पाहिजे. राज्यातील सत्ताबदलानंतर ते मुख्यमंत्री व्हायला म्हणजे ‘हीरो’ बनायला निघाले होते, पण राजकीय रंगमंचावर त्यांना जो ‘साईड रोल’ मिळाला तोदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढून घेतला. विरोधी पक्षनेते म्हणून व नंतर महसूलमंत्री म्हणून स्वतःलाच गाजवणारे एकनाथ खडसे हे आज भाजपच्या राजकारणातून तसे बाद झाले आहेत व महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांना ते पूर्वीचे स्थान उरलेले नाही. जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ नाथाभाऊ खडसेंवर का यावी, हा राजकीय अभ्यासाचा विषय आहे. तीनच आठवड्यांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जळगावच्या पत्रकार परिषदेत एक सहज विधान केले होते की, ‘‘खडसे यांची सध्याची मानसिक अवस्था पाहता ते फार काळ भाजपात राहतील असे वाटत नाही.’’ यावर खडसे हे भलतेच उखडले होते व मी आजन्म भाजपातच राहणार असे ओरडून सांगत होते. 
तेच खडसे आता आक्रोश करीत आहेत की, ‘‘मला पक्ष सोडण्यास भाग पाडू नका.’’ म्हणजेच महिनाभरापूर्वीचे शिवसेना नेत्यांचे खडसे यांच्याविषयीचे मत योग्यच होते. खडसे आज संतापले आहेत व चुलीवरील तापलेल्या तव्यावर वाटाणे जसे ताड ताड उडतात तसे ते उडत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खडसे यांना मंत्रीपदावरून जावे लागले. त्यासंदर्भातील चौकशी समितीचे भिजत घोंगडे तसेच ठेवले गेले आहे. ते घोंगडे खडसे यांच्या डोक्यावर टाकून त्यांना अंधारात ढकलले जात आहे. सत्तेचाच वापर किंवा वारेमाप गैरवापर करून खडसे यांनी राजकीय विरोधकांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नव्हती. खडसे यांच्या काळात विरोधी पक्षनेत्यांची कशी ‘दुकानदारी’ सुरू होती यावर स्वतः श्री. शरद पवार यांनी मागे मार्मिक भाष्य करून खळबळ उडवून दिली होती. मुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांना ‘खतम’ करण्यासाठी ज्या सत्तेचा गैरवापर केला तीच सत्ता आज खडसे यांच्यावर उलटली आहे आणि उपेक्षा तसेच मानहानीच्या भट्टीत त्यांना भाजून काढीत आहे. खडसे पक्षात राहिले काय किंवा गेले काय, भाजपला आता काहीच फरक पडत नाही.

‘हमे तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था,
हमारी कश्ती वहाँ डुबी, जहाँ पानी कम था’

अशी वेदना खडसे यांच्या मुखातून बाहेर पडली आहे. मला पुन्हा विरोधी पक्षनेता व्हावे असे वाटते असे ते बडबडत असतात. ‘‘मला बारामतीत जाऊन राहावे असे वाटते’’ असे एक वात्रट विधान करून खडसे यांनी आपण कोणत्या मार्गाने निघालो आहोत ते सूचित केले, पण खडसे यांचा ढळलेला पदर ओढण्याचे काम अधूनमधून काँग्रेसवालेही करीत आहेत. घरंदाजपणाचे राजकारण संपले की असे ‘चवचाल’ प्रकार सुरू होतात. खडसे यांना आता भाजपच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसते. ते कधी काँग्रेसच्या तर कधी राष्ट्रवादीच्या शेजेवर चढून जुन्या जमान्यातील चारित्र्य, निष्ठा वगैरेंवर बोलत असतात. मीच हरिश्चंद्राचा अवतार असून भाजपने माझे पंचप्राण परत देऊन लाल दिव्याच्या पालखीत बसवावे असे त्यांना वाटत असले तरी सध्या यमाला शरण आणणारे मांगल्य राजकारणात उरले आहे काय? या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते. खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत. अशोक चव्हाण व अजित पवार यांची त्यांना ‘खुली’ ऑफर आहे. पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच.

Web Title: Uddhav Thackeray comments on Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.