Uddhav Thackeray Comments on bjp mla paricharak suspension withdraw | ...त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा थेट निशाणा
...त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा थेट निशाणा

मुंबई - सीमेवर लढणाऱ्या जवानांबाबत आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य करणारे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन बुधवारी (28 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले. निलंबन मागे घेण्याबाबत ठराव सभागृहात मंजूर करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. शिवाय, शिवसेना विधिमंडळात परिचारक यांच्या बडतर्फीचा ठराव आणणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. ''आमदार परिचारक यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून ज्यांनी ठराव मांडला व पाठिंबा दिला त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते ‘छिंदम उत्सव मंडळा’चे मानकरी आहेत. सीमेवर सैनिकांचे रोजच रक्त सांडत आहे आणि इकडे सैनिकांच्या कुटुंबीयांची असभ्य भाषेत अवहेलना करणाऱ्यांना शेला-पागोटे देण्याचा उपक्रम सुरू आहे. शिवसेना परिचारक यांच्या बडतर्फीचा ठराव विधिमंडळात आणत आहे. जी मातृभूमीची खरी लेकरे व आमच्या जवानांचे ‘देणे’ लागतात ते ठरावास पाठिंबा देतील. ‘ढोंग्यां’चे बुरखे आता फाटतील'', अशा बोच-या शब्दांत त्यांनी भाजपा सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. 

- प्रशांत परिचारक यांचे वादग्रस्त विधान
‘सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. शिवाय, विधान परिषदेतून दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.

काय आहे आजचे सामना संपादकीय ?
‘जय जवान जय किसान’ या घोषणेचे भाजप राज्यात मातेरे होईल असे कधीच वाटले नव्हते, पण दुर्दैवाने ते झाले आहे. राष्ट्रभक्तीच्या घोषणांचा फुगा रोज फुटत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सदैव चिंतेचा विषय आहे. अभिनेत्री श्रीदेवीप्रमाणे शेतकऱ्यांना शासकीय इतमामात मानवंदना द्यायची म्हटली तर महाराष्ट्र सरकारच्या बंदुकांतील ‘काडतुसे’ संपून जातील. तो विषय नंतर पाहू, पण ‘जय जवान’ या आपल्या प्रिय घोषणेचे ‘बारा’ वाजवून भाजप सरकारने आमदार प्रशांत परिचारक यांना विधिमंडळात जणू पायघड्य़ाच घातल्या आहेत. प्रशांत परिचारक यांचे विधिमंडळातील निलंबन रद्द करण्याचा ठराव ज्यांनी मंजूर केला व ज्यांनी त्या ठरावास मूक संमती दिली ते सर्व लोक नगरच्या ‘छिंदम’ अवलादीचेच म्हणावे लागतील. कदाचित सभागृहातील काही सन्माननीय सदस्यांना हा शब्दप्रयोग आवडणार नाही, पण आम्ही विधिमंडळाची माफी मागून हा शब्द वापरत आहोत. कारण ज्यावेळी परिचारक यांच्याविरोधात निंदाजनक ठराव आला होता त्यावेळी त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. आताही परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाला सगळ्य़ा आमदारांनी तसाच एकमुखी विरोध करायला हवा होता. परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य आहेत व भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यांचे निलंबन का झाले होते, तर अत्यंत असभ्य आणि चारित्र्यहनन करणारे मानहानीकारक असे वक्तव्य त्यांनी सीमेवरील सैनिक व त्यांच्या पत्नींविषयी केले होते. 
‘‘सैनिक वर्षभर सीमेवर असतात आणि इकडे गावात त्यांच्या बायका बाळंत होतात,’’ असे परिचारक म्हणाले होते. देशाच्या जवानांविषयी व त्यांच्या कुटुंबीयांविषयी इतके भयंकर विधान आतापर्यंत कोणी केले नसेल. भाजप आमदाराच्या या विधानाबद्दल विधिमंडळात त्यावेळी गदारोळ झाला व त्यांचे निलंबन करावे लागले. देशाच्या १२५ कोटी जनतेचा हा अपमान असल्याचा निंदाजनक ठराव तेव्हा मांडला गेला व मंजूर केला गेला. मात्र त्याच सभागृहाने सैनिकांचा अपमान करणाऱ्या गुन्हेगाराला पुन्हा पायघड्य़ा घालाव्यात यासारखी दुःखद घटना नाही. महाराष्ट्रातील लाखो आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांवर फडणवीस सरकारने केलेला हा सर्जिकल स्ट्राइक आहे. नगरमध्ये भाजपचे उपमहापौर छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असभ्य उद्गार काढले. त्याचेही निलंबन झाले. आता तो अटकेत आहे. परिचारक यांचा गुन्हा छिंदमपेक्षा कमी नाही. शिवराय हे हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार. मावळे हेच त्यांचे सैनिक. या मावळ्य़ांनीच हिंदवी स्वराज्यासाठी देशाच्या दुश्मनांशी सामना केला. हौतात्म्य पत्करले. आजही महाराष्ट्राचे ‘मावळे’ ‘जय भवानी – जय शिवाजी’ आणि ‘हरहर महादेव’चा गजर करीत सीमेवर दुश्मनांशी लढत आहेत व प्राणांची आहुती देत आहेत. त्यांच्याविषयी असभ्य बोलणे म्हणजे शिवरायांचाच अपमान करणे आहे, पण भाजप

सरकारला त्याचे भान नाही व सत्तेच्या भांगेने डोके बधिर झाल्याप्रमाणे ते फक्त विधानसभा विजयासाठी गणिते मांडत आहेत. प्रशांत परिचारक यांचे निलंबन कायम ठेवले असते किंवा छिंदमप्रमाणे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असता तर आभाळ कोसळले असते काय? पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात एक ‘पोस्ट’ सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल नगरचा एक पोलीस हवालदार रमेश शिंदे याला सरळ बडतर्फ केले जाते, पण प्रशांत परिचारक यांना मात्र सैनिकांचा अपमान करूनही ताठ मानेने विधिमंडळात घुसवले जाते. शिंदेचे निलंबन कायम आहे व भाजप आमदार परिचारक मात्र मोकाट आहेत. ही बेशरमपणाची हद्द आहे. आमदार परिचारक यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून ज्यांनी ठराव मांडला व पाठिंबा दिला त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते ‘छिंदम उत्सव मंडळा’चे मानकरी आहेत. सीमेवर सैनिकांचे रोजच रक्त सांडत आहे. बलिदाने सुरू आहेत. पाकिस्तानात घुसून त्यांच्या सैनिकांची ‘मुंडकी’ उडविण्याची गर्जना रोज वल्गना ठरत आहे आणि इकडे सैनिकांच्या कुटुंबीयांची असभ्य भाषेत अवहेलना करणाऱ्यांना शेला-पागोटे देण्याचा उपक्रम सुरू आहे. शिवसेना परिचारक यांच्या बडतर्फीचा ठराव विधिमंडळात आणत आहे. जी मातृभूमीची खरी लेकरे व आमच्या जवानांचे ‘देणे’ लागतात ते ठरावास पाठिंबा देतील. ‘ढोंग्यां’चे बुरखे आता फाटतील.


Web Title: Uddhav Thackeray Comments on bjp mla paricharak suspension withdraw
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.