शिवसेना-भाजपाचं होणार पॅचअप? सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 08:15 AM2018-04-16T08:15:08+5:302018-04-16T09:00:41+5:30

भाजपा नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी मातोश्रीवर भेट होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray and Sudhir Mungantiwar meet likely, BJP and Shiv Sena reset relations? | शिवसेना-भाजपाचं होणार पॅचअप? सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ

शिवसेना-भाजपाचं होणार पॅचअप? सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ

googlenewsNext

मुंबई : सत्तेतील विरोधक शिवसेना आणि भाजपाचं लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पॅचअप होणार का?, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  कारण भाजपा नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी मातोश्रीवर भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान युतीच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासंमोर ठेवून भाजपा आणि शिवसेनेतील युतीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे बोलले जात आहे. अद्याप भेट निश्चित झाली नाही. मात्र उद्धव ठाकरेंकडून भेटीसाठी वेळ दिला गेल्यास, संध्याकाळी पाच वाजता ‘मातोश्री’वर या दोघांचीही भेट होईल. त्यामुळे भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे. 

एकीकडे भाजपा शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रयत्न करत आहे तर शिवसेना मात्र युती होणार नसल्याचं वारंवार सांगत आहे. ''भाजपाने कितीही आवाहन केले, तरी युती होणार नसल्याचा पुनरूच्चार करून सध्या महाराष्ट्राला निवडणुका परवडणाऱ्या नसल्याने शिवसेनेने सरकारचा टेकू काढलेला नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. डोंबिवली पत्रकार संघाच्या अनौपचारिक गप्पांवेळी ते बोलत होते.  

लोकसभा, विधानसभांचा कार्यकाळ आता पूर्ण होत आला आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका होऊ शकतात. म्हणजे संपूर्ण सत्ता उपभोगून झाल्यानंतर सत्ता सोडणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत यांनी येत्या काळातच तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल, असे सांगितले. 

तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न
जातीय व धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणुका जिंकण्याचा घाट भाजपाकडून घातला जात आहे. देशात अराजक निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे. आजवर महाराष्ट्र कधी जातीच्या मुद्द्यावर फाटला नव्हता. पण भीमा-कोरेगावच्या प्रकरणामुळे फाटलेला महाराष्ट्र अद्याप शिवला गेलेला नाही. त्यामुळेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाºया शक्तींना चिरडून टाकले पाहिजे, असे आवाहन राऊत यांनी केले.

 

 

Web Title: Uddhav Thackeray and Sudhir Mungantiwar meet likely, BJP and Shiv Sena reset relations?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.