uddhav thackeray on amravati for campaign did not care csmt bridge victims | उद्धव ठाकरे अर्धा तास बोलले, पण सीएसटी पूल दुर्घटनेबाबत अवाक्षरही नाही!
उद्धव ठाकरे अर्धा तास बोलले, पण सीएसटी पूल दुर्घटनेबाबत अवाक्षरही नाही!

मुंबई- शिवसेना-भाजप युतीचा अमरावती येथे जाहीर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर आले होते. विशेष म्हणजे अमरावतीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी सीएसटी पूल दुर्घटनेसंदर्भात अवाक्षरही काढलं नाही. त्यामुळे मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत.

सीएसटी पूल दुर्घटनेला एवढे तास उलटूनही उद्धव ठाकरे ना घटनास्थळी फिरकले, ना जखमींची विचारपूस केली. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, 30हून अधिक लोक जखमी झाले. मात्र मुंबईची महापालिका ताब्यात असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केलेलं नाही.

मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचं आता समोर आलं आहे. तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही या पुलाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. दुर्घटनास्थळ हे मातोश्रीपासून तासाभराच्या अंतरावर आहे. परंतु तिकडे न फिरकता उद्धव ठाकरेंनी थेट साडेचारशे किलोमीटरचं अंतर कापत अमरावती गाठलं. अमरावतीच्या सभेतही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि युती सरकारचे गोडवे गायले. परंतु सीएसटी पूल दुर्घटनेसंदर्भात अवाक्षरही काढलं नाही. त्यामुळे मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  


Web Title: uddhav thackeray on amravati for campaign did not care csmt bridge victims
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.