१५२ वर्षांनी आकाशात दिसणार दुर्मीळ नजराणा! खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:40 AM2018-01-26T02:40:37+5:302018-01-26T02:41:32+5:30

यापूर्वी असा तिहेरी योग ३१ मार्च १८६६ रोजी आला होता.

 Tremendous lunar eclipse, supermon, blue triple yoga! | १५२ वर्षांनी आकाशात दिसणार दुर्मीळ नजराणा! खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग

१५२ वर्षांनी आकाशात दिसणार दुर्मीळ नजराणा! खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग

googlenewsNext

मुंबई : येत्या बुधवारी, ३१ जानेवारी रोजी खग्रास चंग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे रात्रीच्या पूर्वप्रारंभी आकाशात दर्शन होणार आहे. हा तिहेरी योग साध्या डोळ्यांनीदेखील पाहता येईल, असे खगोलअभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. १५२ वर्षांनंतर हा दुर्मीळ योग येणार आहे. यापूर्वी असा तिहेरी योग ३१ मार्च १८६६ रोजी आला होता.
ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, त्या वेळी त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. ‘सुपरमून’ हे नाव रिचर्ड नोले यांनी १९७९मध्ये दिले होते. अशा वेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार, ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून तीन लाख ५९ हजार किलोमीटर अंतरावर येईल. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसेल.
दुसरीकडे एका इंग्रजी महिन्यात ज्या वेळी दोन पौर्णिमा येतात, त्या वेळी दुसºया पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून ’ म्हणतात. जरी त्याला ‘ब्ल्यूमून’ म्हटले गेले असले, तरी त्या वेळी चंद्र काही ‘ब्ल्यू’ रंगाचा दिसत नाही. या वेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून’ म्हटले आहे. याचप्रमाणे बुधवार, ३१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहणदेखील
आहे. भारतातून ते खग्रास स्थितीत दिसेल.
अशा प्रकारे बुधवार, ३१ जानेवारी रोजी ‘खग्रास चंद्रग्रहण’, ‘सुपरमून’ आणि ‘ब्ल्यूमून’ असा तिहेरी योग आला आहे. म्हणून खगोलप्रेमींच्या दृष्टीने ही एक पर्वणी आहे. छायाचित्रकारांनादेखील ही एक मौल्यवान संधी आहे.

३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास म्हणजे चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल.
परंतु त्या वेळी चंद्रबिंब आपल्या आकाशाच्या खाली असल्याने आपणास दिसू शकणार नाही. त्यानंतर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व आकाशात खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल.
सर्वांना साध्या डोळ्यांनीदेखील चंद्राच दर्शन घेता येईल. खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने पौर्णिमा असूनही चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगाचे दिसेल. त्याला ‘ब्ल्यूमून’, ‘ब्लडमून’ म्हणतात.
ग्रहण सायंकाळी ७ वाजता आहे. त्या वेळी चंद्रबिंब पूर्व आकाशात बरेच वरती आलेले दिसेल. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण सुटेल. चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर येईल.
यानंतरचे दुर्मीळ योग-
आता यानंतर २६ मे २०२१ रोजी ‘सुपरमून’ आणि ‘चंद्रग्रहण’ असा योग येईल. ३१ डिसेंबर २०२८ रोजी ‘ब्ल्यूमून’ आणि ‘चंद्रग्रहण’ असा योग येईल. ३१ जानेवारी २०३७ रोजी पुन्हा असा तिहेरी योग येईल, असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या तिहेरी योगाचे काय परिणाम होतील, याविषयी सांगताना सोमण म्हणाले की, याचे कोणतेही वाईट परिणाम होणार नाहीत. उलट चांगलेच परिणाम होतील. खगोलप्रेमींसाठी हे दृश्य आनंददायी आहे. पालक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चंद्रग्रहण दाखवून त्याविषयी अधिक माहिती द्यावी, असे आवाहनही सोमण यांनी केले.

Web Title:  Tremendous lunar eclipse, supermon, blue triple yoga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.