ट्रायच्या 'या' निर्णयाने सुखावला डिशचा ग्राहकवर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 04:51 AM2018-12-19T04:51:17+5:302018-12-19T04:51:39+5:30

अनावश्यक चॅनेलला कात्री : पाहिजेत तेवढ्याच चॅनेलच्या रकमेचा करा भरणा

Tray's 'Decision' customer class of dish dried | ट्रायच्या 'या' निर्णयाने सुखावला डिशचा ग्राहकवर्ग

ट्रायच्या 'या' निर्णयाने सुखावला डिशचा ग्राहकवर्ग

Next

नवी मुंबई : केबल ग्राहकांना पाहिजे असतील तेवढेच चॅनेल दाखवण्याची व त्याचेच शुल्क आकारण्याची सक्ती ट्रायने केली आहे. १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, ट्रायच्या या निर्णयाने केबल व डिश ग्राहकवर्ग सुखावला आहे. त्यानुसार केबल आॅपरेटर्सकडे ग्राहकांनी चौकशीचा भडीमार चालवला आहे.

केबल व्यावसायिकांकडून ग्राहकांची होणारी लुट व शासनाची फसवणूक थांबवण्यासाठी ट्रायने धोरणात्मक बदल केला आहे. या नव्या बदलानुसार केबल व डिश ग्राहकांना त्यांना पाहिजे असतील तेच चॅनेल पाहण्याची, तसेच तेवढ्याच चॅनेलचे भाडे देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्याकरिता २९ डिसेंबरपर्यंत ग्राहकांनी त्यांच्या केबल आॅपरेटरर्सकडे अर्जाद्वारे त्यांच्या मनपसंद चॅनेलची यादी द्यायची आहे. या चॅनेलच्या दरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रत्येक चॅनेलवरही त्यांचे नवे दर दाखवले जात आहेत. त्यामुळे इच्छा नसतानाही अनावश्यक चॅनेलचे पॅकेज घेऊन त्याचे पैसे भरण्याच्या सक्तीला आळा बसणार आहे. नव्या बदलानुसार चॅनेलचे सर्वोत्तम दर १९ रुपये करण्यात आले असून, त्यापेक्षा जास्त दर आकारता येणार नाहीत. त्यामध्ये एचडी चॅनेल्सचाही समावेश आहे. यामुळे केबलद्वारे मनोरंजनासाठी आजवर महिना ३०० ते ७०० रुपये मोजणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. १३० रुपयांत फ्री टू एअर चॅनेल मिळणार असून, त्याव्यतिरिक्त आवश्यक असलेल्या चॅनेलचे ठरल्याप्रमाणे पैसे ग्राहकांना भरावे लागणार आहेत.
नवी मुंबईत सद्यस्थितीला डेन अ‍ॅरोन, डिजी, डेन सुप्रीम, आशिष, ईन, सिटी हे प्रमुख केबल डिस्ट्रीब्युटर्स आहेत. सुमारे १५ वर्षांपूर्वी नवी मुंबईत ठरावीक विभागात स्वत:ची मक्तेदारी सिद्ध करण्याच्या वादातून केबल वॉरचे प्रकार घडत होते. कालांतराने नगरसेवकांसह स्थानिक पातळीवर वर्चस्व असलेल्या व्यक्तींनी या क्षेत्रात पाऊल ठेवून आपापले क्षेत्र राखीव करून घेतले. मात्र, मागील काही वर्षांत त्यांच्याकडून केबलच्या वाढत्या दराला कंटाळून बहुतांश ग्राहकांनी डिशला पसंदी दर्शवायला सुरुवात केली. यामुळे केबल व्यवसायाला घरघर लागलेली असतानाच ट्रायच्या या निर्णयाने ग्राहकवर्ग जरी सुखावला असला, तरीही केबल आॅपरेटर्स मात्र पेचात सापडले आहेत.
ट्रायकडून अद्यापही केबल व्यावसायिकांचा नफा निश्चित झालेला नाही, त्यामुळे डिस्ट्रीब्युटर्स व आॅपरेटर्स यांच्यात नफ्या-तोट्याबाबत संभ्रमावस्था आहे.

सध्या एचडी चॅनेलच्या पॅकेजसाठी ७५० रुपयांचे डिशचे पॅकेज घ्यावे लागत आहे; परंतु ट्रायच्या नव्या निर्णयाने एचडी चॅनेलच्याही दरावर नियंत्रण आले आहे. त्यामुळे केवळ टीव्हीच्या मनोरंजनावर होणारा महिन्याचा खर्च कमी होणार आहे. शिवाय, आॅपरेटर्सकडून लादण्यात आलेल्या अनावश्यक चॅनेललाही कात्री बसणार असल्याने ट्रायचा निर्णय स्वागतार्ह आहे.
- सुरेखा बच्छाव-जानराव, कोपरखैरणे

Web Title: Tray's 'Decision' customer class of dish dried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई