बाईक रेसिंगला विरोध केल्याने भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:49 AM2018-07-03T00:49:17+5:302018-07-03T00:49:28+5:30

बाइक रेसिंगचा थरार पाहून भायखळ्याच्या भावेश कोळी (२३) या तरुणाने त्यांना हटकले. याच रागात त्या १० ते १२ बाइक रेसर्सनी त्याची भररस्त्यात निर्घृण हत्या केली.

 Threatened by the protest against the bike racing | बाईक रेसिंगला विरोध केल्याने भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या

बाईक रेसिंगला विरोध केल्याने भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : बाइक रेसिंगचा थरार पाहून भायखळ्याच्या भावेश कोळी (२३) या तरुणाने त्यांना हटकले. याच रागात त्या १० ते १२ बाइक रेसर्सनी त्याची भररस्त्यात निर्घृण हत्या केली. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून सोमवारी रात्री शिवडीतून शेहजाद शेखला अटक झाली आहे.
भायखळा येथील एस पाटनवाला इमारतीत भावेश हा आई, वडील आणि दोन बहिणींसोबत राहायचा. त्याचे वडील पालिकेत छायाचित्रकार म्हणून नोकरी करतात. तर भावेशही फोटोग्राफीबरोबर पालिकेच्या पे अ‍ॅण्ड पार्कचे काम कंत्राट पद्धतीने पाहत होता. याच परिसरात गेल्या काही दिवसांपासून बाइक रेसिंगचा थरार वाढत होता. शेजारी शाळा, त्यात वृद्ध पादचाऱ्यांना त्यांची धडक बसल्यास मोठी हानी होऊ शकते. म्हणून पाच दिवसांपूर्वी भावेशने या टोळक्यांना हटकले. येथे रेसिंग करू नका, असे बजावले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर ते निघून गेले. रविवारी सायंकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळून भावेश एकटा बाहेर पडला. त्यावेळी बाइक रेसरची नजर त्याच्यावर पडली. तो एकटाच असल्याचे कळल्यावर १० ते १२ जण चाकू घेऊन तेथे दाखल झाले. त्यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यापैकी एकाने हातातील चाकूने त्याच्यावर निर्घृण वार केले. त्याची किंकाळी मित्रांपर्यंत पोहोचण्यापूर्वी भावेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याच वेळी आरोपी पसार झाली. मित्रांनी त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत भावेशचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावरच पोलिसांची बीट चौकी आहे. माहिती मिळताच, भायखळा पोलीस तेथे दाखल झाले. मित्र प्रतीक पडवळ याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.

कुटुंबीयांनी कर्ता मुलगा गमावला
भावेश हा एकुलता एक मुलगा असल्याने तो घरात सर्वांचा लाडका होता. घरच्यांना तो आधार होता. या घटनेमुळे कर्ता मुलगा गमावल्याने कोळी कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

...तर तो वाचला असता
रेसिंगला विरोध केल्यानंतर ते येता-जाता भावेशची टिंगलटवाळी करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली. त्याने याबाबत वेळीच पोलिसांकडे तक्रार केली असती, तर ही घटना टळली असती, असे एका अधिकाºयाने सांगितले.

जवळचा मित्र गमावला
भावेशच्या मनमिळावू स्वभावामुळे तो सर्वांच्याच जवळचा होता. तो भाजपा युवा मोर्चा वॉर्ड क्रमांक २०८चा महामंत्री म्हणूनही कार्यरत होता. त्याच्या निधनामुळे एक चांगला मित्र, सहकारी गमावल्याचे त्याचे मित्र रोहन सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

वर्षभराने ठरला होता विवाह
भावेशचे एका तरुणीसोबत प्रेम होते. दोघांचा पुढच्या वर्षी विवाह होणार होता. त्याचीही तयारी सुरू झाली होती अशीही माहिती त्याच्या मित्रांकडून समजली.

सीसीटीव्ही फुटेज हाती
भायखळा पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आरोपी हे मोदी कम्पाउंडमधील असल्याचे समोर आले. त्यानुसार, त्यांची धरपकड सुरू आहे.

बाइक रेसिंग थांबणार का?
बाइक रेसिंगमुळे भावेशचा बळी गेला. त्यामुळे पोलीस आता तरी यावर निर्बंध आणणार का, असा प्रश्न त्याचे नातेवाईक, मित्र यांच्याकडून करण्यात येत आहे.

Web Title:  Threatened by the protest against the bike racing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.