There should be a change in education sector: Devendra Fadnavis | शिक्षण क्षेत्रात परिवर्तन हवे- देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिक्षण क्षेत्रात परिवर्तन व्हायला हवे. पुढच्या काही वर्षांतच देश महासत्ता होणार आहे. यामध्ये शाळांचे आणि शिक्षणाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आता बदल करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात बदल व्हायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
इंडियन एज्युकेशन सोसायटी शतक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने शुक्रवारी दादर येथील शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, संस्थेचे अध्यक्ष अरविंद वैद्य, सतीश नायक आणि अचला जोशी आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, जगातल्या बºयाचशा विकसित देशांची अर्थव्यवस्था वार्धक्याकडे झुकलेली आहे. पण, आपल्या देशाच्या लोकसंख्येमधील ५० टक्के लोकसंख्या ही तरुण आहे. पण त्यासाठी आपणाला मानव संसाधन तयार करावे लागेल. हे संसाधन करण्यासाठी जबाबदारी गुरुजनांची आणि शाळांची आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी शिक्षण संस्थांचे योगदान मोठे असणार आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, ते नाकारून चालणार नाही. पण सध्या शिक्षणावर चर्चा होणे आवश्यक आहे. देशाचा हा सुवर्णकाळ शिक्षकांच्या हातात असल्याचे महत्त्व या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या मार्गावर असून गरुडझेप घेण्याची ही वेळ आली आहे. युवा पिढीमध्ये राष्ट्रीय आणि सामाजिकतेचे भान असायला हवे, अन्यथा ही पिढी नष्ट होईल. त्यामुळे या प्रवासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. तर इंडियन एज्युकेशन सोसायटीने १०० वर्षांचा गाठलेला टप्पा हा महत्त्वाचा असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठासह राज्यातील विद्यापीठांच्या संलग्नित महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. या महाविद्यालयांच्या ओझ्याखाली उच्च शिक्षण दबले जात आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी महाविद्यालयांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. विद्यापीठांवरचा भार हलका व्हायला हवा. त्यामुळे अनेक फायदे होतील. पण, यासाठी आधी महाविद्यालयांना स्वायत्तता देणे आवश्यक असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
>शिक्षणात राज्याला आणणार प्रथम
या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रासंदर्भात बोलताना सांगितले, देशात राज्याला प्रथम क्रमांकावर आणणार आहे. शिक्षकांच्या ताकदीवर हे ध्येय साध्य करायचे आहे.