पुढे धोका आहे..प्रवाशांनो, तुमचा प्रवास सुखाचा होवो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 02:01 AM2017-10-29T02:01:06+5:302017-10-29T02:01:19+5:30

कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांसह वांद्रे-कुर्ला संकुलातील कॉर्पोरेट कर्मचारी वर्गाचा ताण वाढतच असून, वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन हा मुद्दा कळीचा बनला आहे.

There is a danger ahead..Version, your journey will be happy ... | पुढे धोका आहे..प्रवाशांनो, तुमचा प्रवास सुखाचा होवो...

पुढे धोका आहे..प्रवाशांनो, तुमचा प्रवास सुखाचा होवो...

Next

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांसह वांद्रे-कुर्ला संकुलातील कॉर्पोरेट कर्मचारी वर्गाचा ताण वाढतच असून, वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन हा मुद्दा कळीचा बनला आहे. सहा पूल असूनही या पुलांचा प्रवाशांकडून पुरेसा वापर होत नसल्याने ठरावीक तीन पुलांवरची गर्दी वाढत आहे. तीन पुलांवरील गर्दीला उर्वरित तीन पुलांवर वळविणे हे रेल्वे प्रशासनासमोरचे आव्हान आहे.
विक्रोळी रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे पडत आहे. पुलांवरील पत्रे तुटलेले असून, जिने अरुंद आहेत. छपरावरील पत्रे मोडकळीस आले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पंखे जुने झाले आहेत. दोन स्वयंचलित जिन्यांची गरज असताना एकच स्वयंचलित जिना आहे.
दादर रेल्वे स्थानकावरील पुलांसह, पादचारी पुलांवरील फेरीवाले हटवण्यात आले आहेत. यामुळे स्थानकावरील रोज सुमारे ६ ते ७ लाख प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र स्थानकातील अरुंद पुलालादेखील पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. जिन्यांची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. पुलांची कनेक्टिव्हिटी नीट नाही.
मशीद रेल्वे स्थानक विकासाच्या प्रतीक्षेत आहे. जिने अरुंद आहेत. अरुंद जिने आणि अरुंद पूल हे येथील प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहेत. मशीद रेल्वे स्थानकावर तीन अरुंद पादचारी पूल आहेत. या पुलावरील जिन्यातून केवळ तीन व्यक्ती सहजपणे चढू-उतरू शकतात.
सांताक्रुझ येथील गर्दीच्या नियोजनासाठी पुलाची रुंदी वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणाºया पादचारी पुलाची अवस्था बिकट आहे. हा पूल ५० वर्षांपूर्वीचा असल्याने जीर्ण झाला आहे. पुलाला भेगा पडल्या आहेत. बोरीवली दिशेकडील फलाटावर छप्पर नाही. निवडकच तिकीटखिडक्या उघड्या असल्यामुळे तिकीटघराबाहेरची गर्दी वाढत जाते.
सायन रेल्वे स्थानकाचा धारावीकर मोठ्या प्रमाणावर वापर करतात. लोकमान्य टिळक रुग्णालयात रेल्वेने येणारे रुग्णदेखील सायन रेल्वे स्थानकात उतरतात. अरुंद पुलावरून या रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना नातवाइकांची दमछाक होते. अपुरी तिकीटघरे, प्रसाधनगृहांची दुरवस्था अशा अनेक असुविधांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दोन पादचारी पूल आहेत, त्यापैकी उत्तरेकडील पुलाचा फारच कमी वापर होतो. दक्षिणेकडील पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या पुलावर नेहमी कोंडी होते.


मानखुर्द रेल्वे स्थानकावर येण्यासाठी मानखुर्दमधील आगरवाडी, लल्लूभाई कम्पाउंड, जयहिंदनगर, सोनापूर, साठेनगर, शिवाजीनगर परिसरात राहणारे लोक जीव धोक्यात घालून, रेल्वेमार्गाचा वापर करत रेल्वे स्थानकावर पोहोचतात. या लोकांसाठी स्कायवॉक आणि पूल बांधावा.
भांडुप रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेली एकच वाट, बाहेर पडल्यावरही अरुंद स्टेशन रोडवरील बेस्टच्या बसगाड्या, रिक्षा, असंख्य फेरीवाले आणि घरी जाता जाता या फेरीवाल्यांकडून भाज्या, फळे विकत घेणाºया चाकरमान्यांची भाऊगर्दी; त्यामुळे घाईच्या दोन्ही वेळांमध्ये भांडुप रेल्वे स्थानक किंवा स्थानकातून लाल बहादूर शास्त्री मार्ग गाठताना जीव मेटाकुटीला येतो. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांडुप रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार, याकडे भांडुपकरांचे लक्ष आहे.
वांद्रे या स्थानकातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे पडत आहे. अरुंद पूल येथील मोठी समस्या असून, येथे सरकते जिनेदेखील नाहीत. गंजलेले पूल, रेल्वेच्या हद्दीत कचºयाचे साम्राज्य, रेल्वे रुळांलगतच्या अनधिकृत झोपड्या असे चित्र येथे पाहायला मिळते. या झोपड्यांवर कारवाई होत नसल्याने, वांद्रे स्थानकाला बकाल स्वरूप प्राप्त झाले असल्याचे प्रवासी सांगतात.
लोअर परळ स्थानकावर दोन पूल आहेत. यामध्ये दादर बाजूला असलेल्या पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. फलाट क्रमांक २ आणि ३च्या पुलाला पायºया नाहीत. तसेच या स्थानकाच्या पश्चिमेला बाहेर पडल्यावर चिंचोळ्या गल्ल्या आहेत. तर, पूर्वेला बाहेर पडल्यावर अरुंद पूल आहे. या स्थानकाच्या परिसरात कॉर्पोरेट हाउस वाढल्याने प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रोज प्रवाशांना या चिंचोळ्या गल्ल्या आणि अरुंद पुलावरून वाट काढत प्रवास करावा लागतो.

गोवंडी रेल्वे स्थानकावर चार पादचारी पूल असूनही प्रवासी रेल्वेमार्ग ओलांडत असल्याचे निदर्शनास येते. गोवंडी रेल्वे स्थानकावर चार पादचारी पूल आहेत. त्यापैकी उत्तरेकडील पुलाचा वापर होत नाही. मधल्या पुलावर तिकीटघर असल्यामुळे त्याही पुलाचा वापर होतो, परंतु हा पूल अतिशय अरुंद आहे. एका वेळी जेमतेम तीन ते चार प्रवासी या पुलावरून ये-जा करू शकतात. त्यामुळे हा पूल रुंद करण्यात यावा.
चर्नी रोड स्थानकाच्या पूर्वेला असणारा पूल हा मोडकळीस आला होता. त्याविरुद्ध स्थानिकांनी तक्रार केल्या होत्या. पुलाला भेगा पडल्या होत्या, कठडा गंजला होता. पुलावर छिद्रे होती. पण, तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केले. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे येथील पुलाच्या चार ते पाच पायºया आणि काही भाग कोसळला. दोन प्रवासी जखमी झाले. या पुलाच्या पायºया तुटल्या; आणि आता सर्व पूल बंद ठेवण्यात आला आहे.
मरिन लाइन्स स्थानकाबाहेरील तीनही पुलांची दुरवस्था झाली आहे. यातील एका पुलाचे काम करण्यासाठी फरशा काढून टाकल्या असून, काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना निसरड्या पायºया आणि गंजक्या पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मरिन लाइन्स स्थानकाच्या पूर्वेला जाणाºया प्रवाशांची गर्दी अधिक असते. फलाट क्रमांक ४वरून बाहेर जाण्याचा पर्यायी मार्ग बंद केला असून, पुलावर जाण्यासाठी छोटीशी वाट ठेवली आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकावरून लोकल जातात तसेच बाहेरगावी जाणाºया गाड्या मुंबई सेंट्रल टर्मिनसवरून सुटतात. तर, या स्थानकाच्या पश्चिमेला एसटी आगार आहे. त्यामुळे या स्थानकावर दिवसरात्र प्रवाशांची गर्दी असते. या स्थानकाच्या फलाट क्रमांक २ आणि ३वर एक दोन फूट रुंद पायºया नसलेला पूल आहे. या फलाटावरची प्रवाशांची गर्दी लक्षात घेतल्यास पुलाचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे.

Web Title: There is a danger ahead..Version, your journey will be happy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.