‘पार्शल एसी लवकरच धावणार’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:56 AM2019-01-20T04:56:51+5:302019-01-20T04:56:57+5:30

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

'Theoretically the AC will run soon' | ‘पार्शल एसी लवकरच धावणार’

‘पार्शल एसी लवकरच धावणार’

Next

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. यामधील पार्शल एसी लोकल (९ डब्बे नॉन एसी आणि ३ डब्बे एसी) सुरू करण्यात येणार असून यातील तांत्रिक बाबी पडताळून काम केले जात आहे. मुंबईकरांना लवकरच पार्शल एसीतून प्रवास करण्यास मिळणार असल्याचे रेल्वे मंत्री पियूष गोयल मुंबईतील कार्यक्रमात म्हणाले.
रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे आणि कामाचे उद्घाटन व भूमिपूजन रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि इतर मान्यवरांच्या हस्ते शनिवारी झाले. गोयल यांनी राजधानी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. पनवेलहून पेणपर्यंत जाणाऱ्या मेमूचा रोह्यापर्यंत विस्तार तसेच पुणे-कर्जत पॅसेंजर पनवेलपर्यत विस्तारीकरण करण्यात आले आहे. विस्तारीकरण प्रकल्पाला रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गीते यांनी हिरवा झेंडा दाखविला. पनवेल येथील सरकत्या जिन्यांचे उद्घाटनदेखील यावेळी गोयल यांनी केले.
>पेण-रोहा विद्युतीकरण प्रकल्पाचे उद्घाटन
मध्य रेल्वेवरील पेण-रोहा विद्युतीकरणासाठी ६० कोटी खर्च केले आहेत. एकूण दिवा-रोहा डेमू सर्व्हिस ऐवजी मेमू सर्व्हिस लागू करण्यात आली आहे.
>पुणे-कर्जत पॅसेंजर पनवेलपर्यंत
रेल्वे प्रशासनाच्या वतीने पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर पनवेलपर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ५१३१८ आणि ५१३१७ या पॅसेंजरचे पनवेलपर्यंत विस्तारीकरण केले आहे. कर्जत-पनवेलदरम्यान ही गाडी चौक, मोहोपे, चिखले यादरम्यान थांबा घेईल. या गाडीला १० सामान्य द्वितीय श्रेणी बोगी आणि दोन लगेज बोगी असतील.
‘ग्रीन स्टेशन’ म्हणून रोहा, पेण, आपटा
मध्य रेल्वे मार्गावरील रोहा, पेण, आपटा हे स्थानक ग्रीन स्टेशन म्हणून ओळखले जाणार आहेत. या स्थानकांचे उद्घाटन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. ग्रीन स्टेशनवर १०० टक्के एलएडी दिवे लावण्यात आले आहेत.
आणखी ४० एटीव्हीएम
मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकावर आणखी ४० एटीव्हीएम लावण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना स्मार्टपणे ‘स्मार्ट तिकीट’ काढता येईल. सध्या पश्चिम रेल्वे स्थानकावर ३७०, मध्य रेल्वे स्थानकावर ३१८ एटीव्हीएम मशीन आहेत. तसेच दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण या स्थानकांवर विद्युत दिव्यांची व्यवस्था केली आहे. दोन्ही प्रकल्पाचे उद्घाटन खासदार राहुल शेवाळे यांनी केले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सीएसएमटी, मुंबई सेंट्रल टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण केले. याची उंची १०० फूट असून ध्वजाचा आकार ३० फूट बाय २० फूट आहे.
रायगडचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मध्य रेल्वे मार्गावरील बेलापूर, तळोजा आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रभादेवी, माटुंगा रोड, जोगेश्वरी, गोरेगाव, विरार, मालाड स्थानकांच्या पादचारी पुलाचे लोकार्पण केले. दोन्ही मार्गांवरील एकूण ९१ पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

Web Title: 'Theoretically the AC will run soon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.