ढोंग करण्यापेक्षा काश्मीर सरकारमधून बाहेर पडा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 07:44 AM2018-02-03T07:44:22+5:302018-02-03T10:42:50+5:30

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपदाकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे.

Then why should I stay in government? - Uddhav Thackeray | ढोंग करण्यापेक्षा काश्मीर सरकारमधून बाहेर पडा - उद्धव ठाकरे

ढोंग करण्यापेक्षा काश्मीर सरकारमधून बाहेर पडा - उद्धव ठाकरे

Next

मुंबई-  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपदाकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रालयात धर्मा पाटील हे ८४ वर्षांचे शेतकरी आत्महत्या करतात व कश्मीरात भाजपप्रणीत सरकार अतिरेक्यांना मारले म्हणून लष्करावर गुन्हे दाखल करते आणि वर आपल्याच सरकारविरोधात आकांडतांडव करण्याचे ढोंगही रचते. हे ढोंग करण्यापेक्षा सरकारमध्ये का राहता? सत्ता का सोडत नाही? असा थेट सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. राष्ट्रहिताचा व लष्कराच्या मनोधैर्याचा तसेच स्वाभिमानाचा प्रश्न असल्याने आम्ही हे बोलतोय. आमचा कुजबुज वाहिनीवर विश्वास नसल्याने थेट प्रश्न विचारीत आहोत, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे.

सामना संपादकीयमध्ये म्हंटलं आहे की,

सरकारमध्ये राहता, मंत्रीपदे भोगता आणि पुन्हा सरकारवर टीका करता? त्यापेक्षा सरकारमधून बाहेर का नाही पडत, असले प्रश्न शिवसेनेच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कुजबुज वाहिनीकडून नेहमीच प्रसवले जातात. खरं तर हा प्रश्न त्यांनी जम्मू-कश्मीर सरकारात खुर्च्या उबवून पुन्हा सरकारविरोधात गोंधळ घालणाऱ्या स्वकीयांना विचारायला हवा. मेहबुबा सरकारात भाजप सहभागी आहे व त्या मंडळींनी आता सरकारविरोधात ‘मस्ती’ सुरू केली आहे. ताजे प्रकरण शोपियान जिल्ह्यातील लष्करी ताफ्यावरील हल्ला आणि दगडफेक करणाऱ्यांऐवजी लष्करावरच गुन्हा दाखल करण्याबाबतचे आहे. गस्तीसाठी निघालेल्या लष्कराच्या ताफ्यावर तीन दिवसांपूर्वी दक्षिण कश्मीरातील गनोवपुरा येथे चारशे-पाचशेच्या जमावाने भयंकर हल्ला केला. प्रचंड दगडफेक केली. लष्करी तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या मेजर व सात जवानांना ठार मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे लष्करास स्वसंरक्षणासाठी बंदुका चालवाव्या लागल्या. त्यात दोन दगडफेक्यांचा मृत्यू झाला. आता या सर्व प्रकरणात लष्करावर ठपका ठेवून संबंधित मेजर व त्यांच्या गस्ती पथकावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश मेहबुबा सरकारने दिले. त्यामुळे गोची झालेल्या भाजपने हातपाय झाडून, मुठी वगैरे आवळून सरकारचा निषेध केला आहे. कारण आता याप्रश्नी मौनक्रत धारण करून खुर्च्या उबवल्या तर मोठ्या जनउद्रेकास तोंड द्यावे लागेल अशी भीती त्यांना वाटत असावी. 

याप्रश्नी भाजपने विधानसभेत हंगामा केला. खरं तर प्रत्यक्ष मेहबुबा सरकारमध्ये ही मंडळी आहे व उपमुख्यमंत्रीपदासह अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे सरकारमध्ये राहून हे असे बेशिस्त वागणे त्यांना शोभते काय? जमत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा. पण महाराष्ट्रात जे प्रश्न विचारले जातात ते जम्मू-कश्मीरात विचारण्याची सोय नाही. कश्मीरमधील पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी आपले लष्कर लढत आहे. लष्करावर दगडफेक करणाऱ्या माथेफिरूंना पाक संघटनांकडून पैसे वाटले जातात हे रहस्य काही लपून राहिलेले नाही. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती युद्धासारखीच आहे व मेहबुबा सरकारची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. श्रीनगरच्या लाल चौकात हिंदुस्थानचा तिरंगा फडकवण्याची हिंमत मेहबुबा सरकारमध्ये नाही व अशा सरकारचे भागीदार म्हणून तिथे भाजप मंडळ बसले आहे. मेहबुबांना लाल चौकात तिरंगा फडकवता येत नाही. कारण कश्मीरातील पाक समर्थकांना बाईसाहेब तोंड देऊ शकत नाहीत, पण सरकारातील भाजपचे इतर मंत्री हे राष्ट्रीय कर्तव्य नक्कीच पार पाडू शकतात. अर्थात आज याप्रश्नी ते गप्पच आहेत. मात्र लष्करावर गुन्हा दाखल होताच भाजप आमदारांनी दबक्या सुरात का होईना, पण आवाज उठवायला सुरुवात केली.

कारण त्यांना आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणे अवघड बनले आहे. याआधी मेहबुबा बाईसाहेबांनी घेतलेल्या अनेक भूमिका राष्ट्रहिताच्या नव्हत्या. अफझल गुरूस स्वातंत्र्यसेनानीचा दर्जा देणाऱ्या या बाईसाहेब आहेत. किंबहुना त्यांच्या पक्षाची ती भूमिकाच आहे. हिजबूलचा कमांडर अश्रफ वाणी लष्करी चकमकीत मारला गेला तेव्हाही लष्करास आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून अश्रफसाठी हळहळणाऱ्या या मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची हिंमत त्यांच्या सरकारातील भागीदारात नव्हतीच. मारलेल्या अतिरेक्यांच्या कुटुंबीयांना जनतेच्या तिजोरीतून ‘लाखो’ रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे भयंकर प्रकार मेहबुबा-भाजप सरकारने तिथे केलेच ना, पण महाराष्ट्रात धर्मा पाटील यांच्यासारख्या अभाग्यांना न्याय देण्याची भाषा शिवसेनेने करताच सरकारमध्ये राहता कशाला, असे प्रश्न विचारले जातात. ‘जय जवान जय किसान’ या घोषणेच्या कशा चिंधड्या उडाल्या आहेत ते पहा. महाराष्ट्राच्या मंत्रालयात धर्मा पाटील हे ८४ वर्षांचे शेतकरी आत्महत्या करतात व कश्मीरात भाजपप्रणीत सरकार अतिरेक्यांना मारले म्हणून लष्करावर गुन्हे दाखल करते आणि वर आपल्याच सरकारविरोधात आकांडतांडव करण्याचे ढोंगही रचते. हे ढोंग करण्यापेक्षा सरकारमध्ये का राहता? सत्ता का सोडत नाही? राष्ट्रहिताचा व लष्कराच्या मनोधैर्याचा तसेच स्वाभिमानाचा प्रश्न असल्याने आम्ही हे बोलतोय. आमचा कुजबुज वाहिनीवर विश्वास नसल्याने थेट प्रश्न विचारीत आहोत.

Web Title: Then why should I stay in government? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.