निवडणूक आयोगाचे ‘फ्लॅश मॉब’ ठरताहेत कुतूहलाचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:47 AM2019-04-25T05:47:31+5:302019-04-25T05:47:49+5:30

मतदानाचा संदेश देणारे हे फ्लॅश मॉब सध्या कुतूहलाचे विषय ठरत आहेत.

The subject of the curiosity of the Election Commission being the 'Flash Mob' | निवडणूक आयोगाचे ‘फ्लॅश मॉब’ ठरताहेत कुतूहलाचा विषय

निवडणूक आयोगाचे ‘फ्लॅश मॉब’ ठरताहेत कुतूहलाचा विषय

Next

मुंबई : मतदानाचा टक्का वाढावा, नवमतदारांसह सर्व पात्र मतदारांनी आवर्जून मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाने ‘फ्लॅश मॉब’च्या माध्यमातून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. दादर, परळ आणि नरिमन पॉइंट येथील फ्लॅश मॉबनंतर बुधवारी सीएसएमटी स्थानकावरील या ‘फ्लॅश मॉब’ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदानाचा संदेश देणारे हे फ्लॅश मॉब सध्या कुतूहलाचे विषय ठरत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात बुधवारी दुपारी प्रवाशांची लोकल पकडण्याची लगबग सुरू असतानाच, २० तरुण-तरुणींनी फ्लॅश मॉब सुरू केला. अचानक सुरू झालेल्या या सामूहिक नृत्याला अचंबित प्रवाशांनी आवर्जून दाद दिली. या फ्लॅश मॉबमधून ‘मतदान करा, आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावा’ असे आवाहन मुंबईकरांना करण्यात आले.

मुंबई शहर जिल्ह्यातील दक्षिण मध्य आणि दक्षिण या दोन मतदारसंघांत २४ लाख ५७ हजार २६ पात्र मतदार आहेत. मुंबईत चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात येत असल्याचे, मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सांगितले.

आणखी ‘फ्लॅश मॉब’ दिसणार
आतापर्यंत दादर, परेल, नरिमन पॉइंट येथे फ्लॅश मॉब झाले आहेत. येत्या काळात चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वरळी, गेट वे आॅफ इंडिया, सीआर-२ मॉल येथेही फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.

Web Title: The subject of the curiosity of the Election Commission being the 'Flash Mob'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.