यात्रा-उत्सवामुळे एसटीला आर्थिक बळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 03:43 AM2018-08-18T03:43:24+5:302018-08-18T03:43:40+5:30

राज्यात दरवर्षी स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावर विविध यात्रा आणि उत्सवांचे आयोजन करण्यात येते. उत्सवांमधील यात्रेत सहभागी सुमारे ८५ टक्के प्रवासी एसटीचा वापर करतात.

ST's financial strength due to festival ! | यात्रा-उत्सवामुळे एसटीला आर्थिक बळ!

यात्रा-उत्सवामुळे एसटीला आर्थिक बळ!

Next

- महेश चेमटे
मुंबई - राज्यात दरवर्षी स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावर विविध यात्रा आणि उत्सवांचे आयोजन करण्यात येते. उत्सवांमधील यात्रेत सहभागी सुमारे ८५ टक्के प्रवासी एसटीचा वापर करतात. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत महामंडळाचा यात्रा-उत्सव काळातील आलेख उंचावत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या एसटी महामंडळाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) यात्रा-उत्सवाच्या वेळी गर्दी नियोजनासाठी जादा फेऱ्या सोडण्यात येतात. यात प्रामुख्याने आषाढी व कार्तिकी पंढरपूर यात्रा यांचा समावेश आहे, तसेच आळंदी, देहू, पैठण, तुळजापूर, शेगाव, भीमाशंकर, वणी, माहूर, सैलानी, खुलताबाद-उरूस आणि चैत्र जोतिबा या यात्रा-उत्सवांसाठीही एसटीकडून विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळेच या काळात ग्रामीण भागातील बहुतांश प्रवासी एसटीने प्रवास करतात.
२०१७-१८ काळातील यात्रा-उत्सवांमध्ये १ कोटी २३ लाख प्रवाशांनी एसटीचा वापर केला आहे. यातून महामंडळाला ७० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर २०१६-१७ साली १ कोटी २२ लाख प्रवाशांनी यात्रा-उत्सवांसाठी एसटीचा वापर केल्याने, महामंडळाने उत्पन्नाचा ६६ कोटींचा उत्पन्नाचा आकडा पार केला. २०१५-१६ साली याच कालावधीत १ कोटी १५ लाख प्रवाशांना सेवा पुरविल्यामुळे एसटीला ५९ कोटींचे उत्पन्न मिळाले.
यात्रा-उत्सव काळातील उत्पन्न वाढीसाठी महामंडळाने ‘विठाई’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संकल्पनेंतर्गत खासगी बस चालकांच्या टुरिस्ट पॅकेजला टक्कर देण्यासाठी आगामी वर्षात १ हजार ‘विठाई’ बसची बांधणी करण्यात येणार आहे. ‘विठाई’च्या माध्यमातून अष्टविनायक यात्रा, शिर्डी-शनिशिंगणापूर दर्शन या व अन्य ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय महामंडळाकडून स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येईल. यात्रा-उत्सव काळ वगळता, या एसटी आंतरशहर मार्गावर चालविण्यात येणार असल्याची माहिती एसटीतील अधिकाºयांनी दिली.

आंदोलनामुळे मोठा आर्थिक फटका

एसटी महामंडळाचा यात्रा-उत्सव काळातील उत्पन्नवाढीचा उंचावता आलेख दिलासादायक असला, तरी आंदोलन काळात झालेल्या एसटीच्या नुकसानीमुळे महामंडळ चिंताग्रस्त आहे. राज्यातील महामंडळाच्या सुमारे ३५० एसटीचे विविध आंदोलनांत नुकसान झाल्याने, दुरुस्ती खर्च आणि बुडालेला रोजचा महसूल, यामुळे एकत्रित अंदाजे ३० कोटींचा फटका महामंडळाला बसल्याची माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

ग्रामीण भागात प्रवासी वाहनांसाठी एसटी प्रमुख साधन आहे. यात्रा-उत्सव काळातील उत्पन्न वाढीसाठी महामंडळ विविध उपाययोजनांवर काम करत आहे. प्रवाशांचादेखील याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, महामंडळातील उपाययोजना यशस्वी ठरत आहेत.
- रणजित सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Web Title: ST's financial strength due to festival !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.