... so did Lala's candidature | ...म्हणून मिळाली लाड यांना उमेदवारी

- यदु जोशी
मुंबई : राजकारणात दीर्घकाळ टिकायचे तर आपल्या समर्थकांना राजकीय बळ द्यावे लागते. राज्यातील आजवरच्या अनेक नेत्यांनी हेच केले. आज प्रसाद लाड यांना विधान परिषदेची भाजपाची उमेदवारी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोच कित्ता गिरविला आहे.
लाड खरेतर अनेक वर्षे राष्ट्रवादीमध्ये होते. २०१४ची विधानसभा निवडणूक त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीकडून लढविली आणि
ते भाजपाकडून पराभूत झाले
होते. त्यानंतर काही महिन्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ते अपक्ष लढले. त्या वेळी
भाजपाने त्यांना पाठिंबा दिला; पण ते केवळ दोन मतांनी पराभूत झाले.
मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठीची ती निवडणूक होती. त्यात शिवसेनेचे रामदास कदम
आणि काँग्रेसचे भाई जगताप
विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने लाड हे मुख्यमंत्र्यांच्या
गोटात गेले आणि चांगलेच स्थिरावले. आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट विधान परिषदेची संधी दिली.
मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील कट्टर समर्थक परिणय फुके यांना
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशीच प्रतिष्ठा पणाला लावली आणि फुके विजयी झाले होते. तथापि, फुकेंची गणना मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांपेक्षा मित्रांमध्ये होते. प्रवीण दरेकर, आर. एन. सिंह यांना विधान परिषदेवर पाठविताना मुंबई महापालिकेचे राजकारण डोळ्यांसमोर होते. मात्र, आज लाड यांना मिळालेली उमेदवारी ही मुख्यमंत्री समर्थकांना भविष्यात मिळणार असलेल्या संधीची सुरुवात मानली जात आहे.
लाड यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: शब्द टाकल्याची माहिती आहे. याशिवाय ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याशी असलेली मैत्री लाड यांच्या मदतीला धावली.
पक्षसंघटनेत वर्षानुवर्षे निष्ठेने काम करीत आलेल्या माणसांना आमदार, खासदारकीसाठी ताटकळावे लागते हा अनुभव घेणारे माधव भंडारी हे पहिलेच नाहीत. यावर भाजपाच्या एका ज्येष्ठ आमदारांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘पक्षसंघटनेतील लोकांनी सरकारमधील नेतृत्वाशी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी पण भाजपामध्ये संघटनेत काम करणारे अनेक जण सहकार्याऐवजी लगेच सल्लागाराच्या भूमिकेत जातात. आमच्यामुळे पक्ष आहे; या अविर्भावात राहून ते पक्षाच्या लोकप्रतिनिधींना क्षुल्लक लेखतात. आम्ही लोकांमधून निवडून आलो आहोत पण पक्षसंघटनेतील लोक आमच्यावर उगाच रुबाब दाखवतात, अशी विशेषत: भाजपाच्या अनेक लोकप्रतिनिधींची भावना आहे. आमदार, खासदारांपासून ज्येष्ठ मंत्र्यांपर्यंत अनेकांचा एकेरीत उल्लेख केला जातो, सरकार कसे चालवावे याचे सल्लेही दिले जातात. संघटनेच्या दडपणात कोणी जाहीर बोलत नाही एवढेच. अगदी आजचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनाही एकेकाळी अशा रुबाबाला नागपुरात बळी ठरावे लागले होते. ते पालकमंत्री असताना त्यांना भाजपाच्या कार्यालयात बाहेर ताटकळत बसविले जात असे. पक्षसंघटनेतील माणसांना संधी देण्याचा विषय आला की मग साहजिकच या सल्लागारांना आपल्या पंक्तीत घेण्यास पक्षाचेच सत्ताकर्ते अनुत्सुक असतात. माधव भंडारी यांना डावलल्याने हा विषय पुन्हा समोर आला आहे. भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पक्षसंघटनेतील पदाधिकारी यांच्यातील सुप्त संघर्षाची किनारही त्यांना डावलण्यामागे असल्याची चर्चा आहे.

पहाटे ४ ला शिक्कामोर्तब

प्रसाद लाड यांच्या उमेदवारीवर सोमवारी पहाटे
४ वाजता शिक्कामोर्तब झाले. प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर यांच्या ‘वर्षा’, ‘मातोश्री’ अशा चकरा झाल्या आणि लाड यांच्या उमेदवारीचे ठरले.