गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार? उद्धव ठाकरेंचं भाजपावर शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 08:07 AM2018-10-15T08:07:25+5:302018-10-15T08:13:28+5:30

नागपूर, मुंबईसह राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र

shiv sena slams cm devendra fadnavis and bjp over law and order failure in state | गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार? उद्धव ठाकरेंचं भाजपावर शरसंधान

गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार? उद्धव ठाकरेंचं भाजपावर शरसंधान

Next

मुंबई: शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरुन आणि राज्यातील गुन्हेगारीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर शरसंधान साधण्यात आलं आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार लेकी-सुनांना पळवून न्यायची भाषा करतात. त्यांना पोलिसांचे संरक्षण मिळते, पण ‘मेट्रो’च्या झुंडशाहीवर जाब विचारणार्‍या आमदार कातेंवर खुनी हल्ला होतो. अर्थात गुंड व गुन्हेगारांना घेऊन जे पक्ष विस्तार करीत आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी?, अशा शब्दांमध्ये ठाकरेंनी भाजपावर तोफ डागली आहे.
 
राज्यातील वाढती गुन्हेगारी, नागपूरपाठोपाठ मुंबईत वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. 'शिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची ही सुरुवात आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. पोलिसांना पक्ष कार्यकर्त्याचा दर्जा व पक्षातील वाल्यांना कायदा-सुव्यवस्थेचे रखवालदार बनवले गेले आहे. त्याचा परिणाम नागपुरात व आता मुंबईतही दिसत आहे. राज्याच्या भवितव्यासाठी हे चित्र चांगले नाही,' अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून करण्यात आली आहे. 'मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे सरकार मान्य करणार नाही, पण  मुंबईसह महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचे काही बरे चाललेले नाही. भीमा-कोरेगाव दंगल व त्यानंतर पुकारलेल्या ‘बंद’मध्ये प्रचंड हिंसाचार झाला. पोलिसांनी त्यावेळी बघ्याची भूमिका घेतली. मध्यंतरी झालेल्या मराठा क्रांती आंदोलनातही काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या. आता मुंबईत दिवसाढवळ्या खून व हिंसक हल्ले सुरू झाले आहेत. मुंबईत मानखुर्दचे शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर समाजकंटकांनी खुनी हल्ला केला. त्यातून ते थोडक्यात बचावले, पण रक्त सांडले आहे. त्याचवेळी दादरच्या फूल मार्केट या गजबजलेल्या भागात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या झाली. असे प्रकार गेल्या दोन महिन्यांत वाढीस लागले तरी सर्व काही आलबेल असल्याच्या थाटात कारभार हाकला जात आहे,' अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. मात्र त्यांच्याच नागपूरातील स्थिती वाईट आहे आणि आता तसेच प्रकार मुंबईत घडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. 'महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक गुन्हे उपराजधानी नागपुरात घडत आहेत. खून, अपहरण, खंडणी, बलात्कार अशा घटनांनी नागपूरच्या प्रतिमेस तडे गेले आहेत. सध्या राजशकट मुंबईपेक्षा नागपुरातूनच हलत आहे. मुख्यमंत्र्यांसह अर्धे सरकार हे नागपूर-विदर्भातले. याचा ‘आधार’ गुंडापुंडांना वाटत असला तरी हे चित्र बरे नाही व हेच लोण आता मुंबईकडे पसरू लागले आहे. रोजच घडणार्‍या घटनांनी मुंबईकरांची झोप उडाली आहे. ज्या प्रकारे गुंड मोकाट सुटले आहेत ते धक्कादायक आहे. कोणी कितीही बोंबा मारल्या तरी मुंबई हे आजही सगळ्यात सुरक्षित शहर मानले जाते. पोलिसांचा दरारा व कायद्याचा धाक असल्यानेच मुंबई सुरक्षित राहिली, पण गेल्या दोन-चार वर्षांत मुंबईची जास्त वाट लागली आहे. सर्वच बाबतीत मुंबईवर जे अधिकारी लादले गेले ते फक्त ओरबडण्यासाठी व वाट लावण्यासाठीच. कमवा आणि शिका या उक्तीप्रमाणे ओरबाडा, स्वतःच्या खिशात घाला व आमच्याही झोळीत टाका हा नवा ‘समृद्धी मार्ग’ सर्वच सरकारी खात्यांत सुरू झाला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबरोबर मुंबईचा विकास, भलेपणाही संपला. मुंबई-महाराष्ट्राशी वर्षानुवर्षे संपर्क नसलेल्या अधिकार्‍यांच्या हाती राज्य देणे हा जनतेच्या जिवाशी खेळ आहे,' अशी टीका उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली आहे.

मेट्रोच्या कामावरुन झालेल्या वादानंतर तुकाराम कातेंवर हल्ला झाला होता. त्यावरुनही उद्धव ठाकरेंनी मूळचे नागपूरचे असलेल्या मुख्यमंत्र्यांना थेट लक्ष्य केलं आहे. 'मुंबईत सध्या ‘मेट्रो’ची वारेमाप कामे काढली आहेत. हे सर्व ठेकेदार नागपुरातूनच मागवले आहेत असा अनेकांचा दावा आहे. त्यांना वरून आशीर्वाद असल्याने संपूर्ण मुंबईत त्यांचा हवा तसा उत्पात सुरू आहे. येथील लोकांच्या पोटापाण्यावरून, घरादारांवरून ‘मेट्रो’रूपी नांगर फिरवले जात आहेत व त्यांना जाब विचारणार्‍या तुकाराम कातेंसारख्या आमदारांवर ते हल्ले करीत आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीत ही नवी विकृती वाढू लागली तर मुंबईची पुरती वाट लागल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार लेकी-सुनांना पळवून न्यायची भाषा करतात. त्यांना पोलिसांचे संरक्षण मिळते, पण ‘मेट्रो’च्या झुंडशाहीवर जाब विचारणार्‍या आमदार कातेंवर खुनी हल्ला होतो. आमचे रक्त सांडून तुमचे खिसे भरणारा ठेकेदारी संस्कृतीचा विळखा महाराष्ट्राच्या सरकारला पडला आहे,' अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 
 

Web Title: shiv sena slams cm devendra fadnavis and bjp over law and order failure in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.