शिंपोलीतील मैदानाचा खुलेआम गैरवापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 04:41 AM2018-04-25T04:41:13+5:302018-04-25T04:41:13+5:30

स्थानिक त्रस्त : कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Shipoli ground openly abused! | शिंपोलीतील मैदानाचा खुलेआम गैरवापर!

शिंपोलीतील मैदानाचा खुलेआम गैरवापर!

Next

मुंबई : बोरीवली पश्चिमेकडील शिंपोली येथील मैदानावर अतिक्रमण झालेले असून, त्याचा गैरवापर केला जात आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे मैदान झाकले गेले आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मैदान वाचवावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. याबाबत जनता दलाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिंपोली येथील भंडारी रोडलगत सिटी सर्व्हे क्रमांक ५३२/५३३वर असलेल्या या मैदानाचा वापर सध्या खेळांऐवजी इतर बाबींसाठी जास्त प्रमाणात होत आहे. या परिसरातील चार शाळांचे विद्यार्थी क्रीडांगणासाठी या मैदानावर अवलंबून आहेत.
मात्र, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी अतिक्रमण झाल्याने विद्यार्थ्यांना या मैदानाचा वापर करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
महापालिकेने मैदान सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षक भिंत बांधली होती. मात्र, उत्तरेकडील बाजूने गॅरेज व्यावसायिकांनी मैदानावर अतिक्रमण केले असून, सुमारे २५ टक्के हिस्सा गिळंकृत केला आहे. गॅरेजमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी येणारी वाहने या मैदानातच पार्क केली जात आहेत. इतकेच नव्हे, तर गॅस सिलिंडरचे वितरणदेखील या मैदानात ट्रक उभा करून केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

प्रशासनाने याकडेही लक्ष द्यावे...
भंडारी मार्गाकडील संरक्षक भिंत तुटलेली असल्याने परिसरातील कचरा मैदानाजवळ टाकला जातो. लघुशंका व प्रात:विधी उरकण्याचे कामदेखील या ठिकाणी बिनदिक्कतपणे केले जात आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनैतिक बाबींसाठी सार्वजनिक मुतारीचा गैरवापर केला जातो.
मैदानाचा गैरवापर, त्यावर झालेले अतिक्रमण, त्यातून निर्माण झालेला सुरक्षेचा प्रश्न, अस्वच्छता, दुर्गंधी याबाबत स्थानिक नागरिकांनी व स्वयंसेवी संस्थांनी अनेक वेळा महापालिका विभाग कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची गांभीर्याने दखल घेतली गेलेली नाही.
या सर्व प्रकाराविरोधात महापालिकेच्या ‘आर’ विभाग कार्यालयाने व स्थानिक पोलिसांनी उपाययोजना करून ते रोखण्यासाठी पावले उचलावीत; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जनता दल सेक्युलर पक्षाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर व उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विलास रोहिमल यांनी दिला आहे.

‘अनधिकृत बांधकामे निष्कासित करू’
याबाबत महापालिकेचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिराजदार म्हणाले, या ठिकाणी मैदानाच्या सर्व बाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने भंगारवाले व रस्त्याशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मैदानाचा गैरवापर सुरू केला होता. तिथे उभारण्यात आलेले अनधिकृत बांधकाम त्वरित निष्कासित करण्यात येणार आहे. मैदान सुरक्षित राहावे यासाठी संपूर्ण मैदानाला संरक्षक भिंत उभारण्याबाबत लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल व हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल.

Web Title: Shipoli ground openly abused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई