करून दाखवलं; कामगार चळवळीत घुमला शशांक राव यांचा 'आवाssज'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 08:35 AM2019-01-17T08:35:59+5:302019-01-17T08:37:45+5:30

कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखाली अनेक संप झाले. मुंबईतीलच नव्हे, तर देश पातळीवरील अनेक संघटनांमध्ये त्यांचा यशस्वी सहभाग होता.

Shashanka Rao's voice shines in the labor movement in Mumbai Best strike | करून दाखवलं; कामगार चळवळीत घुमला शशांक राव यांचा 'आवाssज'

करून दाखवलं; कामगार चळवळीत घुमला शशांक राव यांचा 'आवाssज'

googlenewsNext

मुंबई : कामगार नेते शरद राव यांच्या निधनानंतर बेस्ट कामगारांचा हा पहिलाच मोठा संप. त्यामुळे हा लढा किती काळ टिकेल? याबाबत साशंकता व्यक्त होत होती. शशांक राव यांच्या नेतृत्वाला त्यांच्या वडिलांच्या सहकाऱ्यांनी नाकारल्यामुळे हा संप त्यांना कामगार चळवळीतून नामशेष करेल, असा दावा केला जात होता. मात्र, बेस्ट कृती समितीच्या माध्यमातून सर्वच कामगार संघटना एकत्रित आल्याने, शशांक राव यांच्या लढ्याला बळ मिळाले. कामगारांच्या या एकजुटीचा दबाव वाढत गेल्यामुळे बेस्ट कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या आणि पहिल्याच लढ्यात शशांक राव यांनी आपले अस्तित्व निर्माण केले.

कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखाली अनेक संप झाले. मुंबईतीलच नव्हे, तर देश पातळीवरील अनेक संघटनांमध्ये त्यांचा यशस्वी सहभाग होता. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र शशांक राव यांनी सर्व संघटनांचा कारभार आपल्या हाती घेतला. परदेशातून उच्चशिक्षण घेऊन आलेले शशांक राव यांनी वडिलांबरोबर काही सभा, आंदोलन जवळून पाहिली. मात्र, अनुभव तोकडा असल्याने त्यांचे नेतृत्व ज्येष्ठ नेत्यांनी स्वीकारले नाही आणि म्युनिसिपल मजदूर युनियनमधून त्यांना दूर करण्यात आले. त्यामुळे बेस्टचा संप हा राव आणि बेस्ट उपक्रमालाही संपविणार, असा काहींचा अंदाज होता.

बेस्ट प्रशासनाने केलेली कारवाई, पालिका प्रशासनाची ताठर भूमिका आणि शिवसेनेची संपातून माघार या घडामोडींमुळे राव यांच्यावर संप मागे घेण्याचा दबाव वाढू लागला. राव यांचे बोलविते धनी दुसरेच असल्याचेही बोलले जात होते. त्याच वेळी कामगारांची एकजुटी, प्रतिस्पर्धी पक्षाकडून मिळणारा पाठिंबा आणि पहारेकºयांचे मौन यामुळे राव यांचे आंदोलन यशस्वी ठरले.

कामगार चळवळीत शशांक राव यांचा आवाज घुमला आणि राव यांनी या चळवळीत आपला दबदबा निर्माण केला. मुंबईचे कामगार विश्व म्हटल्यावर जॉर्ज फर्नांडिस, बाळ दंडवते, शरद राव, महाबळ शेट्टी, गोपाळ शेट्टी, दिगंबर सातव आदी कामगार नेत्यांची नावे आठवतात. त्यांच्या तुलनेत शशांक राव त्यांचे नेतृत्त्व कसे सिद्ध करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. बेस्टच्या या संपाने शशांक राव यांना कामगार चळवळीत स्वत:चे स्थान निर्माण करण्याएवढी शक्ती दिली आहे.

अन्य कामगार संघटना धास्तावल्या
संप बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार करेल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, दत्ता सामंत यांची पुण्यतिथीलाच बेस्ट कामगारांचा संप यशस्वी झाला. मुख्य म्हणजे कामगारांचा कौल घेऊन हा संप पुकारण्यात आला होता, तसेच प्रत्येक निर्णय कामगार मेळाव्यात घेण्यात आल्याने कामगारांचा विश्वास वाढत गेला. त्यामुळे हाच फॉर्म्युला आता महापालिकेतही अंमलात येणार आहे. बेस्टमधील अन्य संघटनेचे सभासदही बेस्ट वर्कर्स युनियनकडे वळले. त्यामुळे महापालिकेतील आणि इतर संघटनेतील सभासदही शशांक राव यांची ताकद वाढवेल,
असे अंदाज बांधले जात आहेत.

Web Title: Shashanka Rao's voice shines in the labor movement in Mumbai Best strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.