...तेच आपलं शेवटचं हत्यार, सीमावादावर शरद पवार यांची रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 04:08 PM2021-01-27T16:08:49+5:302021-01-27T16:12:38+5:30

कर्नाटकात गेलेली मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात सामील करण्यासाठीची रोखठोक भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केली. 

sharad pawar statement on maharashtra karnataka border dispute | ...तेच आपलं शेवटचं हत्यार, सीमावादावर शरद पवार यांची रोखठोक भूमिका

...तेच आपलं शेवटचं हत्यार, सीमावादावर शरद पवार यांची रोखठोक भूमिका

googlenewsNext

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. 

शरद पवार यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सीमावादाच्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला आणि कर्नाटकात गेलेली मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात सामील करण्यासाठीची रोखठोक भूमिका स्पष्ट केली. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री

"आमच्या सगळ्यांच्या यातना एक-दोन दिवसांचा असेल पण सीमा भागातला तरुण हा पिढ्यांपिढ्या या सगळ्या यातना सहन करतोय. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्ट आपलं शेवटचं हत्यार आहे. कोर्टात आपल्याला पूर्ण तयारीने भूमिका मांडावी लागेल. यासाठी निष्णात वकील देखील देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. सीमावादाचा प्रश्न अजूनही आहे तसाच आहे. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी अधिक लक्ष घालत आहेत ही जमेची बाजू आहे. या प्रश्नासाठी महाराष्ट्र एकीनं उभा आहे", असं शरद पवार म्हणाले.

पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती आणावी
"गेले अनेक वर्ष ज्या प्रश्नासाठी मराठी माणूस अस्वस्थ आहे, त्या प्रश्नाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पुस्तक रुपाने कायमस्वरुपी समाजासमोर कायमस्वरुपी राहावी यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला. डॉ. दीपक पवार यांच्यावर जबाबदारी टाकून हा एक ग्रंथ आज आपल्या सर्वांसमोर त्यांनी सादर केला. पण या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती देखील यायला हवी. जेणेकरुन या संघर्षाची कहाणी सर्वांपर्यंत पोहोचेल", असं शरद पवार म्हणाले.  

मराठी माणसाला न्याय मिळायलाच हवा
सीमावादाच्या आंदोलनावरुन आमच्या सगळ्यांच्या यातना एक-दोन दिवसांच्या असतील पण सीमा भागात राहणारा तरुण पिढ्यांपिढ्या यातना सहन करतोय. मी मराठी आहे आणि मराठी भाषिकच म्हणून जगण्याचा अधिकार मला आहे. या भावनेतून अनेक वर्ष हा संघर्ष सुरू आहे. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी मराठी माणसांची आहे. त्यांनी आपल्या रोखठोक भूमिकेतून अजूनही चळवळ धगधगद ठेवली आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळायला हवा, असंही पवार म्हणाले. 
 

Web Title: sharad pawar statement on maharashtra karnataka border dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.