मुंबई -  मुंबईमधील उपनगरीय लोकलमध्ये गर्दीमुळे बाचाबाची होऊन मारहाणीचे प्रकार अनेकदा घडत असतात. मात्र लोकलमधून प्रवास करत असलेल्या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला दोघा पुरुषांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. ही महिला मुंबईतील रुग्णालयात उपचार घेऊन लोकलमधील अपंगांच्या डब्यातून विठ्ठलवाडीला परतत असताना कुर्ला आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. मात्र तिला मारहाण करणाऱ्यांना सहप्रवाशांनी पकडून इंगा दाखवताच ते दोघेही डोंबिवली स्थानकातून गर्दीचा फायदा घेत पळ काढला. 
याबाबतची सविस्तर हकीकत अशी, विठ्ठलवाडी येथील दिनेश तिवारी त्यांच्या गर्भवती पत्नी अरुणा हिला घेऊन मुंबईतीला कामा रुग्णालयात गेले होते. तेथे अरुणा यांच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी संध्याकाळी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विठ्ठलवाडीच्या दिशेने जाणारी लोकल पकडली. संध्याकाळची वेळ असल्याने लोकलला गर्दी होती त्यामुळे ते अपंगांसाठीच्या राखीव डब्यात चढले. 
दरम्यान, कुर्ला स्थानकात दोन पुरुष त्या डब्यात चढले. त्यांनी तिवारी दाम्पत्याला दमदाटी करण्यास सुरुवात केली. तुम्ही अपंगांच्या डब्यात का चढलात असे विचारत त्यांनी अरेरावी केली. आपल्यासोबत गर्भवती पत्नी असल्याने आपण या डब्यात चढलोय. विठ्ठलवाडी स्थानक येताच आम्ही उतरून जाऊ असे तिवारी यांनी सांगितले. मात्र त्यांचे म्हणणे ऐकून न घेता या इसमांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तिवारी यांना वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नी अरुणा मध्ये पडल्या. मात्र या नराधमांनी त्यांनाही मारहाण केली.  मात्र या प्रकारासमुळे संतप्त झालेल्या सह प्रवाशांनी या दोघांनाही पकडून त्यांची पिटाई केली. अखेर लोकल डोंबिवली स्थानकात पोहोचताच हे दोघेही पसार झाले. त्यानंतर तिवारी आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मात्र हा प्रकार कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्याने कुर्ला रेल्वे पोलीस प्रकरणाचा तपास करतील, असे डोंबिवलीमधील रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.  


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.