Sexual harassment on minor girls giving drug pills | नशेची गोळी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
नशेची गोळी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : तेरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रकार कांदिवली पूर्व परिसरात घडला. या प्रकरणी सहा जणांवर कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे. तर चौघांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असून हे प्रकरण पुढील चौकशीसाठी समतानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
कांदिवलीत दामू नगरच्या लहूगड परिसरात हा प्रकार घडला. यातील तक्रारदार मुलगी सुधा (नावात बदल) ही कुरारमध्ये राहते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च २०१९ ला रात्री ८च्या सुमारास सुधाच्या एका मैत्रिणीने तिला भेटायला बोलावले होते. त्यानुसार सुधा तिला भेटायला गेली. त्या वेळी डोंगरात फेरफटका मारून येऊ, असे तिने सुधाला सांगितले. सुधा तिच्यासोबत गेली. तेव्हा त्या ठिकाणी पाच जण आधीपासूनच हजर होते. त्यातील सलीम उर्फ बबलू (१९) आणि आणखी एका अल्पवयीन आरोपीला सुधा ओळखत होती. मात्र अन्य तीन जण तिच्या परिचयाचे नव्हते.
या सर्वांनी मिळून तिला नशेची गोळी दिली आणि त्यातच तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला, असे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे. रात्री १२च्या सुमारास ती घरी पोहोचली तेव्हा तिची अवस्था फारच वाईट होती. त्यावरून घरच्यांनी तिला विश्वासात घेत विचारले. सुरुवातीला तिने काहीच सांगितले नाही. त्यानंतर घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेले तेव्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानुसार डॉक्टरने घरच्यांना याबाबत सांगितले. तसेच याबाबत कुरार पोलिसांना कळविण्यात आले. मुलीने दिलेल्या माहितीवरून, कुरार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करीत, सलीम आणि अल्पवयीन मुलाला अटक केली. तर उर्वरित तिघांचा शोध सुरू असून सुधाच्या मैत्रिणीलादेखील यात आरोपी करण्यात आले आहे.
हा प्रकार समतानगरच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण आता त्यांना वर्ग करण्यात आले आहे. या घटनेमुळे दामू नगर परिसरात खळबळ उडाली असून मुलीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Web Title:  Sexual harassment on minor girls giving drug pills
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.