सेनापती हंबीररावांनी साथ दिली आणि शंभूराजे छत्रपती झाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 08:38 PM2019-01-16T20:38:48+5:302019-01-16T20:41:30+5:30

हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींनी ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर देह ठेवला, तेव्हा युवराज शंभूराजे पन्हाळगडावर होते.

Senapati Hambir Rao cooperated and Shambhuraje became Chhatrapati! | सेनापती हंबीररावांनी साथ दिली आणि शंभूराजे छत्रपती झाले!

सेनापती हंबीररावांनी साथ दिली आणि शंभूराजे छत्रपती झाले!

googlenewsNext

- संकेत सातोपे
हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींनी ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर देह ठेवला, तेव्हा युवराज शंभूराजे पन्हाळगडावर होते. पित्याच्या निधनाची आणि अष्टप्रधानमंडळातील वजनदार मंत्र्यांनी मातोश्री सोयराबाई यांच्या साहाय्याने कट रचून स्वराज्याची सूत्रे हाती घेतल्याची वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचली. लगोलग पेशवे मोरोपंत पिंगळे आणि सुरनीस अण्णाजी दत्तो पन्हाळ्यावर चालून येत असल्याचेही त्यांना कळले. अशा बाक्या प्रसंगात त्यांची साथ दिली, ती स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांनी! हंबीररावांच्या पाठिंब्यामुळे संभाजी राजांना बंडाळी मोडून काढत रायगड गाठता आला आणि आजपासून तब्बल ३३८ वर्षांपूर्वी अर्थात १६ जानेवारी १६८१ रोजी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला.

पन्हाळगड ही स्वराज्याची विजापूरच्या दिशेची सीमा असल्याने अनेक महत्त्वाच्या लढाया येथे लढल्या गेल्या. येथून बाहेरील राजकारण करणे सोयीचे असल्याने अनेकदा शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचेही वास्तव्य या गडावर असे! शंभुराजांची शेवटची भेट याच गडावर घेऊन शिवाजी महाराज रायगडावर गेले, तेथे द्वितीय पुत्र राजाराम यांच्या विवाह सोहळ्यानंतर काही दिवसांतच शिवरायांनी देह ठेवला. या वेळी पन्हाळ्यावर असलेल्या शंभुराजांना डावलून सोयराबाई यांनी अण्णाजी दत्तो यांच्यासारख्या हस्तकांच्या साहाय्याने आपले पुत्र राजाराम यांचा मंचकारोहण (राज्यभिषेकापूर्वीचा विधी) ६ मे १६८० रोजी पार पाडला.

या घडामोडी घडत असताना सेनापती हंबीरराव क-हाड परिसरात होते. संभाजी राजांनी समजूत काढून त्यांना स्वत:च्या पक्षात वळविले. विशेष म्हणजे सोयराबाई यांचे सख्ख्ये बंधू आणि मंचकारोहण झालेल्या राजारामांचे मामा असूनही स्वराज्याच्या भल्यासाठी त्यांनी संभाजी राजांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि ससैन्य पन्हाळ्यावर त्यांना येऊन मिळाले. आता संभाजी राजांना निकड होती, ती धन आणि धान्याची. त्यासाठी त्यांनी कोकणातील राजापूर आणि कुडाळ या भागांतील कमावीसदारांना द्रव्यासह पन्हाळ्यावर बोलावून घेतले. तसेच कारवार बंदरात मराठ्यांचा धान्यसाठा होता, तेही मागवून घेतला. विरोधक हिरोजी फर्जद, जनार्दनपंत हणमंते आदींना बेड्या ठोकल्या.
इतकी सिद्धता झाल्यामुळे रायगडावरून फौजेसह निघालेल्या अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे यांचा सहज बीमोड करून संभाजीराजांनी त्यांना कैद केले आणि १८ जून १६८० रोजी रायगड गाठला. २० जुलै रोजी त्यांचे मंचकारोहण झाले आणि ते राज्यकारभार करू लागले. मात्र त्यांचा राज्याभिषेक सोहळा त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी म्हणजे १६ जानेवारी १६८१ रोजी (माघ शुद्ध सप्तमी) पार पडला. संभाजीराजांचा चाणाक्षपणा आणि त्याला मिळालेली हंबीररावांची साथ यामुळे स्वराज्याला दुसरा कर्तृत्ववान छत्रपती लाभला. आजच्याच दिवशी शंभुराजे छत्रपती झाले.
‘श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते
यदंकसेविनो लेखा वर्तते कस्य नोपरि’
(अर्थ - शिवपुत्र शंभूची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे. या शंभूचा अंकाश्रय करणा-यांचा पगडा कोणावर बसणार नाही? असे हे दोन सेव्य सेवक शिवाजीने स्थापिलेल्या नूतन मराठी राज्याचे संरक्षक बनले.) 
अशी राजमुद्रा छत्रपती संभाजी महाराजांनी धारण केली.

Web Title: Senapati Hambir Rao cooperated and Shambhuraje became Chhatrapati!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.