शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांच्या खात्यात जमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 02:02 AM2018-04-27T02:02:26+5:302018-04-27T02:02:26+5:30

याचा अर्थ केवळ शिकवणी शुल्क व परीक्षा शुल्क शैक्षणिक संस्थांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

Scholarships will be credited to the educational institutions | शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांच्या खात्यात जमा होणार

शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांच्या खात्यात जमा होणार

Next

मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित शैक्षणिक संस्थांच्याच खात्यात जमा केली जाईल. मात्र, विद्यार्थ्यांच्या भत्त्यांची रक्कम विद्यार्थ्यांच्याच खात्यात जमा होईल, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले. याचा अर्थ केवळ शिकवणी शुल्क व परीक्षा शुल्क शैक्षणिक संस्थांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८पुरतीच ही सोय असून, पुढील शैक्षणिक वर्षासाठी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. २ मे रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारने न्या. भूषण गवई व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाला दिली.
गेल्या सुनावणीत खुद्द न्यायालयानेच राज्य सरकारला केवळ यंदाच्या वर्षाकरिता शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांच्या खात्यात जमा करण्याची सूचना केली होती. त्याबरोबर हेही सूचवले होते की, विद्यार्थ्यांची शिकवणी शुल्क व परीक्षा शुल्काचीच रक्कम शैक्षणिक संस्थांच्या खात्यात जमा करावी. उच्च न्यायालयाची ही सूचना मान्य करत राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला.

४ मे रोजी सुनावणी
शैक्षणिक संस्था बोगस विद्यार्थी दाखवून राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत असल्याने सरकारने शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांच्या खात्यावर जमा न करता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासंबंधी निर्णय घेत आॅगस्ट २०१७मध्ये अधिसूचना काढली. या अधिसूचनेला पुण्याच्या काही बड्या शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी ४ मे रोजी ठेवली आहे.

Web Title: Scholarships will be credited to the educational institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.