‘बाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी कमला मिलमध्ये तोंडदेखली कारवाई सुरु! - विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 08:38 PM2017-12-30T20:38:03+5:302017-12-30T20:38:40+5:30

कमला मिल कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरु झालेली कारवाई हा केवळ फार्स आहे. प्रत्यक्षात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या हॉटेल्सचे मालक हे ‘बाळराजें’चे जिवश्च कंटच्च मित्र आहेत असा थेट  आरोप करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे

To save the friends of 'Balrajane', face-to-face action in Kamala Mill started! - Vikhe Patil | ‘बाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी कमला मिलमध्ये तोंडदेखली कारवाई सुरु! - विखे पाटील

‘बाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी कमला मिलमध्ये तोंडदेखली कारवाई सुरु! - विखे पाटील

Next

मुंबई - कमला मिल कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरु झालेली कारवाई हा केवळ फार्स आहे. प्रत्यक्षात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या हॉटेल्सचे मालक हे ‘बाळराजें’चे जिवश्च कंटच्च मित्र आहेत. त्यांना या प्रकरणातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची तोंडदेखली कारवाई सुरु आहे, असा थेट  आरोप करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

विखे पाटील यांनी आज कमला मिल कंपाऊंडमधील घटनास्थळाची पाहणी केली व त्यानंतर त्यांनी भाजप व शिवसेनेवर जोरदार शरसंधान केले.‘मोजेस ब्रिस्ट्रो’ व ‘वन अबव्ह’ या दोन्ही हॉटेल्समध्ये बेकायदा व असुरक्षित बांधकाम झाल्याची पूर्ण माहिती महानगरपालिकेला होती. परंतु १४ निरपराध मुंबईकरांचे बळी जाईस्तोवर महानगर पालिका प्रशासनाने याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले कारण या हॉटेल्सच्या मालकांचे धागेदोरे थेट भाजप आणि शिवसेनेच्या वजनदार नेत्यांशी जुळले असल्याची जाणीव महानगरपालिकेला होती त्यामुळेच या हॉटेल्सविरुद्द कारवाई झाली नाही, असे सांगून विरोधी पक्षनेत्यांनी मोजेस ब्रिस्टो या हॉटेलचा ऑगस्ट महिन्यातील इनेस्पेक्शन रिपोर्ट प्रसारमाध्यमांसमोर सादर केला.

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराचे मागील पाच महिन्यात 75 बळी गेलेले आहेत. त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांना निलंबित करून अशा घटना थांबणार नाहीत तर मुंबई महापालिकेत तयार झालेली भ्रष्ट अधिकाऱ्यांची, दलालांची आणि त्यांना राजाश्रय देणाऱ्यांची टोळी उद्धस्थ झाली पाहिजे असे विखे पाटील म्हणाले. कमला मील कंपाऊंडमध्ये 14जण गेले आणि लगेच पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. बाकी ठिकाणी कारवाई झाली नाही आणि येथे कारवाई झाली, हाच हे प्रकरण दडपले जाणार असल्याचा मोठा पुरावा आहे. या पाच अधिकाऱ्यांचे निलंबन दाखवून यातील मुळ सुत्रधारांना वाचवण्याच्या दिशेने सरकारची पावले पडत आहेत असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.

मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपने आता जागे झाले पाहिजे असा टोला लगावत त्यांनी राज्याची सत्ता टिकवण्यासाठी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचे पाप मुख्यमंत्र्यांनी करु नये असे ते म्हणाले.मुंबई महापालिकेत रुफ टॉपवर बसून नाईट लाईफच्या गप्पा करणाऱ्यांना आता जमिनीवर आणण्याची वेळ आली आहे असंही ते म्हणाले.

कमला मिलसारखीच परिस्थिती टोडी मिल, रघुवंशी मिल आणि फिनिक्स मिलची आहे. या सर्व मिलच्या जागेवर अनधिकृत आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका असलेले हॉटेल्स उभे झाले आहेत. कमला मिलमध्येच ‘स्मॅश’ नावाचा पब आणि गेमींग झोन आहे तेही अनधिकृत, नियमबाह्य असल्याची माहिती माझ्याकडे आहे असे ते म्हणाले. यावेळी विखे पाटील यांच्यासोबत मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम, आमदार भाई जगताप, माजी आमदार चरणसिंग सप्रा आदी नेते उपस्थित होते.

Web Title: To save the friends of 'Balrajane', face-to-face action in Kamala Mill started! - Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.