satish kaushik lost 25 kg through his diet plan | जीममध्ये न जाता सतीश कौशिक यांनी घटवलं 25 किलो वजन, असे होते डाएट प्लान
जीममध्ये न जाता सतीश कौशिक यांनी घटवलं 25 किलो वजन, असे होते डाएट प्लान

मुंबई - बॉलिवूडमधील अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी तब्बल 25 किलो वजन घटवलं आहे. वजन घटवल्यानंतरचे सतीश कौशिक यांचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाढत्या वजनामुळे चालणं-फिरणं अगदीच कठीण झाल्यानं सतीश कौशिक अक्षरशः हैराण झाले होते. दरम्यान, सतीश यांनी Times Now Hindi सोबत आपले डाएट प्लान शेअर केले आहे. विशेष म्हणजे व्यायाम किंवा कोणत्याही कसरतीविना त्यांनी आपले 25 किलो वजन घटवलं आहे. 

या औषधाचे केले सेवन
वजन घटवण्यासाठी सतीश कौशिक यांनी अमेरिकेतील डॉक्टर क्रिश्चियशन मिडिलटन यांची मदत घेतली होती. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सतीश यांनी chirothin औषधाचं सेवन केले होते. या औषधाच्या सात थेंबांचं ते नियमित सात तासांमध्ये सेवन त्यांनी केले. यानंतर सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी पाच हजार कॅलरीचा खुराक  घेतला. तिस-या दिवसापासून 39 दिवसापर्यंत त्यांनी औषधाचे पाच थेंब घेण्यास सुरुवात केली. सकाळच्या न्याहरीमध्ये ते बिनसाखरेचा चहा प्यायचे. यानंतर दिवसात 100 ते 120 ग्रॅम प्रोटीन्स  ( चिकन, चीज ) आणि 100 ग्रॅम भाज्या खायचे. शाकाहारात ब्रोकलीचे प्रमाण सर्वाधिक असायचे. शिवाय आहारात सफरचंदाचाही समावेश असायचा. 
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात जवळपास 14 ते 16 तासांचे अंतर असायचे, भूक लागली तर कच्च्या भाज्या खायचो, असे सतीश यांनी सांगितले. 

'आता 30 ते 34 किलो वजन कमी करायचंय'
सतीश कौशिक यांनी सांगितल्यानुसार, 40 -42 दिवशी त्यांनी सल्ल्यानुसार औषधं घेणे बंद केले. यानंतर ते केवळ 500 कॅलरी असलेला खुराक घेत होते. हा डाएट फॉलो केल्यानंतर त्यांनी चार ते पाच आठवडे आपल्या आवडत्या पदार्थांचा मनसोक्त आनंदही घेतला. मात्र 42 व्या दिवसापासून त्यांनी पुन्हा डाएट प्लान सुरू केला. वजन नियंत्रणात आणण्यासाठी सतीश कौशिक चौथ्यांदा डाएट प्लान फॉलो करत आहेत. आता 30 ते 35 किलो वजन घटवायचे असल्याची इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. वजन कमी करण्यासाठी सतीश यांनी जीममध्ये व्यायाम केला नाही, मात्र डाएटदरम्यान ते रोज एक तास चालायचे. 

एकत्र स्वीकारले सहा सिनेमे 
सतीश कौशिक यांनी वजन कमी केल्यानंतर एकत्र सहा सिनेमे साईन केले आहेत.  शाद अली यांचा 'सूरमा', आशु त्रिखा यांचा 'वीरे दी वेडिंग', 'यमला पगला दीवाना 3' आणि 'नमस्ते इंग्लँड' यासारख्या सिनेमांमध्ये आता सतीश कौशिक दिसणार आहेत. 2014 मध्ये सतीश कौशिक यांनी 'गँग ऑफ घोस्ट्स' सिनेमा दिग्दर्शित केला होता.  यानंतर आता ते पंकज त्रिपाठी यांचा  'मैं जिंदा हूं' सिनेमातून कमबॅक करत आहेत. 
 


Web Title: satish kaushik lost 25 kg through his diet plan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.