साध्वी प्रज्ञासिंहला अटक करणारा अधिकारी पाच वर्षांपासून ‘साईड’ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:15 AM2019-05-17T05:15:58+5:302019-05-17T05:20:03+5:30

ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्यांमध्ये सरकारने सोयीनुसार चार पदांचा दर्जा उन्नत करून तर दोन पदे अवनत करून नियुक्त्या दिल्या आहेत.

Sadhvi Pragya Singh arrested officer for five years, outside | साध्वी प्रज्ञासिंहला अटक करणारा अधिकारी पाच वर्षांपासून ‘साईड’ला!

साध्वी प्रज्ञासिंहला अटक करणारा अधिकारी पाच वर्षांपासून ‘साईड’ला!

googlenewsNext

- जमीर काझी

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी व भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबतची चर्चा कायम असतानाच या तपास प्रकरणात त्यांच्याबरोबरीने काम करणाऱ्या ज्येष्ठ आयपीएस अधिकाºयाला राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांपासून ‘साईड’ पोस्टिंग दिल्याचे स्पष्ट झाले आहे. फोर्सवनचे प्रमुख डॉ. सुखविंदर सिंह गेल्या तीन वर्षांपासून त्या ठिकाणी कार्यरत असताना बुधवारी गृह विभागाने त्यांना अप्पर महासंचालक म्हणून बढती देत त्याच पदावर कायम ठेवले. केवळ त्या पदाचा दर्जा उन्नत करुन त्यांच्यावरील अव‘कृपा’ स्पष्ट केली आहे.
ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्यांमध्ये सरकारने सोयीनुसार चार पदांचा दर्जा उन्नत करून तर दोन पदे अवनत करून नियुक्त्या दिल्या आहेत. गेल्या महिन्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तडकाफडकी परत पाठविलेल्या विनीत अग्रवाल यांना पदोन्नतीवर राज्य सुरक्षा महामंडळात नियुक्त केल्याने त्यांच्यावरील सरकारची नाराजी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने निवडणूक प्रचारात एटीएसचे तत्कालीन प्रमुख व ‘२६/११’तील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह व धादांत खोटी विधाने केली होती. त्याबद्दल देशभरातून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर तिने वक्तव्याबाबत सारवासारव केली होती. हे प्रकरण अद्यापही निवडणूक प्रचाराचा भाग बनले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवारी वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांमध्ये मालेगाव स्फोटातील तपास प्रकरणात सहभागी असलेल्या डॉ. सुखविंदर सिंह यांना डावलण्यात आले आहे. स्फोटातील संशयित प्रज्ञासिंह ठाकूर, श्रीकांत पुरोहित, उपाध्याय आदींच्या अटकेवेळी सुखविंदर सिंह हे ‘एटीएस’मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद करकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कुशलतेने प्रकरणाचा तपास करीत महत्त्वाचे धागेदोरे व आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे जमविले होते. मात्र पुढे हे प्रकरण ‘एनआयए’कडे सोपविण्यात आले; आणि राज्यात व केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर तपास यंत्रणांकडून न्यायालयात स्वतंत्र पुरवणी जोडून आरोप शिथिल करण्यात आले.


डॉ. सिंह यांची ‘एटीएस’मधून पदोन्नतीवर २०१२ रोजी कोकण परिमंडळाच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली. ४ आॅगस्ट २०१४ रोजी तेथील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची राज्य गुप्त वार्ता विभागात बदली झाली. त्या ठिकाणी विविध जबाबदाºया पार पाडत असताना त्यांची २१ आॅगस्ट २०१६ रोजी फोर्सवनच्या विशेष महानिरीक्षकपदी बदली झाली. त्या ठिकाणी जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना पदोन्नतीवर पुन्हा त्याच ठिकाणी ठेवून कार्यकारी पदापासून डावलण्यात आले आहे. फरारी कर्जबुडव्या नीरव मोदी याला लंडनमधून ताब्यात घेण्यासाठीच्या कार्यवाहीत कसूर केल्याच्या कारणावरून सहसंचालक सत्यब्राता कुमार यांची ‘ईडी’चे तत्कालीन विशेष संचालक विनीत अग्रवाल यांनी अधिकारात नसताना बदली केली होती. त्यामुळे त्यांची ५ वर्षांसाठी नियुक्ती झाली असताना केंद्र सरकारने अवघ्या सव्वादोन वर्षांत त्यांना माघारी पाठविले होते. त्यांनाही पदोन्नतीवर साईडला पोस्टिंग दिली आहे.

‘२६/११’च्या हल्ल्यावेळीही फिल्डवर
डॉ. सुखविंदर सिंह हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा आहे. नक्षलग्रस्त भागातील उत्कृष्ट कामगिरीनंतर कोल्हापुरातही त्यांनी अधीक्षक म्हणून विशेष छाप पाडली होती. मालेगाव स्फोटाच्या तपासाबाबत शहीद करकरे पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. सिंह बाजूला बसून त्यांना आवश्यक माहिती देत असत. २६/११ हल्ल्यावेळी ते करकरे यांच्यासह सीएसएमटी परिसरात तैनात होते. तेथे थांबून नियंत्रण करा, असे त्यांना सांगत करकरे अन्य अधिकाºयांसह गाडीतून कामा रुग्णालयाच्या दिशेने गेले आणि अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले.

मुख्य दक्षता अधिकारी तीन वर्षांपासून एकाच पदावर
दोन वर्षे किंवा त्याहून अधिकचा कार्यकाळ पूर्ण झालेल्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांपासून म्हाडातील मुख्य दक्षता अधिकारी म्हणून संजय कुमार वर्मा यांना सरकारने हलविलेले नाही. २७ मे २०१६ पासून ते त्या ठिकाणी कार्यरत असून त्यांची सप्टेंबरमध्ये पिंपरी चिचवडच्या आयुक्तपदी नियुक्ती केली जाईल, अशी चर्चा वरिष्ठ अधिकाºयांत आहे. तेथील आयुक्त आर. के. पद्मनाभन सप्टेंबरमध्ये निवृत्त होत आहेत.

Web Title: Sadhvi Pragya Singh arrested officer for five years, outside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.