गुजरातमधील महिला खासदारावर पैशांची उधळण झाली ती श्रीमंत संस्कृती व आमच्याकडे झाली ती विकृती - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत on Sat, November 11, 2017 8:00am

आमचा कायदा असा विचित्र की, खोट्या नोटांकडे ढुंकूनही पाहणार नाही, पण नृत्यांगनेवर उधळलेल्या ‘बेस्ट’ चिल्लरची चौकशी करीत बसेल! अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे

मुंबई - नोटाबंदीनंतर खोट्या आणि बनावट नोटांचे कारखाने बंद होतील असा दावा ज्यांनी केला त्यांचा दावा ‘बेस्ट’च्या सांस्कृतिक सोहळ्यात खोटा ठरला आहे. चौकशी त्या खोट्या नोटांचीही करा, पण आमचा कायदा असा विचित्र की, खोट्या नोटांकडे ढुंकूनही पाहणार नाही, पण नृत्यांगनेवर उधळलेल्या ‘बेस्ट’ चिल्लरची चौकशी करीत बसेल! अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 

कायद्याचे शेपूट कधी कसे वळवळेल ते सांगता येत नाही. त्यात आमच्या कायद्यास अनेकदा गाढव म्हटले जाते. त्यामुळे गाढवाचे शेपूट बऱ्याचदा बिनकामाचे फटकारे मारीत असते. मुंबईतील ‘बेस्ट’ आगारात एक गमतीची गोष्ट घडली आहे आणि त्या गमतीच्या गोष्टीत नियम व कायद्याचे शेपूट अकारण वळवळताना दिसत आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

‘बेस्ट’मधील गमतीची गोष्ट अशी की, बेस्टची आर्थिक स्थिती नाजूक असतानाच दसऱ्याला वडाळा आगारात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बेस्टचीच कर्मचारी असणाऱ्या माधवी जुवेकर या मराठी अभिनेत्रीवर पैशांची उधळण झाली. माधवी जुवेकरने नृत्य केले व प्रेक्षकांनी नृत्यनिपुणतेवर खूश होऊन दौलतजादा केली. हा कार्यक्रम बेस्ट कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी असल्याने उधळून उधळून असे किती पैसे उधळले असतील? त्यात बेस्टची परिस्थिती कमालीची नाजूक. बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी आम्हीच मध्यस्थी केली. ‘बेस्ट’ची अर्थव्यवस्था चिंताजनक आहे, बेस्ट तोट्यात आहे हे सर्व मान्य, पण सांस्कृतिक सोहळ्यातील नृत्यांगनेवर झालेली दौलतजादा बेस्टच्या तिजोरीतून झाली होती काय? किंवा बेस्टच्या कंडक्टर मंडळींनी त्यांच्याकडे जमा झालेल्या प्रवाशांचे पैसे तिजोरीत जमा न करता या कार्यक्रमात उधळले का अशा शंकादेखील व्यक्त केल्या जात आहेत. त्या खऱ्या की खोट्या हे त्या कर्मचाऱ्यांनाच माहीत, मात्र खरे असेल तर तो अपराधच आहे आणि त्याबद्दल गुन्हेगारांना शिक्षा ही मिळायलाच पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. 

स्वतः माधवी जुवेकर ही अभिनेत्री बेस्टची कर्मचारी आहे व आता या पैशांच्या उधळणीचा एक व्हिडीओ व्हायरल की काय झाल्यावर बेस्ट प्रशासनाने माधवी जुवेकर व इतर ११ कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जर काही चुकीचे व संस्कृतीहीन असे घडले असेल तर त्याची चौकशी नियमानुसार झालीच पाहिजे व तशी ती होत आहे. पैशांची उधळपट्टी व पैशांचा पाऊस हे नक्कीच चांगले लक्षण नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

फक्त मुंबईतीलच नव्हे तर जिथे जिथे असे प्रकार घडत आहेत तिथे तिथे ते थांबवायला हवेत. अर्थात हेदेखील तेवढेच खरे आहे की, अलीकडील काळात आमच्या सण-उत्सवांच्या उत्साहावर, आनंदावर निर्बंध आणण्याचे, त्यावर ‘बंदी’ आणण्याचेही प्रकार न्यायालयीन निर्देश आणि कायदेकानूच्या माध्यमातून होत आहेत. कायदे समाजाच्या भल्यासाठीच बनविले जातात. त्यामुळे त्यांचे पालन करायलाच हवे, पण अनेकदा त्याचाही अतिरेक करण्यात येतो आणि खासकरून आमच्या सण-उत्सवांवरच त्याचा दांडपट्टा फिरतो. लोक सण-उत्सव एक परंपरा म्हणून तर साजरे करतातच, पण त्यातून मिळणारा निखळ आनंदही महत्त्वाचा असतो. मात्र हा आनंदही लोकांना लाभू द्यायचा नाही यासाठीच आमचे नियम आणि कायदे बनविले गेले आहेत का? तसे असेल तर त्या कायद्यांचेही पालन करण्याशिवाय लोकांकडे दुसरा पर्याय कुठला आहे? असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत. 

 शिवतीर्थावर मैदान गाजवायचे नाही, दिवाळीत फटाके वाजवायचे नाहीत. काय तर म्हणे आवाजाचे आणि हवेचे प्रदूषण होते, पण फटाक्यांवर बंदी घालूनही गेल्या चारेक दिवसांपासून दिल्लीचे जे ‘गॅस चेंबर’ झाले आहे त्याची जबाबदारी कोणावर टाकणार? उद्या न्यायालय सांगेल, ‘होळ्या’ही पेटवू नका. धुरामुळे प्रदूषण वाढते. म्हणजे सण, उत्सव, सांस्कृतिक सोहळे आता करायचेच नाहीत. ‘आनंद’ व ‘सुख’ हे शब्दच आमच्या जीवनातून हद्दपार करण्याचे प्रयत्न होत आहेत. नोटाबंदीनंतर सुखबंदी जारी झाली आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 

बेस्टच्या वडाळ्यातील कार्यक्रमात माधवी जुवेकर या अभिनेत्रीवर पैशांची उधळण झाली हे चुकीचेच आहे, पण निवडणुकीत मतांसाठी पैशांची जी उधळण कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकून केली जाते त्याचे काय? सध्याचे राज्यकर्ते जेव्हा निवडणुका जिंकण्यासाठी, मते फोडण्यासाठी पैशांची अशीच उधळण करतात तेव्हा त्यांना सर्व गुन्हे माफ आहेत. एका ‘दांडिया’ नृत्य कार्यक्रमात गुजरातमधील तरुण तडफदार महिला खासदार पूनम यांच्यावर किमान पाचेक कोटींची उधळण पाच मिनिटांत कशी झाली त्याचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, पण तिथे झाली ती श्रीमंत संस्कृती व आमच्याकडे झाली ती विकृती अशी टीका उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 

संबंधित

बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल ही थापच, हा प्रकल्प तर श्रीमंतांच्या कल्याणाचा ! सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरेंचा टोला
उद्धव ठाकरेंची सामना संपादकीयमधून मुंबई उच्च न्यायालयावर टीका

मुंबई कडून आणखी

वांद्रे : आगीच्या धुरात घुसमटून चिमुरडीचा मृत्यू, बहिणीची स्थिती गंभीर
‘एल्फिन्स्टन-परेल’ लष्करी पादचारी पूल, २६ जानेवारीला पहिला गर्डर उभारणार!
दहशतवादी कुरेशीविरोधात राज्यात चार गुन्हे दाखल, राज्य एटीएस घेणार ताबा : तपासासाठी पथक दिल्लीला होणार रवाना
दीर अन् वहिनी गेले पळून, पोलिसांनी आठवडाभरात काढले शोधून
मुंबई कमला मिल अग्निकांडाप्रकरणी अजून एका आरोपीला अटक

आणखी वाचा