पंकजा मुंडेंना धक्का, रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 12:43 PM2018-05-02T12:43:49+5:302018-05-02T13:49:28+5:30

महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Ramesh Karad joins Nationalist Congress | पंकजा मुंडेंना धक्का, रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पंकजा मुंडेंना धक्का, रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

googlenewsNext

मुंबई - लातूरचे बडे नेते रमेश कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत भाजपाला मोठा धक्का दिला आहे.  बीड-लातूर-उस्मानाबाद विधान परिषदेसाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली असून भाजपा हा निष्ठावंतावर अन्याय करणारा पक्ष असल्याची टीका करीत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

विधानपरिषदे निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रमेश कराड यांनी प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपा हा निष्ठावंतांवर अन्याय करणारा पक्ष असून ज्यांनी ज्यांनी गोपीनाथ मुंडे यांना खंबीर साथ दिली, त्यांच्यावर भाजपाने अन्याय केला असल्याची टीका केली. भाजपामधून रमेश कराड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले असून त्यांनी उस्मानाबाद येथे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला लगेचच त्यांनी विधानपरिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

 रमेश कराड यांची ही घरवापसी असल्याचे सांगत धनंजय मुंडे म्हणाले की , आता गेल्या १४ वर्षापासून कराड यांचा सुरू असलेला वनवास संपणार आहे. कराड यांच्या पक्ष प्रवेशावेळी आमदार जगजीतसिंह राणा पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार जीवनराव गोरे, आमदार राहूल मोटे, बसवराज पाटील नागराळकर, अक्षय मुंदडा, बजरंग सोनवणे, संजय बनसोडे, डी.एन. शेळके आदीसह तीनही जिल्ह्याचे कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

रस्ता चुकलो होतो....

आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्थापना झाल्यापासून 3 वर्ष होतो. भाजपमध्ये गेल्यामुळे आपला रस्ता चुकला असल्याची कबुली कराड यांनी देत आता  14 वर्षांचा वनवास संपल्याचे यावेळी बोलताना दिली. 

 दरम्यान, कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार आहे. डॉ. वि. दा कराड यांचे पुतणे रमेश कराड यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच सुरू झाली होती. मात्र, 12 वर्षांपूर्वी रमेश कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला होता. उस्मानाबाद लातूर बीडचे विधानपरिषदेचे आमदार दिलीप देशमुख यांचा कार्यकाळ संपतो आहे. ही जागा तीन टर्म देशमुख यांनी अबाधित ठेवली होती. मात्र, आता नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी त्यांनी ही जागा सोडली. रमेश कराड हे याच जागेसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज भरणार आहेत. रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक कराड नाणेफेकीत हरले. विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी दिली जावी या मताशी पंकजा मुंडे सहमत नव्हत्या, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंकजा मुंडे यांचा अपवाद वगळता रमेश कराड यांचे भाजपातील कोणाशीही सलोख्याचे नाते नाही. त्याचमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांचे मन वळवले आहे अशी चर्चा बीडमध्ये रंगली आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नात्यातही वितुष्ट आले होते. त्यांच्य़ा नात्यातील हा तणाव अजूनही कायम आहे. मुंडे घराण्यात फूट पाडल्याच्या मुद्यावरुन पंकजा यांचे कार्यकर्ते अनेकदा शरद पवारांवर तोंडसुखही घेताना दिसतात. 

Web Title: Ramesh Karad joins Nationalist Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.