Quiet calm ... stop the movement till 5 pm - Anandraj Ambedkar | शांततामय बंद... संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ - आनंदराज आंबेडकर 

ठळक मुद्देसंध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ - आनंदराज आंबेडकरभीमा कोरेगावच्या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करु या प्रकरणातील सुत्रधारांना पाठिशी घालणार नाही

मुंबई : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पुकारण्यात आलेल्या बंदला राज्यभरातील उत्स्फुर्त प्रतिसाद असून शांततामय वातावरणात आंदोलने होत आहेत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ, असे रिपब्लिकन सेनेचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे. 
आनंदराज आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावच्या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करु असे आश्वासन दिले आहे. तसेच, या प्रकरणातील सुत्रधारांना पाठिशी घालणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 
राज्यभरात पुकारण्यात आलेल्या आजच्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून  शांततामय वातावरणात आंदोलने होत आहेत. भीमसैनिक अनेक ठिकाणी शांततेत आंदोलने करत आहेत. त्यामुळे आंदोलन रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या ताकदीचा वापर करु नये, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी पोलिसांना केले आहे. याचबरोबर, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ असेही आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने राज्यातील अनेक भागात हिंसक वळण घेतले आहे. मुंबईत सुद्धा काही ठिकठिकाणी हिंसक आंदोलने सुरु आहेत. मुंबईतील कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर आज दुपारी आंदोलकांनी मोठया प्रमाणात तोडफोड केली. रेल्वे स्टेशनवरील स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकण्यात आल्या होत्या. तसेच, स्टीलच्या खुर्च्या आणि टयुबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. स्थानक परिसरातील जाहीरात बोर्डाचे फलकही फाडण्यात आले होते. 

दुसरीकडे, कोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असला तरी या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले आहेत. महाद्वार रोडवर हिंदुत्ववादी कार्यकर्तेही समर्थनार्थ उतरले असून त्यांनीही रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरु केली आहे. गुजरीमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या संरक्षणासाठी कडे केले. तथापि आंदोलकांचा संताप अनावर झालेला होता. दरम्यान, राज्यभरातील अनेक जिल्ह्यात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असला तरी अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.