पोलिसांसोबत सार्वजनिक गणेश मंडळांचा सलोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 02:27 AM2018-09-21T02:27:20+5:302018-09-21T02:27:44+5:30

मुंबई पोलीस आणि गणेश मंडळांतील सलोखा वाढण्यासाठी बहुतेक मंडळे आता पुढे येऊ लागली आहेत.

Public relations with the public with Ganesh Mandal | पोलिसांसोबत सार्वजनिक गणेश मंडळांचा सलोखा

पोलिसांसोबत सार्वजनिक गणेश मंडळांचा सलोखा

Next

- चेतन ननावरे 
मुंबई : मुंबई पोलीस आणि गणेश मंडळांतील सलोखा वाढण्यासाठी बहुतेक मंडळे आता पुढे येऊ लागली आहेत. पोलिसांचा सत्कार करून किंवा आरतीचा मान देऊन मंडळांकडून पोलिसांचा सन्मान केला जात आहे. तर मंडळांमार्फत नागरिकांना गुड टच, बॅड टचचे प्रशिक्षण देण्याचे काम पोलीस करत आहेत.
गणेशोत्सवात होणारी भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी मुंबईच्या नाक्यानाक्यावर पोलीस तैनात असतात. विशेषत: काळाचौकी, लालबाग, परळ या परिसरात पोलिसांच्या संयमाचा कस लागतो. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना हाताशी घेत पोलिसांना काम करावे लागत असते. त्यात काही वेळा पोलिसांची कार्यकर्त्यांसोबत हमरीतुमरीही होते. मात्र पोलीस आणि कार्यकर्त्यांमधील हाच विसंवाद दूर करून समन्वय साधण्यासाठी बहुतेक मंडळांनी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील सर्वात जास्त ताणतणावाचा सामना काळाचौकी पोलीस ठाण्याला करावा लागतो. कारण या विभागात लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्ली, तेजुकायाचा राजा, काळाचौकीचा महागणपती, रंगारी बदक चाळ यासारख्या नामांकित मंडळांचा समावेश होतो.
या वर्षी चिंचपोकळीचा चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीत फीट आल्याने एक मुलगी बेशुद्ध पडली होती. त्या वेळी प्रसंगावधान राखून काळाचौकी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपटराव आव्हाड यांनी तिला उचलून प्रथमोपचारासाठी लालबाग पोलीस चौकीत आणले. तेथून कार्यकर्त्यांच्या मदतीने तिला केईएम रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. या वर्दीतील माणुसकीचे भान ठेवून पोपटराव आव्हाड यांचा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने सत्कार केल्याची माहिती ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळाचे अध्यक्ष उमेश सीताराम नाईक यांनी दिली. या वेळी मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत आणि खजिनदार अतुल केरकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. चिंतामणीच्या आगमनावेळी त्याच्या पूजेचा मान पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांना देण्यात आला होता.
आग्रीपाडा२२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘वर्दीची आरती’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारच्या आरतीचा मान मुंबई पोलिसांना दिला होता. या उपक्रमाबाबत मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र आचरेकर यांनी सांगितले की, मंडळातर्फे आग्रीपाडा, ताडदेव, भायखळा आणि नागपाडा येथील पोलिसांना आरतीचा मान देण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांनी मंडळामार्फत महिला व लहान मुलांना गुड टच व बॅड टचची माहिती दिली. उत्सवादरम्यान कोणतीही हिंसा किंवा तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याची माहितीही पोलिसांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रेयस गोलतकर यांनी दिली.
>डोळ्यात तेल घालून पहारा
गणेशोत्सवात लालबाग-परळ विभागात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तांच्या संरक्षणासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त
डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त एन. अंबिका, काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र चिखले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाचे कर्मचारी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस पहारा देत आहेत. म्हणूनच काळाचौकीचा महागणपती, बकरी अड्ड्याचा राजा, तेजुकाया अशा विविध मंडळांकडून पोलिसांना आरतीचा मान दिला जात आहे.

Web Title: Public relations with the public with Ganesh Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.