केईएम रुग्णालयातील अंध कर्मचाऱ्याला मानसिक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 03:00 PM2018-10-09T15:00:30+5:302018-10-09T15:00:52+5:30

आॅगस्ट महिन्यापासून तक्रार : पालिका आयुक्त, मानवी हक्क आयोगाला निवेदन

Psychological distress to the blind staff at KEM hospital mumbai | केईएम रुग्णालयातील अंध कर्मचाऱ्याला मानसिक त्रास

केईएम रुग्णालयातील अंध कर्मचाऱ्याला मानसिक त्रास

Next

मुंबई : केईएम रुग्णालयाच्या समाज सेवा विभागातील समाज विकास अधिकारी सुभाष प्रभाकर साळवे या अंध कर्मचाऱ्यास नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. आॅगस्ट २०१८ पासून जाणीवपूर्वक बायोमेट्रीक हजेरीत त्यांना लेटमार्क दिला जात आहे. याविषयी, आस्थापना विभागाकडे तक्रार करुनही दाद दिली जात नसल्याने या मनस्तापाविरोधात अखेर रुग्णालय प्रशासन, मानवी हक्क आयोग आणि पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे त्यांनी दाद मागितली आहे.

२१ वर्षांपासून केईएम रुग्णालयात साळवे काम करत असून, सानपाड्याहून शिवडीमार्गे केईएम रुग्णालय गाठतात. गेले काही महिने होणाऱ्या या नाहक मनस्तापाविषयी साळवे म्हणाले, सानपाड्याहून केईएम रुग्णालयात येताना रहदारीचा पूल तोडल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे बऱ्याचदा कुणाच्या मदतीने हा रस्ता ओंलाडावा लागतो. त्यानंतर महाविद्यालयाच्या इमारतीमधून समाजसेवा विभागाकडे येत असताना आपत्कालीन आणि एमआरआय विभागाजवळ रुग्णांची रुग्णालय परिसरात गर्दी असते. तसेच, काही रुग्ण स्ट्रेचरवरही असतात. त्यामुळे काठीचा आधार घेत तेथून लवकर येणे शक्य होत नाही.

बऱ्याच अडचणींवर मात करुन बायोमेट्रीकसाठी वेळेवर हजर राहतो. बायोमेट्रीकच्या नियमानुसार, सामान्य कर्मचाºयांनी ९.३० च्या पूर्वी आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांनी दहा वाजण्यापूर्वी हजेरी लावणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे हे नियम पाळण्याचा प्रयत्न करतो. सातत्याने जाणीवपूर्णक होणाऱ्या लेटमार्कविषयी विभागप्रमुखांशी चर्चा केल्याचे साळवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र तेथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याविषयी आस्थापना विभागाकडे तक्रार करुन संंबंधित विभागाशी चर्चा करुन प्रकरण सोडविण्याचा सल्ला मिळाला. त्याचप्रमाणे, प्रत्येक विभागात बायोमेट्रीकनंतर हजेरीपट बंद करण्याच्या आदेशानंतर समाजसेवा विभागात मात्र ही पद्धत आजही सुरु आहे, असेही साळवे यांनी आर्वजून नमूद केले.

प्रत्येक रुग्णालयात बायोमेट्रीक प्रकरणाविषयी तक्रारी आहेत. ही पद्धत अद्ययावतपणे सुरु नसल्याने यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना या पद्धतीचा नाहक त्रास होतो. त्यामुळे नुकतेच याविषयी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले.
- प्रदीप नारकर,
चिटणीस, म्युनिसिपल मजदूर युनियन

या प्रकरणाविषयी संबंधित विभागाचे स्पष्टीकरण मागविले आहे. त्यानंतर अधिक तपासाअंती या प्रकरणाच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल.
-डॉ. अविनाश सुपे,
अधिष्ठाता , केईएम रुग्णालय

Web Title: Psychological distress to the blind staff at KEM hospital mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.