'वंचित बहुजन आघाडीवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:57 PM2019-06-21T12:57:15+5:302019-06-21T13:17:12+5:30

काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का?

Prakash Ambedkar Criticized Congress leaders who alleged VBA is B Team of BJP | 'वंचित बहुजन आघाडीवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा'

'वंचित बहुजन आघाडीवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा'

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मिळालेली मतं काही ठिकाणी जास्त होती तर काही ठिकाणी कमी होती. जवळपास 40 लाखांहून अधिक मतदान वंचितला झालं. वंचितमुळे आघाडीचे उमेदवार पडले असा आरोप आमच्यावर होतो. वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम आहे असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे तर त्यांनी आम्हाला पुरावे द्यावेत असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. 

या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का? काँग्रेसचे नेते केंद्रीय पातळीवरील आणि राज्यातील अशांनी वंचित बहुजन आघाडीवर आरोप केला की आम्ही भाजपाची बी टीम आहोत, तुम्ही आमचं स्टेटस काय धरता असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला तसेच पुरावे नसतील तर 40 लाख मतदारांची माफी मागावी अशी मागणी केली 

दरम्यान विधानसभा निवडणुकीबाबत वंचित बहुजन आघाडी पक्षाची बैठक झाली आहे. या बैठकीत पक्षाची रणनीती काय असावी याची चर्चा झाली. त्याचसोबत पक्षाचा विस्तार वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये शंकरराव लिंगे, धनराज वंजारी, अ‍ॅड विजय मोरे असे तीन उपाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. तर सांगली लोकसभा मतदारसंघात अडीच लाखांहून अधिक मते घेतलेले गोपीचंद पडळकर यांची पक्षाच्या प्रमुख सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजाराम पाटील, सचिन माळी, अनिल जाधव, नवनाथ पडळकर यासोबत इतर 6 जण सरचिटणीस असतील. 

तसेच ईव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या संशयाबाबत 25 तारखेला निवडणूक आयोगाची वेळ मागितली आहे. ईव्हीएमच्या बाबत दिल्लीत आंदोलन केलं पाहिजे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला ईव्हीएमवरच मतदान घेण्यात रस असेल तर आपण निवडणूक प्रक्रियेत सहभागीच होऊ नये, अशी भूमिका विविध राजकीय पक्षांनी घ्यायला हवी अशी मागणी केली होती.  
       

Web Title: Prakash Ambedkar Criticized Congress leaders who alleged VBA is B Team of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.