पोलिसांचा निष्काळजीपणा, म्हणे जखमीलाच आणा पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:57 AM2019-03-26T02:57:57+5:302019-03-26T02:58:08+5:30

खासगी शिकवणीवरून घरी परतताना आयआयटीच्या विद्यार्थिनीचा भरधाव दुचाकीच्या धडकेत अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यातील तरुणीकडे घटनास्थळावरील वाहतूक पोलिसाने दुर्लक्ष केले.

Police negligence, say, injured in police custody | पोलिसांचा निष्काळजीपणा, म्हणे जखमीलाच आणा पोलीस ठाण्यात

पोलिसांचा निष्काळजीपणा, म्हणे जखमीलाच आणा पोलीस ठाण्यात

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई : खासगी शिकवणीवरून घरी परतताना आयआयटीच्या विद्यार्थिनीचा भरधाव दुचाकीच्या धडकेत अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यातील तरुणीकडे घटनास्थळावरील वाहतूक पोलिसाने दुर्लक्ष केले. एका रिक्षाचालकाने पुढाकार घेत तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्या छातीला फॅ्रक्चर झाले. अपघातानंतर, दुचाकीस्वाराच्या गाडीचा क्रमांक घेत, वडील पोलीस ठाण्यात गेले. मात्र ४८ तास उलटूनही तिची विचारपूस करण्यासाठीही पोलिसांना मुहूर्त मिळाला नाही. उलट जखमी मुलीलाच पोलीस ठाण्यात आणण्यास सांगण्यात आल्याचा प्रकार मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
मुलुंडच्या म्हाडा वसाहतीत रोशनी वसंत नलावडे (१९) ही कुटुंबासह राहते. ती आयआयटीत पदवीचे शिक्षण घेत आहे. शनिवारी खासगी शिकवणी उरकून ती पायी घरी निघाली. रात्री सव्वानऊच्या सुमारास आर.आर. सिंग शाळेजवळून रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीच्या धडकेत ती कोसळली. तर, दुचाकीस्वारही पडला. बघ्यांच्या गर्दीतून एकाने तिला मारुती नर्सिंग होममध्ये नेले. धक्कादायक म्हणजे तेथे तैनात वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले. थोडाजरी उशीर झाला असता तर तिला जीव गमवावा लागला असता, असे वडिलांचे म्हणणे आहे.
वडिलांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या अपघातानंतर अर्ध्या तासातच ते नवघर पोलिसांत गेले. रुग्णालयानेही पोलिसांना माहिती दिली. पोलीस ठाण्यात संतोष पिलानी हे अधिकारी होते. त्यांनी आधी वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर कागदपत्रे घेऊन या. त्यानुसार गुन्हा दाखल करतो, असे सांगून वडिलांना पुन्हा रुग्णालयात पाठविले. रात्री १२च्या ठोक्याला वडील पुन्हा पोलिसांत गेले. पिलानी यांनी तासभर थांबवून १ वाजता विचारपूस केली. कागदपत्रे बघून उद्या येतो, असे सांगितले.
रविवारही गेला. सोमवारी पुन्हा ते पोलिसांत गेले. तेव्हा मुलीलाच येथे आण, असे पिलानी म्हणाले. मात्र मुलगी उठू, चालू शकत नाही. तुम्ही आलात तर आरोग्य विम्यासाठी मदत होईल, असे वडिलांनी सांगताच तुम्ही नंतर या, असे पोलिसांनी सांगितले. ४८ तास उलटूनही पिलानी किंवा अन्य अधिकाऱ्यांना वेळ मिळालाच नाही.

लवकरच गुन्हा दाखल करणार
नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांना विचारले असता, ते याबाबत अनभिज्ञ होते. माहिती घेतल्यानंतर त्यांनी पिलानी यांना झापले. याबाबत लवकरात लवकर गुन्हा दाखल करत, योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Police negligence, say, injured in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.