Police Commissioner to cancel toeing agreement | ‘पोलीस आयुक्तांनी टोइंग करार रद्द करावा’

मुंबई : वाहने टो करण्याचा कोणताही व्यावसायिक अनुभव नसताना, विदर्भ इन्फोटेक लिमिटेड या नागपूरस्थित कंपनीला मुंबईतील वाहने टो करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. शिवाय, या कंपनीच्या नफ्यासाठी वाहतूक पोलिसांनी दंडाच्या रकमेत वाढ करतानाच, छोट्या-मोठ्या कारणांसाठी वाहने टो करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुंबईकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे विदर्भ इन्फोटेक आणि मुंबई वाहतूक पोलिसांमधील करार ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. टोइंगच्या नावाखाली सध्या मुंबईकरांची लूट सूरू आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पुढाकार घेत, वाहतूक पोलीस आणि विदर्भ इन्फोटेकमधील करार रद्द करावा, अशी मागणी निरुपम यांनी पत्राद्वारे केली आहे. नियम व अटी धाब्यावर बसवून, विदर्भ इन्फोटेकला हे काम देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने टोइंगसंदर्भात काढलेल्या टेंडरमध्ये कंपनीला टोइंग व्यवसायाचा किमान ५ वर्षांच्या अनुभवाची अट होती.
मात्र, कोणताही पूर्वानुभव नसताना विदर्भ इन्फोटेकला काम देण्यात आले. विशेष म्हणजे, टेंडर मिळाल्यानंतर दोन महिन्यांनी विदर्भ इन्फोटेकने आपली खास एजीएम घेऊन टोइंग व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा करार रद्द करण्याची मागणी निरुपम यांनी केली, तसेच या कंपनीला वरळीतील वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयात एक हजार चौरसफुटाची जागा वापरासाठी मोफत दिली आहे. ही जागादेखील त्यांच्याकडून काढून घ्यावी, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.